RSS

रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक विनायकराव कानेटकर यांचे निधन

पुणे, १८ जुलै.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक विनायक विश्वनाथ कानेटकर (वय ८३ वर्षे) यांचे सोमवार (१८ जुलै) रोजी सकाळी पुणे स्थित कौशिक आश्रमात वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
विनायकराव कानेटकर यांचा जन्म ५ सप्टेंबर १९३९ रोजी झाला. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी अर्थशास्त्रात एम.ए. केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ता म्हणून १९६१ ते १९६३ कालावधीत काम केल्यानंतर ते संघाचे पूर्णवेळ प्रचारक बनले. आधी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर व पन्हाळामध्ये काम केल्यानंतर १९६५ सालापासून ते आसाममध्ये प्रचारक म्हणून गेले. यादरम्यान त्यांनी कामरूप जिल्हा, गोहाटी नगर, तेजपुर विभाग आदी ठिकाणी काम केले.
कानेटकर यांनी १९८४ पासून १२ वर्षे आसामचे प्रांत सह बौद्धिक प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर ते १९९६ ते २००३ इतिहास संकलन योजनेमध्ये कार्यरत होते. तसेच २००३ ते २००७ भारतीय शिक्षण मंडळाचे अखिल भारतीय सह संघटन मंत्री आणि २००७ ते २०१६ अ. भा. संघटन मंत्री या नात्याने त्यांनी काम पाहिले. पाच दशकांहून अधिक काळ संघकार्य केल्यानंतर विनायक कानेटकर हे २०१६ मध्ये सर्व दायित्वापासून मुक्त झाले होते.
त्यानंतर कौशिक आश्रमात ते निवासास होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली.

कानेटकर यांच्याविषयी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे म्हणाले, की आसाम, पूर्वांचल यांसारख्या ठिकाणी ज्येष्ठ प्रचारक म्हणून काम केलेले विनायकराव शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिले. त्यांनी स्वतःला सदैव कार्यरत ठेवले. भारतीय शिक्षण प्रसारक मंडळी या शिक्षण संस्थेसाठी मोलाचे योगदान त्यांनी दिले. ज्यांना रा.स्व. संघ माहिती नाही अशा व्यक्तींना सहज गप्पांमधून संघ समजावून सांगण्याची त्यांची शैली वाखाणण्याजोगी होती. त्यांचे निधन ही माझ्यासाठी धक्कादायक बातमी आहे.

रा. स्व. संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रा. अनिरुद्ध देशपांडे म्हणाले, “विनायकराव कानेटकर यांचा माझा परिचय ते अभाविपचे काम काम करत होते तेव्हांपासून होता. पूर्वांचलमध्ये संघकार्यासाठी गेलेल्या पहिल्या काही कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा समावेश होता. आसामपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत आज जे संघाचे काम दिसते त्याची पायाभरणी करणाऱ्यांपैकी ते एक होते. अत्यंत विषम परिस्थितीत त्यांनी काम केले. कानेटकर हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. ते अत्यंत मृदू व्यक्तिमत्त्वाचे होते. भारतीय शिक्षण मंडळाचे अखिल भारतीय संघटन मंत्री म्हणून त्यांचे कार्य अधिक महत्त्वाचे होते. शिक्षणाचे भारतीयिकरण व्हावे, यासाठी त्यांचा आग्रह होता. त्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले. गेली काही वर्षे त्यांची प्रकृती ठीक नव्हती. तरी ते शाखेत यायचे आणि सर्वांना मार्गदर्शन करायचे. त्यांच्या जाण्याने आपण एका ज्येष्ठ कार्यकर्त्याला पारखे झालो.”

प्रबोधन मंचाचे पुणे महानगर संयोजक विनायक गोगटे म्हणाले, “विनायकजी कानेटकर प्रबोधन मंचाच्या प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून यायचे आणि एकदा झालेली ओळख कधी विसरले नाहीत.”
जम्मू काश्मीर अध्ययन केंद्राचे कार्यकर्ते मकरंद दिवेकर म्हणाले, कौशिक आश्रमात त्यांना भेटण्यास मी नेहमी जात… त्यांनी आसाममध्ये केलेले काम आणि अन्य विषयासंबंधी त्यांच्याशी भरपूर बोलणे व्हायचे. त्यातून ते मूळचे सांगलीचे असल्याने आणि मी स्वतः त्या भागातील असल्याने त्यांच्याशी मी अधिक मनमोकळे बोलणे व्हायचे. त्यांच्या अचानक जाण्याने आता या आठवणी माझ्यासोबत कायम राहतील. त्यांना माझ्याकडून शतःश नमन!!
दरम्यान रा.स्व. संघाच्या वतीने २४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

Back to top button