CultureOpinion

लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

भूमी अनेक वीर, वीरांगनांच्या पराक्रमाने पावन झालेली पवित्र भूमी. या मातीच्या कणाकणातून दिव्य तेज असलेल्या अनेक तेज तपस्विनी होऊन गेल्या ज्यांचे कार्यकर्तृत्व अनेक वर्ष प्रेरणादायी ठरत आहेत लोकमाता, राजमाता, पुण्यश्लोक, अशा बिरुदांनी प्रसिद्ध असलेल्या अहिल्याबाई होळकर यांचा आज जन्म दिन.

३१ मे १७२५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात चौंडी या गावी, चौंडी गावचे पाटील माणकोजी शिंदे व पत्नी सुशीलाबाई यांच्या पोटी जन्म झाला अहिल्याबाईचा. माणकोजी शिंदे हे पेशव्यांच्या दप्तरी आपले सैन्य आणि शस्त्रास्त्रे घेऊन मदत करत असत. त्याकाळी स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसताना ही आपल्या भावंडांबरोबर अहिल्याबाईंना घरीच लिहिण्या-वाचण्याचे शिक्षण मिळाले. त्याचबरोबर घोड्यावर बसणे, दांडपट्टा खेळणे, तीर मारणे, बंदुका व तलवार चालवण्याचे शिक्षण इ. त्यांना घरीच मिळाले.

एकदा अहिल्याबाई घोड्यावर बसून शेताकडे जात असताना वाटेत घोड्यावर बसून जाणारे दोन वाटसरू त्यांना दिसले. वाटसरूंनी त्यांच्याकडे पिण्यासाठी पाणी मिळेल का? अशी विचारणा केली ; तेव्हा अहिल्याबाईंनी त्यांना आपल्या शेतावर नेऊन फक्त पाणीच न देता भाकरी, कांदा आणि चटणी देऊन जेवू घातले. अहिल्याबाई म्हणाल्या, ‘ तहानलेल्यांना फक्त पाणीच न देता दोन घास आधी जेवू घालणे हा आमचा धर्म आहे.’. ते वाटसरू होते श्रीमंत बाजीराव पेशवे आणि सुभेदार मल्हारराव होळकर. या चिमुरड्या बालिकेचे चातुर्य आणि धाडस, बाणेदारपणा पाहून मल्हारराव होळकरानी आपला पुत्र खंडेरावांसाठी अहिल्येला मागणी घातली. आणि वयाच्या आठव्या वर्षी 20 मे 1733 रोजी पुण्यात अहिल्या-खंडेरावांचा विवाह संपन्न झाला झाला. इंदूरला सासरे मल्हारराव आणि सासू गौतमाबाई यांच्या छत्रछायेखाली अहिल्याबाईंचा संसार सुरू झाला.

मल्हारराव होळकरांनी अहिल्याबाईंना राज्यकारभार पाहण्याचे, राजनीती-युद्धांचे डावपेच, युद्धक्षेत्रावर कामगिरीची-युद्धनीतीची आखणी कशी करायची, प्रशासनावर पकड कशी असावी, न्यायदान कसे करावे याचे शिक्षण दिले. मल्हाररावांसोबत खंडेरावही युद्धावर जात असत. त्या वेळी राज्याचा महसूल वसूल करण्याचे, न्याय देण्याचे व धन, सेना, गोळाबारूद, रसद, तोफा, बैल व चाराबंदी इत्यादी कामे अहिल्याबाई स्वत: करू लागल्या होत्या.

