HinduismOpinion

गुरू तेगबहादूर यांचा ४०० वा गुरू परब – जन्मदिन

हिंदू धर्म आणि संस्कृतीसाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या या थोर योद्धा गुरूला त्यांच्या जन्मदिनानिमित्त (२१ एप्रिल) अभिवादन

गुरू तेगबहादूर हे शीख पंथाचे नववे गुरू. सहावे गुरू हरगोविंद यांचे सर्वात लहान पुत्र. १६६२ साली अमृतसर येथे जन्म. त्यांचे मूळ नाव ‘त्याग मल’ असे होते. मुघलांशी झालेल्या लढाईत त्यांनी गाजवलेल्या पराक्रमामुळे गुरू हरगोविंद यांनी त्यांना ‘तेगबहादूर’ हे नाव दिले…. याचा अर्थ तलवारबाजी मध्ये प्रवीण आणि पराक्रमी!! लहानपणापासून वेद, उपनिषद, पुराणे यांचा गाढा अभ्यास होता, घोडेस्वारी, तलवारबाजी चे सुद्धा शिक्षण आणि बराच काळ ध्यानधारणा आणि तापचारणात…. असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व!! गुरुपदाची जाबाबदरी आल्यावर भारतभर सर्वदूर प्रवास आणि समाजाला जोडण्याचे काम मोठ्याप्रमाणात केले. शीख पंथाचे दृढीकरण त्यांच्या कारकिर्दीत झाले.

अशा या महान गुरूने समाजासमोर ठेवलेला सर्वोच्च आदर्श म्हणजे त्यांनी समाज, धर्म आणि देशासाठी अन्यायाविरुद्ध केलेले बलिदान. त्यांच्या या बलिदानातून प्रेरणा घेऊन हजारो हिंदू आणि सिक्ख बांधवांनी देश आणि धर्मासाठी त्याग आणि बलिदान दिले आणि म्हणूनच आपण सर्व आज मानाने जगू शकतोय. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत गाजविलेली कर्तबगारी आणि देशाचा आणि धर्माचा स्वाभिमान यासाठी केलेले बलिदान यासाठी आपण गुरूंचे सदैव ऋणी आहोत!!

दुर्दैवाने आपल्या या अशा राष्ट्रपुरुषांची माहिती आज आपल्याला नाही, हा गौरवशाली इतिहास कळावा अशी ना मुघलांची इच्छा होती…. ना इंग्रजांची आणि दुर्दैवाने ना भारतीय म्हणवणाऱ्या राज्यकर्त्यांची आणि इतिहासकार यांची.

हा इतिहास खरं तर फार मोठा आणि जाज्वल्य आहे. याची थोडीफार माहिती आपल्या सर्वांना व्हावी हाच उद्देश….

औरंगजेबाच्या मोगली राजवटीने अत्याचारांचा कळस गाठला होता. धर्मांतराचा उच्छाद मांडला होता. काश्मीर मध्ये त्यांनी काश्मिरी पंडितांना धर्मांतर करण्याची बळजबरी करण्यास सुरुवात केली. त्यांनी विरोध केल्यावर त्यांना मुदत दिली आणि सांगितलं की धर्मांतरास तयार व्हा नाहीतर सर्वांचे शिरकाण केले जाईल…. म्हणजे आजच्या समजणाऱ्या भाषेत मारले जाईल. काश्मिरी पंडित मोठ्या संकटात सापडले आणि आपल्याला या संकटातून कोण वाचवेल याचा विचार सुरु केला आणि त्यांना एकच नाव सुचलं ते म्हणजे गुरू तेगबहाद्दूर…..

साधारण ५०० पंडित हे पंडित कृपाराम यांच्या नेतृत्वाखाली आनंदपूर साहिब येथे आले आणि काश्मिरी हिंदूंची व्यथा त्यांना सांगितली. गुरूंना त्यांच्या या व्यथेने अत्यंत वेदना झाल्या आणि ते एकदम अंतर्मुख झाले. लहानग्या गोविंदराय यांनी आपल्या वडिलांना… गुरू तेगबहाद्दूरांना त्यांच्या अंतर्मुखतेचे कारण विचारलं. गुरूंनी सांगितलं की या संकटातून बाहेर पडण्यासाठी एखाद्या महान आत्म्याचे बलिदान व्हावे लागेल….. ९ वर्षाचा लहानगा गोविंदराय म्हणाला की या साठी गुरूंशिवाय अन्य महान आत्मा कोण असू शकतो. लहानग्या गोविंदसिंहांचे बोल ऐकून गुरू स्वतः या साठी तयार झाले…..

