News

तथ्य, सत्यासोबत उभे रहा

अशोक श्रीवास्तव यांचे पत्रकारांना आवाहन

नागपूर, २४ मे : ‘२०१४पासून लोकशाही धोक्यात आहे, पत्रकारिता संपली आहे, पत्रकार विकल्या गेला आहे आदींचे रडगाणे जोरात गाणे सुरू आहे. प्रत्यक्षात आजही पत्रकारितेचे स्वातंत्र्य अबाधित असून खोटे नॅरेटिव्ह मांडणाऱ्यांविरुद्ध लढण्याची गरज निर्माण झाली आहे. या पाश्वभूमीवर पत्रकारांनी तथ्य आणि सत्यासोबत उभे राहावे,’ असे आवाहन पत्रकार अशोक श्रीवास्तव यांनी सोमवारी माध्यमकर्मींना केले. 


विश्व संवाद केंद्र नागपूर तर्फे आद्य पत्रकार देवर्षी नारद जयंती पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन सिव्हिल लाइन्समधील चिटणवीस सेंटर येथे करण्यात आले होते. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून रा. स्व. संघाचे अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख नरेंद्रकुमार आणि मुख्य वक्ता म्हणून पत्रकार अशोक श्रीवास्तव, पत्रकार विनोद देशमुख उपस्थित होते. पत्रकारितेच्या सद्यस्थितीवर बोलताना श्रीवास्तव म्हणाले,‘आजघडीला मोठ्ठाले पत्रकार लोकशाही आणि पत्रकारितेच्या अस्तित्वाबाबत चिंतातूर दिसून येत आहेत. नॅरेटिव्हची लढाई सुरू आहे. पूर्वीप्रमाणे मीडिया हाऊसला राष्ट्रपती भवनात खासगी कार्यक्रम करणे, विदेशी दौऱ्यावर मौजमजा करणे, दारूपार्टी एन्जॉय करणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे कदाचित ही ओरड सुरू आहे. मात्र, या परिस्थितीतही सोशल मीडिया चांगली भूमिका निभावत आहे. जे कार्य पारंपरिक मीडियाने करायला हवे ते काम सोशल मीडिया करत आहे. सोशल मीडियाचे काही धोके असले तरी सत्य बेधडकपणे मांडण्याची शक्ती या माध्यमात आहे. भारतात पत्रकारितेला संपूर्ण स्वातंत्र्य असून पत्रकारांनीसुद्धा येथील कायदा पाळायलाच हवा. एकीकडे देशात दीपप्रज्वलनाने भारतीय संस्कृती जपली जात असतानाच दुसरीकडे काही लोक ठिणगी भडकवण्याचे काम करीत आहेत. लोकशाही धोक्यात असल्याचे सांगितले जात असतानाही पंजाबमध्ये आप, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले आहे. यातूनच देशात आपले सरकार निवडण्याचा नागरिकांचा अधिकार अबाधित असल्याचे स्पष्ट होते. पत्रकारितेला स्वातंत्र्य नाही म्हणणाऱ्यांना नक्की कोणते स्वातंत्र्य हवे आहे, याचाही विचार व्हायला हवा. स्वातंत्र्य नाही म्हणणारे खोट्या गोष्टी पसरवत आहेत. अशांना गैरकाम करण्याचे स्वातंत्र्य हवे आहे. एका हातात एके ५६ आणि दुसऱ्या हातात पत्रकार असल्याचे ओळखपत्र असलेला माध्यमकर्मी हवाय की कोव्हिडच्या आड मदतराशीच्या नावाखाली कोट्यवधींची संपत्ती गोळा करणारी राणा अय्युब हवी आहे; याचा प्रत्येकाने विचार करायला हवा.’ याप्रसंगी मुद्रित माध्यमातून अपूर्व मेठी (हितवाद), दृकश्राव्य माध्यमातून अमर काणे (झी २४ तास), कॅमेराजर्नलिस्ट म्हणून अतुल हिरडे (एबीपी न्यूज) यांना नारद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन आल्हाद सदाचार यांनी यांनी केले. आभार प्रदर्शन विनोद देशमुख यांनी केले. कार्यक्रमाला रा. स्व. संघाचे महानगर संघचालक राजेश लोया, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाचे प्रमुख डॉ. प्रा. मोईज हक यांची उपस्थिती होती.


सकारात्मकतेची गरज


संवाद हा पत्रकारितेतील अविभाज्य अंग असून संवादातून मोठाल्या समस्या सहज सुटू शकतात. विद्यमान परिस्थितीत पत्रकारितेमध्ये सकारात्मकता निर्माण होण्याची गरज आहे. नकारात्मकता प्रत्येकच क्षेत्रात असून ती पाश्चिमात्यांची देण आहे. पण, ती नाकारत पत्रकारांनी सकारात्मक व्हावे, ही अपेक्षा नरेंद्रकुमार यांनी व्यक्त केली. इतरांबद्दल बोलताना, लिहित असताना पत्रकाराने स्वतःबद्दलही विचार करायला हवा. आत्मचिंतन करायला हवे. पत्रकारितेबरोबरच आयुष्यात संवादाशिवाय दुसरे काहीच नाही. विसंवादाने समस्या, गैरसमज निर्माण होतात तर संवादाने त्या दूर होतात. राष्ट्रनिर्माणात मीडियाची भूमिका महत्त्वाची असून लेखन हे ‘सत्यम, शिवम, सुंदरम’ असावे, याकडे नरेंद्रकुमार यांनी लक्ष वेधले.

Back to top button