CultureNewsSpecial Day

संत तुकारामांची ‘रामभक्ती’ रंगो रामनामी वाणी..

sant tukaram maharaj birth anniversary

वारकरी भक्तिपंथाच्या मंदिराचे ‘कळस’ संत तुकाराम महाराजांची विठ्ठलभक्ती महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे, पण त्यांची रामभक्ती अपरिचित आहे. त्यांच्या अभंगगाथेमध्ये 14 अभंगांचे ‘श्रीराम चरित्र’ नावाचे स्वतंत्र प्रकरण आहे. स्वतःस ‘राघवदास’ म्हणवून घेत त्यांनी अनेक अभंग लिहिलेले आहेत. ‘विठ्ठल’ आणि ‘राम’ या नामरूप भेदापलीकडचे व्यापक अद्वैत त्यांनी अभंगातून प्रतिपादिले आहे. नित्य रामजप हे जीवनमुक्तीचे अत्यंत सुलभ व श्रेष्ठ साधन आहे, असे तुकोबा म्हणतात.

संत तुकाराम विठ्ठलभक्त होते हे प्रसिद्ध आहे, पण ते रामभक्तही होते हे तितकेसे सर्वश्रुत नाही. वारकरी संप्रदायाचा आणि तुकोबांना स्वप्नदृष्टान्तात गुरुकडून लाभलेला मंत्रही ‘राम कृष्ण हरी’ हा असल्याने, रामभक्ती ही प्रत्येक वारकऱ्यामध्ये स्वाभाविकपणे दिसून येते, तशीच ती तुकोबांच्या अभंगामधून दिसून येते. तुकोबांच्या अभंगातून विशेषत्वाने जाणवणाऱ्या रामभक्तीविषयी डॉ. शं.दा. पेंडसे म्हणतात – ‘ही रामभक्ती संत एकनाथांकडून तुकोबांना मिळालेली दिसते. तुकोर्बानी साधकावस्थेमध्ये संत एकनाथांच्या ‘भावार्थ रामायण’ ग्रंथाचेही अध्ययन केले होते. याविषयी संत चरित्रकार महिपती (ताहराबादकर) म्हणतात –

प्रासादिक एकनाथांची वचने । जे का भावार्थ रामायण।

त्याचेही पाठांतर पूर्णी निजप्रीतीने करीतसे ॥

तुकोबांच्या अभंग गाथेमध्ये ‘रामचरित्र’ नामक जे 14 अभंग आहेत, त्यामध्ये रामगुणवर्णन आहे, रामचरित्रातील काही प्रमुख प्रसंगांचा उल्लेख आहे, रामनाम मंत्राची थोरवी आहे, रामराज्य आल्याचा आनंद आहे आणि सर्वांनी सोपा असलेला रामनाम मंत्र जप करून साधनेने, आराधनेने आपले जीवन मुक्त करून घ्यावे असा उपदेशही आहे. थोडक्यात तुकोबांचे हे केवळ 14 अभंगांचे छोटे प्रकरण काव्य ‘गागर में सागर’ अशा शाश्वत स्वरुपाचे मोठे उद्बोधक काव्य आहे.

ऐसा राम जप नित्य । तुका म्हणे जीवनमुक्त ॥

धूप-दीप राम, कृष्ण, हरी।

राम, कृष्ण, हरी। हा वारकरी भक्तिपंथाचा नाममंत्र आहे, हे सर्वविदित आहे. या नाममंत्रात विठ्ठलाचे थेट नाव नाही, तरी हा विठ्ठलभक्त वारकऱ्यांचा प्राणप्रिय नाममंत्र आहे, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. हा तीन नावांचा समावेश असलेला नाममंत्र हेच व्यापक, उदात्त, अद्वैत विचाराचे दर्शन आहे. ही समन्वयात्मक दृष्टी हेच वारकरी विचाराचे अधिष्ठान आहे.

