HinduismNewsRSS

‘क्रांतिदर्शी’ डॉ. हेडगेवार

१ एप्रिल १८८९ ! वर्षप्रतिपदा ! सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. मंगल वाद्य वाजत होते, महिला अंगणात सडे घालत होत्या – रांगोळी काढत होत्या, कोणी आंब्याच्या पानांचे तोरण बनवत होते तर कोणी गुढी साठी हार करत होतं. लहान मुलांमध्ये तर स्पर्धाच होती कोणाची गुढी उंच बांधली जाणार याची. सगळी कडे आनंदी आनंदच….

नागपुरातील बळीरामपंत हेडगेवारांच्या घरात त्या दिवशी आनंदाला पारावार उरला नाही. वर्षप्रतिपदेच्या मुहूर्तावर बळीरामपंत आणि रेवतीबाई हेडगेवार यांच्या घरी हेडगेवार घराण्याचे कुलदीपकच जन्माला आला. कोणी म्हणे, अहो हा शककर्त्या शालिवाहनाचा विजय दिवस त्याने जसे मातीच्या सैनिकांत प्राण फुंकून लढा दिला. हा बालकही तसेच काही तरी कार्य करेल आणि झालेही तसेच, निद्रिस्त अवस्थेत असलेल्या हिंदू समाजात प्राण फुंकून त्यांना राष्ट्राभिमानी, संघटित करण्यासाठी ज्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची संस्था सुरू केली, त्या डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचीच ही कहाणी.

केशव लहानपणापासूनच हुशार. स्तोत्र, श्लोक तोंड पाठ असत. लहान वयातच आपल्या भोवती मित्रांचा गराडा जमवण्याची कला त्यापाशी होती. मित्रांसोबत दंड बैठका, मल्लखांब अश्या सगळ्या गोष्टी सुरू असत . केशवच्या मनात उपजतच देशभक्ती होती. राणी व्हिक्टोरियाच्या वाढदिवसाची मिठाई फेकणे असो अथवा आपल्या मित्रांच्या मदतीने सीताबर्डीच्या किल्ल्यावरील युनियन जॅक उतरवण्यासाठी घरातून भुयार खणण्याचा प्रयत्न असो. परंतु या सर्व कामांसोबतच केशवचे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण सुद्धा व्यवस्थित सुरू होते.

पुढे वैद्यकीय शिक्षणासाठी ‘नॅशनल मेडिकल कॉलेज’ कलकत्त्याला जाण्याचे ठरविले. क्रांतिकारकांची भूमी असलेल्या बंगालमध्ये केशवराव केवळ वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेले असतील? छे छे… त्यांना नुसते माणसांच्या शरीराचे रोग दूर करायचे नव्हते, तर हिंदूंचे सर्व दुर्गुण दूर करून त्यांना सद्गुणी बनविण्याचा मार्ग शोधण्यासाठी ते तिथे गेले होते. कलकत्त्याला गेल्या पासूनच क्रांतिकारकांशी त्यांचे संबंध होते. नारायणराव सावरकर यांच्या सोबत क्रांतिकार्यात तेही सहभागी होते. कलकत्त्यात युगांतर व अनुशीलन समितीचे सदस्य बनले. या क्रांतिकारकांच्या चमुत डॉ हेडगेवार हे ‘कोकेन’ या गुप्त नावाने राहत.

बंगालमध्ये क्रांतिकार्य करण्यासोबतच १९१३ साली आलेल्या महापुरात रामकृष्ण मठातर्फे चालविण्यात आलेल्या सेवाकार्यात ते सहभागी झाले. या सर्व क्रांतिकार्यामुळे डॉक्टरांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ देतायेत नसे पण प्रगल्भ बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्तीच्या जोरावर परीक्षेत चांगले यश मिळवित. १९१४ मध्ये एल.एम अँड एस ने पदवीधर झाले . बँकॉक येथील चांगल्या पगाराची नोकरीची संधीही आली, परंतु आधीच देशासाठी सर्वस्व त्यागण्याचा निर्धार केल्यामुळे नागपूर येथे परतले.

