CultureNewsSpecial Day

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची रा. स्व. संघ शिबिरास भेट

babasaheb ambedkar jayanti 2024

रा. स्व. संघाद्वारे ज्या काळात देशभरात हिंदू संघटन म्हणून आपले कार्य वाढत होते व त्याच्य काळात तत्कालीन नेते, पुढारी, महापुरुष यांचा कुठे ना कुठे संघाशी संबंध येत होता. महात्मा गांधी यांनी संघाच्या शाखेस दिलेली भेट हे तर सर्वांना ठाऊक आहेच. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही संघाच्या पुणे येथील उन्हाळी शिबिरास भेट दिली होती. त्याचीही नोंद आढळते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निकटवर्तीय व तत्कालीन खासदार श्री. बाळासाहेब साळुंके (जे रा. स्व संघाचे सदस्य नव्हते) यांच्या मार्फत एका पुस्तकात या घटनेची नोंद आपल्याला दिसुन येते.

बाळासाहेब साळुंके यांच्या आठवणी व पत्र व्यवहार यांचा कश्यप साळुंखे द्वारा “आमचे साहेब” या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबतच्या अनेक स्मृतीचा विस्तृत उल्लेख आढळून येतो. त्यातच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघ शिबिराला भेटीच्या प्रसंगालाही उजाळा दिलेला आपणास दिसतो. या पुस्तकात पृष्ठ २५ आणि ५३ मधे सदर संदर्भ दिलेले आहेत. पृष्ठ २५ वर संघ भेटीला उजाळा देताना ते म्हणतात. ‘पुणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. हेडगेवार, संस्थापक रा. स्व संघ यांची भाऊसाहेब गडकरी यांच्या बंगल्यावर मुलाखत झाली. मग भाऊसाहेब अभ्यंकर यांनी श्री. बाळासाहेब साळुंके यांच्यासह भावे स्कूलमध्ये भरलेल्या स्वयंसेवक उन्हाळी शिबिरास भेटीसाठी नेले. ‘लष्करी शिस्त व संघटन’ या विषयावर बाबासाहेबांचे भाषण झाले.’ हाच संदर्भ पुन्हा पृष्ठ क्र. ५३ वर देखील आढळून येतो.

आपल्या कार्याप्रती एकनिष्ठ असतांना कुणाला हिणवणे व वैचारीक मतभेद बाळगणे यात आंबेडकरांना अजिबात रस नव्हता. बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचा स्विकार केल्यानंतर दीक्षाभूमी वरील १५ ऑक्टोबर १९५६ रोजीच्या भाषणात आपले स्पष्ट मत ही व्यक्त केले की ‘अनेकांनी मला असा प्रश्न केला, की धम्म प्रवर्तनासाठी नागपूरच का निवडले? रा. स्व. संघाचे मुख्य केंद्र नागपूर येथे असल्यानं त्यांना हिनवण्यासाठी का? तर हे मुळीच खरे नाही. आमचे कार्य इतके मोठे आहे की, आयुष्यात द्यावा तितका वेळ कमी पडेल. अस असताना कुणालाही हिनवावे म्हणुन तरी मजजवळ अजिबात वेळ नाही” असे ते म्हणाले होते. यावरून बाबसाहेबांची उदात्त विचारसरणी लक्षात येते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध हा केवळ अन्याय करणाऱ्यांसाठी असायचा. तर अन्याय व भेदभाव बाजूला सारत प्रगत एकजुट समाजाची निर्मिती हे त्यांचे ध्येय होते. या व्यतिरिक्त कुणालाही हिणवणे व भेदभाव जनक वक्तव्य करणे यासाठी त्यांना अजिबात वेळ नव्हता. ज्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आपण गुणगान गातो त्यांचे विचार किती व्यापक व सर्वसमावेशक होते हेच यावरून लक्षात येते.

साभार :- विश्व संवाद केंद्र, देवगिरी

Back to top button