‘या ‘राम कृष्ण हरी’ नाममंत्रातील प्रत्येक नावामागे एक भावार्थ आहे. ‘राम’ म्हणजे हृदयात रमविणारा, ‘कृष्ण’ म्हणजे आकर्षण करणारा आणि ‘हरी’ म्हणजे ऐक्यरूप परमात्मा’ असे डॉ. भा.पं. बहिरट म्हणतात. तसेच ‘राम’ म्हणजे आत्मज्ञान, ‘कृष्ण’ म्हणजे आत्मध्यान आणि हरी म्हणजे आत्मगान अशी ज्ञान- ध्यान-गान यांची त्रिपुटी म्हणजे ‘राम कृष्ण हरी’ हा नाममंत्र होय. म्हणूनच वारकरी कीर्तन भक्तिसेवेचा प्रारंभ ‘जय जय राम कृष्ण हरी’ या नामघोषाने होतो, तर वारकरी प्रवचन सेवेचा प्रारंभ ‘हरे राम, हरे राम, राम राम हरे हरे। हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे।’ या ध्यानघोषाने होतो. अशा प्रकारे ‘राम कृष्ण हरी’चे व्यापक माहात्म्य लक्षात घेऊन तुकोबा म्हणतात – ‘तुका म्हणे मज अवघे तुझे नाम। धूप- दीप राम कृष्ण हरी।’ आणि ही ‘राम कृष्ण हरी।’ नाममंत्राची उपासना, आराधना थेट निवृत्तीनाथ- ज्ञानदेव यांच्यापासून संत नामदेव, संत एकनाथ अशी परंपरेने संत तुकोबा, संत निळोबा, संत बहिणाबाईंपर्यंत निरंतर चालत आलेली आहे. ‘राम कृष्ण हरी।’ हा तुकोबांचा आवडता मंत्र आहे. तुकोबा या मंत्राबद्दल आपल्या गुरुपदेशपर अभंगात म्हणतात –

बाबाजी चैतन्य सांगितले नाम । मंत्र दिला ‘राम कृष्ण हरी॥

आवडीचा मंत्र सांगितला सोपा ।

नाममंत्र म्हणजे परमात्म्याच्या प्रेमस्वरुपास भावभक्तियुक्त आवाहन. या नाममंत्राने आईला हाक मारताना लेकराला जसा प्रेमाचा पान्हा फुटतो, तसाच भक्ताच्या मनात ईश्वराविषयी प्रीतीचा पान्हा फुटतो.

तुकोबांच्या रामचरित्रपर अभंगांतून श्रीरामाचे दोन प्रकारचे रामदर्शन

दोन प्रकारचे दर्शन आपणास घडते. रामायणातील अनेक प्रसंगांचा उल्लेख करीत तुकोबा दशरथपुत्र रामाचे गुण-सामर्थ्य वर्णन करतात आणि त्याच्या भक्तीकडे भाविकांना वळवितात. हे सगुण रामाचे दर्शन आहे. तसेच अन्य काही अभंगांतून तुकोबा निर्गुण परब्रह्म रामनामाचे माहात्म्य गात नामभक्तीच्या प्रचार- प्रसाराच्या उद्देशाने, राम नाम घेणे जीवन धन्य करणे कसे आहे त्याचा उपदेश करतात. ‘मी तो अल्प मतिहीन । काय वर्णं तुझे गुण।’ म्हणत तुकोबा ‘उदकी तारिले पाषाणा’, ‘कपिकुळे उद्धरिले।’, ‘शिळा होती मनुष्य जाली।’, ‘लंका दहन केली’ असे रामायणातील प्रसंग वर्णन करतात. अर्थात या प्रसंगांना मूळ वाल्मिकी रामायणाचा आधार नाही, पौराणिक रामकथांतून हे प्रसंग सर्व इतर संतांप्रमाणेच तुकोबांनी स्वीकारलेले आहेत. तुकोबांचे अभंग हे स्फुट लेखन आहे. प्रत्येक अभंग स्वतंत्र आहे. तुकोबा आपणास अथपासून इतिपर्यंत सलग रामकथा, रामचरित्र सांगत नाहीत. हे तुकोबांच्या रामचरित्रपर अभंगांचे स्वरूप आहे. भवसिंधुतारक रामनाम

तुकोबांनी विविध प्रकारे रामनाममंत्राचे माहात्म्य कथन केलेले आहे. या नाममंत्रासाठी काही आर्थिक मूल्य-पैसे मोजायचे नाहीत, ते मोफत आहे. त्यासाठी जाती-वर्णाचेही बंधन नाही. हे नाम घेण्याचा सर्वांना समान अधिकार आहे. हा सर्वात सोपा व उघडा मंत्र आहे.

