Politics

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून जगदीप धनकड यांना उमेदवारी

१८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी विरोधी पक्ष तसेच सत्ताधारी पुरस्कृत उमेदवार समर्थनासाठी देशभर दौरे करत आहेत. असे असताना भाजपाने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. भाजपाने आज उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीए पुरस्कृत उमेदवाराची घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने पश्चिम बंगलाचे विद्यमान राज्यपाल जगदीप धनकड यांना उमेदवारी दिली आहे. 

जगदीप धनकड कोण आहेत?

जगदीप धनकड यांचा जन्म राजस्थानमध्ये झाला. त्यांनी चित्तोडगड येथील सैनिकी शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले. जयपूरमध्ये पदवीपर्य़ंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी वकिलीचेदेखील शिक्षण घेतलेले असून काही काळ वकिली केलेली आहे. १९८९ ते १९९१ या काळात ते जनता दल पक्षाकडून झुंझूनू मतदारसंघातून खासदार होते. त्यांनी काही काळ काँग्रेस पक्षामध्येही काम केलेले आहे. पुढे २००३ साली त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. २०१९ साली त्यांना पश्चिम बंगालच्या राज्यपलपदी नियुक्त करण्यात आले.

 पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपा यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रूत आहे. त्यानंतर भाजपाने पश्चिम बंगालचे राज्यपाल धनकड यांनाच उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची उमेदवारी दिल्यामुळे या निर्णयाचे वेगवेगळे राजकीय अर्थ लावले जात आहेत.

दरम्यान, देशाच्या १६ व्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ६ ऑगस्टला होणार आहे. तर १९ जुलै ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ येत्या १० ऑगस्ट रोजी समाप्त होणार आहे.

Back to top button