National SecurityNews

पाकिस्तानच्या आगळिकीला भारतीय लष्कराचे चोख प्रत्युत्तर, आठ सैनिकांना कंठस्नान

श्रीनगर, दि. १३ नोव्हेंबर – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी, १३ नोव्हेंबर रोजी पाकिस्नानने नियंत्रण रेषा ओलांडून विविध ठिकाणी शस्त्रसंधीचा भंग केला. भारताचे तीन जवान पाकिस्तानच्या हल्ल्यात हुतात्मा झाले. पाकिस्तानच्या या आगळिकीला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले असून पाकिस्तानचे सात ते आठ सैनिक ठार केले आहेत. त्याचप्रमाणे काही बंकर्स, लाँच पॅड्सही उद्ध्वस्त केली आहेत.

जम्मूकाश्मीर येथील गुरेज ते उरी या टप्प्यात पाकिस्तानने अनेक ठिकाणी शस्त्रसंधीचा भंग केला. या हल्ल्यात काही नागरिकांसह तीन जवानांचा मृत्यू झाला. बारामुल्ला येथे हुतात्मा झालेल्या जवानाचे नाव राकेश डोवल असून ते मूळ उत्तराखंडमधील गंगासागर येथील रहिवासी होते. बीएसएफ आर्टी रेजिमेंटमध्ये ते उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. दुपारी बाराच्या सुमारास पाकिस्तानकडून झाडण्यात आलेल्या गोळी त्यांच्या डोक्यात लागली. सव्वा वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले.

दरम्यान, शुक्रवार सकाळपासूनच काही चौक्यांवर संशयास्पद हालचाली दिसून येत होत्या. लष्कराच्या तुकड्या त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडत आहेत, असे लष्कराच्या वतीने सांगण्यात आले होते. चोख प्रत्युत्तर देऊन भारताच्या लष्कराने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकविला आहे.

Back to top button