नाम घेता न लगे मोल। नाममंत्र नाही खोल। दोचि अक्षराचे काम। उच्चारावे रामनाम ॥ नाही वर्ण धर्म याती। नामी अवघेचि सस्ती। तुका म्हणे नाम। चैतन्य निजधाम ॥ रामनाम म्हणा उघडा मंत्र जाणा। चुकती यातना गर्भवास। तुका म्हणे ऐक सुंदर मंत्र ऐक। भवसिंधुतारक रामनाम॥ रामनामाने यातना, गर्भवास चुकतो, साधक जीवन्मुक्त होतो. भवसागर तरून जाण्यास रामनाम हा तारक मंत्र आहे. ‘राम’ हा दोन अक्षरी मंत्र म्हणजे चैतन्याचे निजधाम आहे. हा तुकोबांचा स्वानुभव आहे.

राम म्हणता रामचि होईजे । पदी बैसोनी पदवी घेई जे॥

ऐसे सुख वचनी आहे। विश्वासे अनुभव पाहे॥

राम रसाचिया चवी । आत रस रुचती केवी ॥

तुका म्हणे चाखोनि सांगा। मज अनुभव आहे अंगे ॥

रामनामजपाने, चिंतनाने साधकाचा व्यक्तिविकास ही एक प्रक्रिया आहे. रामनामाच्या ध्यासाने साधक एकेक सोपान चढत चढत अखेर सिद्ध अवस्थेला पोहोचतो. ‘राम म्हणता रामचि होईजे।’ या ओळीतून तुकोबा हीच आध्यात्मिक वाटचाल सांगतात. संत नामदेवांनीही एका अभंगात ‘असेच राम राम म्हणत म्हणत एक दिवस साधक रामरूप होतो’ असे म्हटलेले आहे. तुकोबा हा संत नामदेवांचाच अवतार आहे, अशी भागवतभक्त भाविकांची श्रद्धा आहे, ती दोघांतील अशा अनेक साम्यांमुळेच. रामनामाला रसायन, रसराज असे अनेक कवींनी, संतांनी, सुभाषितकारांनी म्हटले आहे, तसेच तुकोबाही ‘रामनाम रसाची चव अनुपम असून त्या चवीनंतर सायऱ्या चवी, सारे रस निरस ठरतात’ असे म्हणतात आणि रामनामाच्या रसाचे अमृतपान स्वतः केल्यावर त्याविषयी तुकोबा कथन करतात. तुकोबांची सारी अभंगवाणीच अनुभवाचे अक्षरलेणे आहे. काही तरी लिहायचे म्हणून तुकोबा लिहीत नाहीत. ‘मज माझी झाली अनावर वाचा’, ‘मज विश्वंभर बोलवितो’ हे त्यांचे उद्गार त्यांच्या अभंगवाणीचा स्वानुभवाधिष्ठित साक्षात्कारी सच्चेपणा दर्शवितात.

रामनाम ठरावीक वेळी, मोजून मापून घेण्याची गोष्ट नाही, तर साधकाचे अवघे जीवन-कर्म राममय झाले पाहिजे. जेवताना, काम करताना, वाट चालताना असा नित्य जप केला पाहिजे, असे तुकोबा म्हणतात –

राम म्हणे ग्रासो ग्रासी । तो चि जेवला उपवासी ॥॥॥ धन्य धन्य ते शरीर। तीर्थाव्रतांचे माहेर ॥ राम म्हणे करिता धंदा। सुखसमाधि त्या सदा ॥

राम म्हणे वाट चाली। यज्ञ पाऊलापाऊली ॥ राम म्हणे भोगी त्यागी। कर्म न लिंपे त्या अंगी । ऐसा राम जपे नित्य। तुका म्हणे जीवनमुक्त ॥ (अ.क्र.1091)

ऐसा नित्य राम ध्याय। तुका वंदी त्याचे पाय॥ (अ.क्र.1099)

अशा प्रकारे रामनामाचा जप, ध्यान नित्य करणाऱ्या राममय झालेल्या साधकाचे मी चरण वंदीन असे तुकोबा म्हणतात आणि केवळ रामनामच नव्हे, तर रामनाम घेणारे साधक-भक्त हेसुद्धा तुकोबांना वंदनीय वाटतात, हा त्यांचा भाव लक्षात घेण्यासारखा आहे.

तुकोबांनी रामाला ‘स्वामी’, ‘दाता’, ‘सखा’ अशा वेगवेगळ्या संबोधनांनी संबोधलेले आहे. ‘तुकयास्वामी रघुनंदना।’, ‘तुका म्हणे राम माझा दाता।’, ‘तुकयास्वामी रघुनाथ।’ अशा प्रकारे रामाला एकदा रघुनंदन, एकदा रघुनाथ, एकदा रघुरामा म्हणतात. तसेच ‘राम जानकी जीवन’, ‘राम –

योगियांचे निजध्यान’, ‘राम राजीवलोचन’ अशा वेगवेगळ्या विशेषणांनी तुकोबा रामाच्या वेगवेगळ्या रुपाचा वेध घेतात.

