HinduismNews

कोजागरी पौर्णिमा

कोजागरी पौर्णिमेलाच कौमुदी पौर्णिमा देखील म्हणतात.

भारतीय भूमी सण-उत्सवांनी पूर्वापार समृद्ध असून इथल्या लोकमानसाने बदलत्या ऋतूची दखल आणि त्यानुसार सण साजरे करण्याची परंपरा रूढ केलेली आहे.आकाशातले चंद्र, सूर्य, तारका मानवी समाजाला अश्मयुगापासून आकर्षित करत असून त्यांच्याविषयीचा आदर भारतीय संस्कृतीने वेळोवेळी व्यक्त केलेला आहे. मोसमी पावसाने निरोप घेतल्यानंतर आकाशातले काळे ढग लोप पावतात आणि त्यामुळे निरभ्र आकाश लक्ष वेधून घेऊ लागते. हवेत आल्हाददायक गारवा निर्माण होतो आणि अशावेळी काळ्याकुट्ट अंधाराला भेदणारा चंद्रप्रकाश असेल तर रात्रीचे सौंदर्य अधिकच खुलून येते.

भारतीय लोकमानसाने वर्षभरातल्या बारा पौर्णिमा महत्वाच्या मानलेल्या असून प्रत्येक पौर्णिमेची सांगड सण-उत्सव त्याचप्रमाणे व्रत-वैकल्यांशी घातलेली आहे आणि त्यामुळेच येणाऱया प्रत्येक पोर्णिमेचे त्यांनी मनःपूर्वकरित्या स्वागत केलेले आहे. श्रावण हा हिरवाईमुळे ऋतू हिरवा, ऋतू बरवा’ म्हणून ओळखला जातो तर भाद्रपद म्हणजेच धन धान्यांच्या समृद्धीचे दर्शन घडविणारा तर भाद्रपदानंतर येणारा आश्विन समृद्धीचा मास म्हणून ओळखला जातो. आश्विनच्या प्रारंभीच घटस्थापनेद्वारे साजरा होणारा नवरात्रीचा उत्सव मातृपूजनाद्वारे आमचे नाते धरित्रीरूपी मातेशी समृद्ध करतो. कुठे सरस्वती, कुठे महिषासूरमर्दिनी तर कुठे महालक्ष्मी आदी देवतांना माता म्हणून पूजले जाते आणि भाविक नतमस्तक होतात. याच आश्विनातली पोर्णिमा कोजागरी पोर्णिमा (kojagiri pornima) म्हणून साजरी केली जाते.

आश्विनातील या पोर्णिमेच्या रात्री लक्ष्मी व ऐरावतावरती आसनस्थ झालेल्या इंद्राची पूजा करतात. त्यानंतर पोहे व नारळाचे पाणी देव-पितरांना अर्पण करून त्याचे सेवन आप्तेष्टांबरोबर करण्याची परंपरा आहे. पूर्ण कलांनी विकसित झालेल्या चंद्राला भारतीयांनी दैवत मानलेले असून कोजागरीला चंद्राची पूजा करून उपस्थितांना केशरी दूध दिले जाते. आश्विन पौर्णिमेच्या या उत्सवाला वात्स्यायनाने कोमुदी जागर तर वामन पुराणात त्याचा उल्लेख दीपदान जागर असा केलेला आहे.

चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह असून तो पृथ्वीभोवती फिरत असतो. सूर्याचा प्रकाश त्याच्यावर पडतो व तोच परावर्तित होऊन पृथ्वीवर येतो. त्यालाच ‘चांदणे’ अशी संज्ञा आहे.शरदात चंद्राच्या सोळाही कला विकसित होऊन पृथ्वी त्या रात्री शारदीय चंद्रकलेच्या वर्षावात न्हाते आणि त्याच चांगले परिणाम मानवी समाजावरती होतात, अशी लोकश्रद्धा रूढ आहे.

चंद्र किरणांतून अमृतधारा स्त्रवतात. चंद्राच्या ठिकाणी रोगनिवारक शक्ती असून कोजागरी पौर्णिमेला वारंवार चंद्रदर्शन केल्यास दृष्टी तीक्ष्ण होते, असे मानले जाते. तसेच या रात्री चंद्र किरणात दूध ठेवून ते प्राशन केले तर चंद्रामृत प्याल्याचे श्रेय लाभते. शीतल, सौम्य आणि सुंदर असल्याने चंद्र प्रिय मानलेला आहे. पावसाळी मोसमानंतर शरद ऋतुचे आगमन झाल्याची वर्दी कोजागरी पौर्णिमेच्या चांदण्याद्वारे लाभते आणि त्यासाठी इष्टमित्रांसह चांदण्या रात्री केशर घातलेले दूध पिण्याबरोबर नृत्य, गायन आदी कलांच्या सादरीकरणाचा आस्वाद घेण्याची परंपरा लोकमानसाने निर्माण केली. त्यातून निसर्गाविषयीचे प्रेम आणि आदर,सन्मान उत्कटपणे व्यक्त करण्याची वृत्ती दृष्टीस पडते.

Back to top button