वैद्यकीय शिक्षण संपवून नागपूरला परतल्यावर घरची आर्थिक परिस्थिती फारच हलाखीची होती. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी वैद्यकीय व्यवसाय लगेच सुरू करावा अशी इच्छा नातेवाईक-मित्र यांचे होती. काहींनी अगदी ठिकाण सुद्धा बघितले होते. शिवाय त्या काळात फारसे डॉक्टरही नसल्याने त्यांचे व्यवसायाला उज्वल भविष्यही होतेच. परंतु राष्ट्रासाठी जगणारे काही लोक हवेत सारेच खाणे-पिणे, घर-परिवार यात रमले तर देशाकडे कोण लक्ष देणार ? म्हणूनच जाणीवपूर्वक अविवाहित राहून देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करण्याचा निर्धार त्यांनी पूर्वीच केला होता.

त्या काळात देशात स्वातंत्र्य प्राप्तीसाठी प्रयत्न सुरू होते. विदर्भातील त्यावेळचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मुंजे, डॉ. परांजपे, नरकेसरी बॅ अभ्यंकर यांच्याशी डॉक्टरांचे फार जवळचे व मैत्रीपूर्ण संबंध होते. डॉक्टरांवर या लोकांचा फार विश्वास होता. याच काळात लो. टिळकांच्या निधनानंतर महात्मा गांधींच्या मार्गदर्शनात असहकार चळवळ सुरू झाली त्या आंदोलनात डॉक्टरांनी भाग घेतला. अनेक तरुणांना त्यांनी आंदोलनात सहभागी होण्यास सांगितले. या आंदोलनाचा परिणाम म्हणून १९ ऑगस्ट १९२१ ला डॉक्टरांना एक वर्षाची शिक्षा होऊन ते तुरुंगात गेले. डिसेंबर १९२० मध्ये नागपूर येथे होणाऱ्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनातील स्वयंसेवक दलाचे प्रमुख डॉक्टर होते… १००० – १२०० स्वयंसेवकांचे मंडळ डॉक्टरांनी तयार केले. स्वागत समितीचे सक्रीय कार्यकर्ते असल्याने त्यांच्या आग्रहावरून दोन प्रस्ताव नियोजन समितीत पाठवले ज्यात,

१- संपूर्ण स्वातंत्र्याचा आग्रह

२- काँग्रेसने त्यांचे ध्येय निश्चित करावे असे होते.

परंतु काँग्रेसचे त्या काळातील विचार व हिंदूंची केविलवाणी अवस्था पाहून त्यांना मनस्वी वाईट वाटायचे. या देशात विशुद्ध राष्ट्रीय विचाराची स्वातंत्र्यवादी चळवळ निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे असे त्यांच्या मनाने घेतले. संपूर्ण देशात हिन्दुत्वाने म्हणजेच राष्ट्रीयत्वाने भारावलेली सुसज्ज व देशाकरता प्राण देखील अर्पण्यास तयार असलेली सद्गुणी, सच्चरित्र, समंजस, देशप्रेमी अशी कार्यकर्त्यांची फळी उभारणे हे महत्त्वाचे गोष्ट हेरली. या दृष्टीने त्यांनी अनेकांशी बोलणे सुरू केले. सामाजिक, राजकीय नेते, तत्वज्ञ यांच्या बैठका घेतल्या. या सर्व विचारमंथनानंतर आसेतुहिमाचल राष्ट्रीयत्वाचा विचार करणारी संघटना निर्माण करायची आणि हे कार्य आपणच सुरू करावे हे त्यांच्या मनाने घेतले. श्री भाऊजी कावरे, अण्णा सोहोनी, बाळाजी हुद्दार इत्यादींना सोबत घेऊन २७ सप्टेंबर १९२५ विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली.

डॉ. हेडगेवार रात्रंदिवस संघाचे कार्य करत. सकाळ असो की संध्याकाळी, घरी असो की बाहेर त्यांच्या मनात सतत संघकार्याचे विचार घोळत. त्यांना स्वप्न पडले तरी ते सुद्धा संघकार्यासंबंधिच असायचे. हळू हळू संघात त्या त्या ठिकाणचे काँग्रेस व अन्य संघटनांचे कार्यकर्ते यायला लागलेत. चार-पाच वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात संघ शाखा सुरू. संघाची कार्यपद्धती, दैनंदिन कामाची रचना, महत्त्वाचे उत्सव आदी गोष्टी ठरल्या. १० नोव्हेंबर १९२९ ला मोहिते संघस्थानावरील सर्व स्वयंसेवकांच्या उपस्थितीत श्री.आप्पाजी जोशी यांनी डॉक्टरांना आद्य सरसंघचालक प्रणाम दिला.