खंडेरावांपासून त्यांना मालेराव आणि मुक्ताबाई ही दोन अपत्ये झाली. अहिल्याबाई राज्यकारभारात आपल्या पतीला मदत करीत असत, शिवाय त्यांच्यातील युद्ध आणि सैन्य कौशल्य उत्कृष्ट होण्यासाठी त्यांना सतत प्रोत्साहित देखील करीत असत. खंडेराव स्वतः उत्तम युद्धनिपुण होते. वडिलांच्या नेतृत्वात त्यांनी युद्धाचे कौशल्य प्राप्त केले होते. कुंभेरी येथील लढाईत खंडेरावाना वीरमरण प्राप्त झाले आणि वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी अहिल्याबाईंना वैधव्याला सामोरे जावे लागले. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या. पण सासरे मल्हारराव म्हणाले, “प्रजाहितासाठी तरी तुम्ही सती जाऊ नये. हे राज्य सांभाळायचे आहे.” आपल्या सासऱ्यांच्या इच्छेचा मान राखत सती न जाता त्यांनी राज्यकारभारावर आपले लक्ष केंद्रित केले. मल्हारराव ज्यावेळी मोहिमेवर असत, तेव्हा स्वतः अहिल्याबाई राज्याचा कारभार सांभाळीत असत.

मल्हारराव होळकरांना पेशव्यांनी इंदूर संस्थानची जहागीर दिली होती. दौलतीचा कारभार मोठा होता. पण १७६६ मध्ये त्यांचे हि निधन झाले आणि अहिल्याबाईंवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली. अठ्ठावीस वर्षे त्यांनी राज्यकारभाराचा गाडा सैन्याच्या सहकार्याने अतिशय कुशलपणे चालविला. तिजोरीत भर घालीत त्यांनी प्रजाहिताकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले. आपल्या प्रजेच्या रक्षणार्थ अहिल्याबाई सतत तत्पर रहात असत. युद्ध प्रसंगी हत्तीवर स्वार होऊन अहिल्याबाई पराक्रमी योध्याप्रमाणे लढाईत हि उतरत असत. ज्या सुमारास अहिल्याबाईंनी मावळ प्रांताची सूत्र आपल्या हातात घेतली त्यावेळी प्रांतात अशांततेचं वातावरण पसरलं होतं. राज्यात मोठ्या प्रमाणात चोरी, लुट, हत्या, या घटनांमध्ये वाढ झाली होती. यावर अंकुश आणण्यात अहिल्याबाईं यशस्वी झाल्या. आपल्या नेतृत्वात त्यांना प्रांतात शांतता आणि सुरक्षेचं वातावरण स्थापन करण्यात यश आलं.

आपली कन्या मुक्ताबाई हिचे लग्न करताना त्यांनी सर्वधर्म समभावाचा आदर्श परिपाठ आपल्या समोर ठेवला. आपल्या मुलीचे स्वयंवर घोषित करताना त्यांनी जाहीर केले की, जो कोणी चोर, लुटारु, दरोडेखोर यांचा राज्यात बंदोबस्त करील, त्या शूर व्यक्तीशी मुक्ताबाईचा विवाह लाविला जाईल. त्यावेळी जातपात बघितली जाणार नाही. हा अलौलिक विचार जाहीर करून त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी कृतीही तशीच केली. यशवंतराव फणसे या गुणी, शूर तरुणाशी त्यांनी मुलीचा विवाह करून दिला.

अहिल्याबाई एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्त्या होत्या. पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुरूप काही सुधारणा केल्या. करपद्धती सौम्य केली , न्याय देणारे पंच अधिकारी नेमले. जमीन करार-पट्ट्याने देण्याची पद्धत सुरू केली. राजधानी इंदूरहून नर्मदातीरी महेश्वूरला हलविली, नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर एका भव्य, शानदार आणि आलिशान राजवाड्याची निर्मिती केली. त्या काळी साहित्य, संगीत, कला, आणि उद्योग क्षेत्रात महेश्वर ओळखले जात होते. आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यात आणि त्याला समृद्ध बनविण्यासाठी अनेक विकासात्मक कामे त्यांनी केलीत.

अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला व पूर्वजांच्या स्मरणार्थ छत्र्या बांधल्या. अहिल्याबाईंनी अनेक धार्मिक आणि प्रसिद्ध तीर्थस्थळांचे निर्माणकार्य पूर्ण केले. अयोध्या, नाशिक, द्वारका, पुष्कर, हृषीकेश, जेजुरी, पंढरपूर, गया, उदेपूर, चौंढी येथे मंदिरे बांधली. यांशिवाय सोरटी सोमनाथ, ओंकारेश्वर, मल्लिकार्जुन, औंढानागनाथ, काशीविश्वेश्वर, विष्णुपाद, महाकाळेश्वर आदी मंदिरांचा जीर्णोद्धार केला.

अहिल्याबाईची शिव शंकरावर अपार श्रद्धा होती. आज ज्या काशी विश्वनाथ मंदिरा बद्द्ल वाद उपस्थित झाला आहे त्या काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाईनी 1777 साली केला होता.वाराणसी, प्रयाग, पुणतांबे, चौंढी, नाशिक, जांब (इंदूर), त्र्यंबकेश्वर येथे नदीला विस्तीर्ण घाट बांधले, गोकर्ण महाबळेश्वर, उज्जयिनी, रामेश्विर, भीमाशंकर आदी ठिकाणी अन्नछत्रे उघडली. सप्तपुरे-चार धाम या ठिकाणी घाट, बाग, मंदिरे, कुंडे, धर्मशाळा बांधून यात्रिकांची व्यवस्था केली.

अहिल्याबाई या दानशूर आणि उदार शासक होत्या, त्यांच्यात दया, करुणा, परोपकार ओतप्रोत भरलेले होते आपल्या शासनकाळात गरिबांकरता व भुकेलेल्यांसाठी त्यांनी अनेक अन्नछत्र उघडलीत. पाणपोया स्थापन केल्या. राज्यातून विहिरी खोदून त्या चिरेबंद बांधून दिल्या. जनावरांसाठी डोण्या बांधून घेतल्या. पशुपक्ष्यांसाठी रुग्णोपचारांची व्यवस्था केली. मुंग्यांना साखर आणि जलचरांना कणकेच्या गोळ्या खाऊ घालण्यापर्यंत त्यांचा दानधर्म सढळ होता. गोरगरिबांना सणासुदीला त्या अन्नदान करीत, कपडे वाटत, थंडीच्या दिवसात घोंगड्या वाटल्या जात. अशी अनेक कामे करत दातृत्वाचा उत्कृत्ठ आदर्श अहिल्याबाइनी आपल्या समोर ठेवला.

विधवा महिलांसाठी त्यांनी पुढाकार घेऊन त्या वेळच्या कायद्यात बदल घडवून आणले. त्या वेळीच्या कायद्याप्रमाणे मुलबाळ नसलेल्या विधवा महिलेची सर्व संपत्ती सरकारी खजिन्यात जमा होत असे अहिल्याबाईंनी या कायद्यात बदल करून महिलांना आपल्या पतीच्या संपत्तीचे वारसदार बनविले.

आपल्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या असंख्य अडचणीना, परिस्थितीला शरण न जाता त्या एकाकी झुंज देत लढत राहिल्या. प्रतिकूल परिस्थितीत देखील आपल्या प्रजेचा सांभाळ केला. करुणेचा सागर असलेल्या, समाजसेवेचे व्रत अंगिकारलेल्या अहिल्याबाईंनी समाजाकरता स्वतःला पूर्णतः समर्पित केले होते. त्या कायम आपल्या प्रजेचे आणि समाजाचे भले होण्याचा विचार करीत असत आणि त्या दृष्टीकोनातून कार्यरत रहात असत. म्हणूनच त्या राजमाता आणि लोकमाता म्हणून देखील ओळखल्या गेल्या. 13 ऑगस्ट 1795 साली त्या पंचत्त्वात विलीन झाल्या. एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव इतिहासात अजरामर झाले.

त्यांच्या महान कार्याला सलाम म्हणूनच त्याच्या कार्याच्या सन्मानार्थ भारत सरकारने १९९६ मध्ये त्यांचे चित्र असलेले डाक तिकीट प्रकाशीत केले.

🔸सौ. अपर्णा नागेश पाटील – महाशब्दे 🔸

Back to top button