रामाचे चरित्र रावणाच्या नावाशिवाय पूर्णच होत नाही. तुकोबांनी आपल्या 14 पैकी 3 अभंगांमध्ये राम-रावण संबंध, युद्ध आदीचा ऊहापोह केलेला आहे. ‘पैल आला राम, रावणासी सांगती।
या अभंगात तुकोबा लंकेतील नागरिक – लोकांची मते व्यक्त करतात. सागर पैलतिरी राम आला आहे, हे रावणा, झोपलास काय? ऊठ, अवघी लंका रामदूतांनी अंतर्बाह्य व्यापिली आहे. आता तू रामाला सरळ शरण जा, अन्यथा युद्धास सज्ज हो. केला रावणाचा वध। अवघा तोडिला संबंध॥ लंका राज्ये बिभिषणा। केली चिरकाल स्थापना ॥

औदार्याची सीमा। काय वर्ण रघुरामा ॥ तुका म्हणे माझा दाता। रामे सोडविली सीता। (अ.क्र. 1098)

रावणाचा वध करून रामाने स्वतः राज्यपदी न बसता बिभिषणाला ते राज्य दिले व औदार्याचे असीम दर्शन घडविले, सीतेला सोडविले असे वर्णन करून तुकोबा रामाला माझा दाता म्हणतात. जाले रामराज्य काय उणे आम्हासी रावणाचा वध करून दक्षिण दिग्विजयी राम सीतेसह अयोध्येत परत आल्याचे, अयोध्यावासीयांच्या आनंदाचे वर्णन तुकोबांनी ‘आनंदले लोक नर नारी परिवार।’ असे सुरेखपणे केले असून आणखी एका अभंगात ‘रामराज्य आले। आता आम्हास काहीच उणे नाही।’ असा परमानंद व्यक्त केला आहे. ‘जाले रामराज्य’ हा अभंग वाचताना संतसाहित्य परिचितांना संत रामदास स्वामींच्या ‘आनंदवन

भुवनी’ची आठवण होते. जाले रामराज्य काय उणे आम्हासी। धरणी धरी पीक, गाई वोळल्या हौसी ॥

राम वेळोवेळी आम्ही गाऊ ओविये। दळिता कांडिता जेविता गे बाईये ॥2॥

स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा । नामाच्या गजरे भय सुटले काळा ॥3॥

तुका म्हणे रामे सुख दिले आपुले । तया गर्भवासी येणे जाणे खुंटले ॥4॥ (अ.क्र.1101) रामराज्य’ म्हणजे भौतिक, पारमार्थिक आणि ‘

आध्यात्मिक उन्नतीचा उत्कर्ष. ऐहिक जीवनाची संपन्नता. सर्वत्र आनंदीआनंद. उत्तम हवा, अपेक्षेएवढा पाऊस, उत्तम पीक, गाईगुरांना भरपूर चारा, दूधदुभत्याचा सुकाळ, कशाची ना उणीव, ना भय, ना चिंता. तुकोबा एका ओळीत या अशा अवस्थेचे वर्णन करतात – ‘स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा।’ अहो वास्तवात तर नाहीच, पण स्वप्नातही प्रजेला दुःख दिसत नव्हते. आणि ही केवळ ऐहिक उपभोग संपन्नताच नव्हे, तर रामनामाच्या गजराची पारमार्थिक उन्नतीही समाजात होती. म्हणूनच तुकोबा उपरोक्त अभंगाची सुरुवातच ‘जाले रामराज्य काय उणे आम्हासी?’ अशा तृप्त उद्गारांनी करतात. जगामध्ये अनेक राज्यव्यवस्था आहेत व पूर्वी प्रचलित होत्या; पण ‘रामराज्य’ ही राज्याची सर्वोत्कृष्ट राज्यव्यवस्था म्हणून आजही मानली जाते. म. गांधी, विनोबा भावे आदी अनेकांनी आदर्श राज्यव्यवस्था म्हणून रामराज्याची स्तुती केलेली आहे. संत तुकोबासुद्धा हेच सांगतात राम राज्य, राम प्रजा लोकपाळ। एकचि सकळ दुजे नाही ॥

