NewsRSSकोकण प्रान्त

समाज परिवर्तनाच्या पाच आयामांवर संघ काम करेल – सरकार्यवाह दत्तात्रयजी होसबाळे

सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्वदेशी जीवनपद्धती आणि नागरी कर्तव्याप्रती जागरूकतेने समाजात बदल घडवून आणू.

सेवाकार्य व कुटुंब प्रबोधनाचे कार्य महिलांशिवाय निव्वळ अशक्य

राष्ट्राच्या ‘स्व’ आधारित पुनरुत्थानाचा संकल्प करूनच संघाची प्रतिनिधी सभा संपन्न झाली.

पानिपत | १४ मार्च : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या तीन दिवसीय बैठकीचा मंगळवारी समारोप झाला. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी अखेरच्या दिवशी पत्रकारांशी संवाद साधताना सर्वप्रथम देशातील प्रसिद्ध पत्रकार डॉ.वेदप्रताप वैदिक यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आणि श्रद्धांजली वाहिली. श्री.दत्तात्रय होसबळे म्हणाले की, प्रतिनिधी सभेच्या बैठकीत वार्षिक अहवालासह पुढील वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला. भारताची अमृतकाळाकडे वाटचाल आणि संघाच्या शताब्दी वर्षाकडे वाटचाल करताना हा प्रस्ताव समाजाला दिशा देण्याचे काम करेल. अशावेळी जेव्हा भारत वैश्विक नेतृत्वाच्या वाटेवर सातत्याने मार्गक्रमण करत आहे, तेव्हा त्याच्या वाटेवर काटे कोण पसरवू इच्छित आहेत, हे नागरिकांनी समजून घेतले पाहिजे.

राष्ट्राच्या उन्नतीच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संपूर्ण समाज कार्य करत राहील. श्री. होसबळे म्हणाले की, देशाच्या अमृतकाळात विमर्श बदलला पाहिजे, भारताच्या प्रश्नांवर भारताचीच उत्तरे हवीत. विकृत इतिहासाच्या जागी योग्य इतिहास सांगितला गेला पाहिजे आणि समकालीन रचना व्हायला हवी.

बैठकीत ठरावाव्यतिरिक्त महर्षी दयानंद सरस्वती यांची २०० वी जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष आणि भगवान महावीर यांच्या निर्वाणाचे २५५० वे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तीन निवेदनेही जारी करण्यात आली.

२०२५ च्या विजयादशमीपासून संघाचे शताब्दी वर्ष सुरू होत आहे, परंतु या प्रतिनिधी सभेत त्यासाठी कोणतीही कार्य योजना तयार करण्यात आलेली नसली तरी , कामाचा विस्तार आणि कामाची गुणवत्ता वाढविण्याची योजना नक्की तयार करण्यात आली असल्याचे सरकार्यवाह यांनी सांगितले. प्रत्येक ठिकाणची गावं व वस्त्यांची परिस्थिती अभ्यासून शाखेचे स्वयंसेवक समाजासोबत तेथील समस्यांवर उत्तर शोधण्याच्या दिशेने प्रयत्न करतील. असे प्रयोग आताही केले जात आहेत, ज्याची प्रतिनिधी सभेत चर्चा झाली. महत्त्वाची माहिती देताना दत्तात्रय होसबळे म्हणाले की, संघ आगामी काळात सामाजिक परिवर्तनाच्या पाच आयामांवर अधिक भर देणार आहे. या पाच आयामांमध्ये सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्वदेशी जीवनपद्धती आणि नागरी कर्तव्य समाविष्ट आहे. याबाबत श्री.होसबळे यांनी या कार्ययोजनेचा उद्देश समाजात भेदभावाविरुद्ध विमर्श मांडून समरसतेसाठी सातत्याने प्रयत्न करणे हा असल्याचे स्पष्ट केले. एका प्रश्नाच्या उत्तरात होसबळे म्हणाले की, समाजासाठी अस्पृश्यता हे पाप आणि कलंक असून त्याच्या निर्मूलनासाठी संघ कटिबद्ध आहे.

पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना होसबळे म्हणाले की, संघाला लोकसंख्येच्या असमतोलाची चिंता आहे, ज्याचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी केला आहेच. तसेच माजी मुख्य निवडणूक आयुक्त टीएन शेषन आणि महात्मा गांधी यांनीही केलेला आहे. राहुल गांधी यांनी संघावर केलेली टीका आणि भारतातील लोकशाही संपल्याचे वक्तव्य या प्रश्नावर होसबळे म्हणाले की, एका राजकीय पक्षाच्या ज्येष्ठ खासदाराने अधिक जबाबदारीने बोलले पाहिजे आणि ज्यांनी देशात आणीबाणीसाठी माफीही मागितली नाही, लोकशाहीबद्दल बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. संघाची हिंदु राष्ट्राची कल्पना ही सांस्कृतिक राष्ट्राची कल्पना असून त्याकडे भू-राजकीय सीमा असलेल्या ‘राज्य’ या संकल्पनेच्या आधारे पाहिले जाऊ नये, असे होसबळे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. एक सांस्कृतिक राष्ट्र म्हणून याकडे पाहिल्यास कोणताही भ्रम राहत नाही, कारण भारत हे या रूपात हिंदूराष्ट्रच आहे. आणखी एका प्रश्नाचे उत्तर देताना होसबळे म्हणाले की, समलिंगी विवाहाबाबत संघाचे स्पष्ट मत आहे की, विवाह हा स्त्री आणि पुरुष यांच्यात होणारा संस्कार आहे, कारण त्याचा उद्देश वैयक्तिक शारीरिक सुख नसून व्यापक सामाजिक हित आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह म्हणाले की, भारत आर्थिकदृष्ट्या झपाट्याने विकसित होत आहे, सामरिक आणि मुत्सद्दी आघाड्यांवरील वाढत्या महत्तेची सर्वांना जाणीव आहे, अशा वेळी भारतीय समाजाने सर्वांगीण विकासाचे ध्येय गाठण्याच्या दिशेने संघटित होऊन काम केले पाहिजे. देश-विदेशात अशा अनेक शक्ती आहेत ज्या भारताला या मार्गावर पुढे जाण्यापासून रोखू पाहत आहेत, पण ‘स्व’च्या जाणिवेसह आपल्याला एकत्र येत या शक्तींना निष्प्रभ करायचे आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची ही वार्षिक बैठक रविवार, १२ मार्च रोजी हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील, समालखा तालुक्यातील पट्टिकल्याणा गावातील सेवा साधना आणि ग्राम विकास केंद्राच्या परिसरात सुरू झाली. तीन दिवस चाललेल्या या बैठकीत देशातील विविध प्रांतातील प्रतिनिधी या विचारमंथनात सहभागी झाले होते. सभेच्या पहिल्या दिवशी संघाचा वार्षिक अहवाल सादर करण्यात आला. या अहवालानुसार संघाच्या शाखांची संख्या ६२ हजारांवरून ६८ हजार झाली आहे. येत्या वर्षभरात ही संख्या एक लाखांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. संघाच्या शाखांमध्ये तीन महिन्यातून एकदा पारिवारिक मिलन घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे. पत्रकार परिषदेत सुनील आंबेकर, नरेंद्र ठाकूर तसेच आलोक कुमार हेही उपस्थित होते.

Back to top button