News

भारतीय विचार साधनेच्या पुस्तकांचे प्रकाशन


पुणे- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ‘स्वातंत्र्याचा जागर’ या पुस्तक मालिकेत ‘भारतीय विचार साधना’ करीत असलेले कार्य अतिशय अभिमानास्पद आहे. तरुण लेखिकांनी ‘घागर मे सागर भरायचे’ तंत्र अवलंबून कुमारवयीन पिढीसमोर आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील नवा इतिहास समोर ठेवला आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अनुवादक आणि लेखिका उमाताई कुलकर्णी यांनी रविवारी केले.


येथील पाषाण परिसरात ‘भारतीय विचार साधना’ आयोजित प्रकाशन समारंभात त्या बोलत होत्या. रुपाली भुसारी यांच्या स्वातंत्र्यलढा आणि साम्यवाद’ आणि शिल्पा निंबाळकर यांच्या ‘स्वातंत्र्य संग्राम आणि शेतकरी सहभाग’ या पुस्तकांचे प्रकाशन यावेळी झाले. उमाताई कुलकर्णी, डॉ. गिरीश आफळे, डॉ. संतोष गटणे, रुपाली भुसारी आणि शिल्पा निंबाळकर यावेळी उपस्थित होत्या.


नवप्रकाशित पुस्तके पुढील पिढीसाठी अतिशय उपयुक्त आहेत. आपल्या देशाचा इतिहास केवळ काही ठरावीक मुद्दे सांगून अधोरेखित करण्याचे कार्य एक विशिष्ट विचारधारा करीत आहे. अहिंसेने स्वातंत्र्य मिळाले, असे सांगणारे सोयीस्कररित्या या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्याचे सांगायला विसरतात, ” असे मनोगत यावेळी उमाताई कुलकर्णी यांनी व्यक्त केले.


प्रमुख वक्ते डॉ. संतोष गटणे यांनी आपले प्राधन्यक्रम अतिशय महत्त्वाची भूमिका निभावतात. कृषी क्षेत्राला प्राधान्य क्रम देणे काळाची गरज आहे. विविध बिजांमध्ये जेनेटीकली मॉडीफाईड बीजांचा मारा अनेक परकीय देशांकडून होत असतो. त्यामुळे आपण त्यांच्यावर अवलंबून राहावे हा कुठेतरी त्यांचा हेतू असतो. देशाला अशा नव्या पारतंत्र्यात जाण्यापासून रोखणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले.


व्यासपीठावरील प्रमुख मान्यवर डॉ. गिरीश आफळे यांनी उमाताई यांचा गौरव केला आणि लेखिकांचे स्वागत केले. रुपाली भुसारी यांनी साम्यवादी विचारांमुळे देशाच्या फाळणीला वैचारिक विष दिले गेले. साम्यवाद्यांचा राष्ट्र ह्या संकल्पनेवर विश्वास नाही. सोव्हिएत रशियाच्या धोरणाप्रमाणे त्यांनी त्याकाळी धोरणे बदलली आणि स्वातंत्र्यलढ्यात अडथळे आणले. हिंसा आणि रक्तरंजित क्रातीवर त्यांचा विश्वास आहे त्यामुळे हे मानवतेच्या विरोधात आहेत. आजच्या नक्षलवाद आणि अर्बन नक्षलवादापर्यंत याचे धागेदोरे आहेत. ते तपशीलाने जाणून घेण्यासाठी पुस्तिका नक्कीच मदत करेल असा विश्वास व्यक्त केला.


शिल्पा निंबाळकर यांनी शेतकरी चळवळ आणि त्याचे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला मिळालेले बळ याविषयी मत मांडले. शेतकरी आंदोलन, शेतकऱ्यांवर झालेले अत्याचार याचा ब्रिटीशांच्या विरोधी जनमत तयार व्हायला फायदा झालेला आहे. शेतीच्या व्यापारीकरणाचे दूरगामी परिणाम झाले आहेत. शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील एकूण योगदानाविषयी जाणून घेण्यासाठी भाविसाची पुस्तिका मार्गदर्शक ठरेल असे मत व्यक्त केले.


सरस्वतीपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक करताना महेंद्र वाघ यांनी ही एक चळवळ असल्याचे सांगून ‘स्वातंत्र्याचा जागर’ या मालिकेत १९ पुस्तकांची निर्मिती केली जात आहे. काळाची गरज ओळखून आता ‘ई-बुक्स’ उपलब्ध आहेत अशी माहिती दिली. या उपक्रमात पुढाकार घेणाऱ्या विवेक जोशी आणि राजन ढवळीकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अदिती मोगरे यांनी तर मिलिंद महाजन यांनी आभार मानले. लक्ष्मी पानट यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button