संघाचे काम हळू हळू वाढत होते. अशातच एप्रिल १९३० मध्ये महात्मा गांधीजींच्या आवाहनानुसार ब्रिटिश सरकार विरोधात जंगल सत्याग्रहात भाग घेण्याचे डॉक्टरांनी ठरवले. परंतु संघाला राजकारणात न घेता वेगळे ठेवले तरच नुकत्याच सुरू झालेल्या संघटनेचे रक्षण होईल या हेतूने डॉक्टरांनी सरसंघचालक पदाची जबाबदारी डॉ.ल.वा.परांजपे यांच्या कडे सोपवली. सर्व स्वयंसेवकांना तशी जाहीर सूचना ही केली आणि त्यानंतर जंगल सत्याग्रहात सहभागी झाले. ४ महिन्यांची शिक्षा भोगून डॉक्टरांची जानेवारी १९३१ मध्ये सुटका झाली. त्यानंतर डॉ.ल.वा.परांजपे यांनी सरसंघचालक पद पुन्हा डॉ. हेडगेवारांना सुपूर्द केले. संपूर्ण देशभरात संघ कार्याची वाढ होण्यासाठी डॉक्टर अविश्रांत झटत.

भारतातील सर्व प्रांतात त्यांनी शिक्षणाच्या निमित्ताने तेथील संघ काम वाढवण्यासाठी स्वयंसेवकांना पाठविले. ते स्वतः मिळेल त्या वाहनाने गावोगावी जाऊन चांगले तरुण निवडून त्यांच्यात देशभक्ती उत्पन्न करत. वाढत्या संघटनेच्या दृष्टीने कोणते बदल आवश्यक आहे, याचा दूरदृष्टीने विचार करून सिंदी येथे त्या काळातील ज्येष्ठ स्वयंसेवकांसमवेत एक प्रदीर्घ बैठक घेतली. ३ दिवसांच्या त्या बैठकीत संघाच्या कामाचे स्वरूप, आचारपद्धती, रचना, दायित्व, प्रार्थना या सगळ्याचा उहापोह करून एक सुस्पष्ट संरचना तयार केली. डॉक्टरांचे द्रष्टेपण हेच की आपल्या नंतरही संघटना महत्त्वाची आहे हे प्रत्येक स्वयंसेवकाला वाटले पाहिजे. अशी ही रचना आजही संघ काम पूढे जाण्यासाठी उपयुक्त ठरते.

सततच्या या प्रवासाने आणि कष्टाने डॉ. वारंवार आजारी पडू लागले. १९४० साली डॉक्टरांची प्रकृती अधिकच विकोपाला गेली. तरी देखील १९४० च्या संघशिक्षा वर्गात येऊन त्यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. त्या संघ शिक्षा वर्गात भारतातील प्राय सर्व प्रांतातील स्वयंसेवक आले होते. जणू काही संपूर्ण भारतवर्षच तिथे बसले होते. त्या वर्गानंतर डॉक्टरांची तब्येत दिवसेंदिवस अधिकच खालावत गेली. डॉक्टरांना बहुदा आपल्या आयुष्याचा अंत दिसू लागला २१ जून १९४० साली हजारो स्वयंसेवकांचे आधार प्रेरणास्थान परमपूजनीय सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार परलोकी गेलेत.

डॉक्टर हेडगेवार हा लोक सोडून गेले असे आपणास वाटते. पण खरे पाहिले असता ते आजही जिवंत आहेत. कारण डॉक्टर हेडगेवार म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे डॉक्टर हेडगेवार ! आपण जर संघाच्या दैनंदिन शाखेत गेलो, तेथील कार्यक्रमांत समरस झालो, संघाचे काम जर आपण खऱ्या तळमळीने व तनमनधनपूर्वक केले तर डॉक्टर आजही आपणाला दिसतील. ते आपल्याशी बोलतील. ते आपल्या हृदयात येऊन बसतील. मात्र त्यासाठी आपण खऱ्या अर्थाने स्वयंसेवक बनले पाहिजे !

प.पू.डॉक्टरांनी सुरू केलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सारखा बलवान होतोय व त्यातून हिंदू राष्ट्राच्या वैभवाचा काळ जवळ येतो आहे यात शंका नाही. अश्या वेळी क्रांतिदर्शी डॉक्टर हेडगेवारांच्या जीवनातून आपल्याला आपले राष्ट्रीय कर्तव्य करण्याची प्रेरणा सतत मिळो.

पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

लेखक – प्रणव नागराज

साभार :- विश्व संवाद केंद्र देवगिरी

Back to top button