CultureHinduism

पाकिस्तानात सापडले १३०० वर्ष जुने विष्णूचे मंदिर

इस्लामाबाद, दि. २० नोव्हेंबर – वायव्य पाकिस्तानातील स्वात जिल्ह्यात डोंगराळ भागात प्राचीन भारतीय मंदिर सापडले आहे. पाकिस्तानी आणि इतालवी पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या मते हे १३०० वर्ष जुने विष्णूचे मंदिर आहे. बारिकोट घुंडई येथे सुरू असलेल्या खोदकामादरम्यान या मंदिराचा शोध लागला. खैबर पख्तुनवा येथील पुरातत्त्व विभागाच्या फजले खलीक यांनी गुरुवारी या संबंधी घोषणा केली.

ते म्हणाले की, १३०० वर्षांपूर्वी हिंदूशाहीच्या काळात हे मंदिर बांधले गेले आहे. हिंदूशाही वा काबूलशाही(इ.स.८५०-१०२६) हा एक स्वतंत्र राजवंश होता. या राजवंशाने काबूल घाटी(पूर्व अफगाणिस्तान), गांधार(आधुनिक पाकिस्तान) आणि वर्तमानरालीन वायव्य भारतात राज्य केले होते. पुरातत्त्वतज्ज्ञांच्या मते खोदकामादरम्यान मंदिराजवळ छावणी आणि पहाऱ्यासाठी असणारे मीनारही सापडले आहेत.

गांधार संस्कृतीचे पहिले मंदिर

तज्ज्ञांना या मंदिराशेजारी एक पाण्याचे कुंडही सापडले आहे. बहुदा दर्शनार्थी मंदिरात जाण्यापूर्वी तेथे स्नान करत असावेत. खलीक म्हणाले की, या परिसरात प्रथमच हिंदूशाहीकालाचे पुरावे सापडले आहेत. इटलीच्या पुरातत्त्व मिशन प्रमुख डॉ. लुका म्हणाले की, स्वात जिल्ह्यातील गांधार संस्कृतीचे हे पहिलेच मंदिर आहे. स्वात जिल्ह्यात बौद्ध धर्माचीही अनेक पूजास्थळे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button