रामराज्यात’ राजा देव आणि प्रजाही देवच, अशी भावनात्मक समता आहे. प्रजा व राजा दोघेही समान आहेत अशी राज्यकर्त्यांची व समाजाची धारणा होती आणि ही राज्यव्यवस्था खऱ्या अर्थी प्रजानुकूल आदर्श राज्यव्यवस्था होती, अशा व्यापक अर्थाने रामराज्य झाल्याचा आनंद तुकोबांनी व्यक्त केलेला आहे. तुकोबांच्या आनंदालाही व्यापक सामाजिक सन्मुखता आहे, म्हणून एका अभंगात ते म्हणतात – ‘जाले रामराज्य काय उणे आम्हासी।’ आणि एका अभंगात तोच आंनद व्यक्त करताना म्हणतात – जाले रामराज्य आनंदली सकळे।

तुका म्हणे गाईवत्से नरनारीबाळे ॥3॥ (अ.क्र.1100) तुकोबांच्या या आनंदात नर, नारी, मुले आहेत, तसाच गाई-वासरांचा म्हणजे प्राण्यांचाही समावेश आहे. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ असे म्हणणाऱ्या तुकोबांच्या दृष्टीकोनाचा तो स्वाभाविक पैलू आहे. राघवदास तुकोबा

तुकोबा विठ्ठलाचे एकनिष्ठ भक्त आहेत आणि ही विठ्ठलभक्ती परंपरा त्यांचे पूर्वज ज्ञानदेव-नामदेव समकालीन विश्वभरबुवांपासून अनेक पिढ्या चालत आलेली होती. पण तुकोबांना विठ्ठलाएवढाच रामही प्राणप्रिय वाटत होता. गंमत म्हणजे विठ्ठलाच्या पायी डोके ठेवून’रंगो रामनामी वाणी।’ अशी मागणी- विनवणी करतात. तुकोबा आपणास एका अभंगामध्ये ‘राघवदास’ म्हणवून घेण्यात धन्यता मानतात.

तुझे नाम माझे मुखी असो देवा । विनवितो राघवदास तुझा।

‘तुकादास’ म्हणवून घेणाऱ्या तुकोबांचे असेच एक हिंदी पदसुद्धा प्रसिद्ध आहे. ‘तुका दास रामका। मन में एकहि भाव।’ तुकोबांची अनेक हिंदी पदे (काव्य) उपलब्ध आहेत.

तुकादास’ म्हणवून घेणाऱ्या तुकोबांचे असेच एक हिंदी पदसुद्धा प्रसिद्ध आहे. ‘तुका दास रामका। मन में एकहि भाव।’ तुकोबांची अनेक हिंदी पदे (काव्य) उपलब्ध आहेत.

विठ्ठलभक्त तुकोबांच्या अभंगवाणीतील हे रामदर्शन पाहून जागोजागी रामभक्त संत रामदास स्वामींच्या पदांची आठवण होते. दोघांच्या रामभक्तीतील साम्य पाहून आपण थक्क होतो. विठ्ठलभक्त तुकोबा जेवढे रामभक्त होते, तेवढेच रामभक्त रामदास विठ्ठलभक्त होते. संत रामदासांच्या विठ्ठलभक्तिपर विपुल काव्यरचना आहेत. संत तुकाराम व संत रामदास या समकालीन संतांच्या अंतरंग एकरूपतेचा धागा सकलांनी लक्षात घेतला पाहिजे. संत रामदासांनीच म्हटले आहे की – ‘साधू दिसती वेगळाले। परी अंतरी मिळालेले।’ हे व्यापक तत्त्व सर्वांनीच उमजून घेतले पाहिजे व भेदभावाचा क्षुद्र विचार टाकून रामभक्ती- विठ्ठलभक्ती अधिष्ठित सामाजिक एकोप्याला प्राधान्य दिले पाहिजे.

संत तुकारामांनी आपल्या अभंगातून प्रभू रामचंद्रांप्रमाणेच रामभक्त हनुमंतांचेही गुणगान केलेले आहे. तो एक लेखाचा वेगळा विषय होऊ शकतो.

‘रामनाम धन्य झालो, कृतकृत्य झालो’ असे कृतार्थतेच्या तृप्तीचे अनेक उद्गार तुकोबांच्या अभंगवाणीत आहेत.

रामनामाचे पवाडे। अखंड ज्याची वाचा पढे। धन्य तो एक संसारी। रामनाम जो उच्चारी। तुका म्हणे रामनामी। कृतकृत्य जालो आम्ही ॥

लेखक : – विद्याधर मा. ताठे

संत साहित्याचे अभ्यासक असून, एकता मासिकाचे माजी संपादक आहेत.

Back to top button