गुरू तेगबहाद्दूर यासाठी आपल्या शिष्यांसाह…. भाई मतीदास, भाई सतीदास आणि भाई दयाळ यांच्यासह दिल्ली येथे गेले….. आणि त्यांना औरंगझेबाने अटक केली. त्याच्या सर्व भारतास धर्मांतरित करून मुस्लिम करण्याच्या कामात गुरू अडथळा बनून राहिले होते. औरंग्याने त्यांना धर्मांतर करा असे सांगून त्यांचे हाल करायला सुरुवात केली. एकवेळ प्राण देऊ पण धर्म सोडणार नाही असे गुरूंनी ठणकावून सांगितले. कोणीच बधत नाही हे पाहून औरंगझेबाचे क्रौर्य जागे झाले…… आजच्या काळात विश्वास वाटणार नाही असे क्रौर्य …. दिल्लीच्या चंदणी चौकात भाई मतीदास यांना करवतीने कापले, भाई दयाल यांना उकळत्या तेलात टाकले, भाई सतीदास यांना तर जीवंत जाळले….. नंतर गुरूंचे ही अनेक दिवस अनन्वित हाल केले आणि तरीही गुरूंनी धर्मांतरास नकार दिला. यावर औरंगझेबाच्या आदेशाने चांदणी चौकातच २४ नोव्हेंबर १६७५ रोजी गुरूतेगबहाद्दूर यांचं मस्तक उडवलं…..जेथे गुरूंच मस्तक उडवलं गेलं त्याठिकाणी चांदणी चौकात आज गुरुद्वारा आहे….शिशगंज गुरुद्वारा…. त्यांच्या शिष्य मंडळींनी त्यांचं मस्तकविना शरीर तिथून पळवून नेलं आणि त्यांच्या एका शिष्याच्या घरी नेऊन औरंग्याचे सैनिक येऊन त्या शरीराचा अपमान करतील म्हणून त्या घरालाच आग लावली…. जेथे त्यांच्या शरीवर अग्निसंस्कार झाले त्याठिकाणी आज गुरुद्वारा आहे…. रकीबचंद गुरुद्वारा
औरंगझेबाने गुरूंचे हाल करताना त्यांना आव्हान दिले होते की खरे सत्पुरुष असाल तर चमत्कार करून दाखवा. गुरूंनी त्याला नकार दिला. औरंग्या आपला प्राण घेणार हे माहिती होते. त्यांनी औरंगझेबाला देण्यासाठी चिट्ठी लिहून ठेवली होती…. त्यात म्हटले होते….”मी माझे शिष दिले पण माझा धर्म सोडला नाही. हाच सर्वात मोठा चमत्कार आहे”…. काय धैर्य असेल या महान विभूतीचे!!

अंगावर शहारे आणणारे हे हौतात्म्य, ज्याने हिंदू समाजात आत्मसंमानाचे स्फुल्लिंग जागृत केले….. सिक्ख संप्रदायाने हिंदू धर्मासाठी जे बलिदान केले त्याला तोड नाही…… .

मंडळी…. हा इतिहास माहिती होता का? काहींना असेलही…. पण आपल्या देशाचा गौरवशाली आणि जाज्वल्य इतिहास माहिती करून घेणं आवश्यक आहे आणि सर्वांनी तो करून घ्यावा ही कळकळीची विनंती.

सिक्ख पंथाचा परकीयांच्या आक्रमणापासून देशाचे संरक्षण आणि संवर्धन करणे आणि हिंदुधर्म संरक्षण करणे यात मोठ्ठा वाटा आहे…. हा पंथ म्हणजे हिंदू धर्माचे खडगच… (खडग म्हणजे तलवार)…. सिक्ख पंथाच्या सर्वच गुरूंनी हिंदूंच्या आणि पर्यायाने देशाच्या रक्षणासाठी मोठे योगदान दिले आहे, त्यातही गुरू तेगबहादूर आणि गुरू गोविंदसिंह यांचा मोठा वाटा आहे…..

अशा या गुरू तेगबहादूर यांचा ४०० वा गुरू परब म्हणजेच जन्म दिन. त्यानिमित्त आपण सर्वांनी त्यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या कर्तृत्वापासून प्रेरणा घेऊन समाज, धर्म आणि राष्ट्र हीच प्राथमिकता ठेवुयात आणि त्यांच्या रक्षणासाठी कटिबद्ध होऊयात….

*गुरूंच्या जाज्वल्य कर्तृत्वातून आणि बलिदानातून प्रेरणा घेऊयात आणि कृतज्ञता व्यक्त करूयात *

गुरू तेगबहाद्दूरांना ४०० व्या गुरू परब निमित्त अभिवादन

  • अरविंद जोशी
Back to top button