HinduismRSS

आपल्या प्रदीर्घ गुलामगिरीची कारणे – डॉ. हेडगेवार यांचे मूलगामी विश्लेषण(लेखमाला – विश्वगुरु भारत – भाग ९)

देशाच्या स्वातंत्र्यासाठीच्या प्रत्येक चळवळीचा सखोल अभ्यास डॉ. हेडगेवार यांनी केलेला होता. काँग्रेसच्या एका जहालमतवादी नेत्याने सुरू केलेल्या रायफल असोसिएशनमध्ये युवकांना बंदूक चालविण्याचे आणि शत्रूला तोंड देण्याचे प्रशिक्षण दिले जात असे. डॉ. हेडगेवार यांनी डॉ. मुंजे यांच्यासोबत या प्रशिक्षणासाठी अनेक दिवस जंगलात व्यतित केले होते. या व्यतिरिक्त कलकत्त्यात असताना त्यांनी बंदूक चालविण्याचे आणि स्फोटके तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले होते.

राष्ट्रवादी पत्रकार – डॉ. हेडगेवार

अशीही एक वेळ होती जेव्हा संपूर्ण स्वातंत्र्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून चळवळ कशी पुढे न्यावी याबाबत प्रत्येक काँग्रेस नेत्याच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. त्यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये भारतीय संस्कृती वा राष्ट्रवादासारख्या गोष्टींना स्थान नव्हते. ब्रिटिशधार्जिण्या वातावरणात, ब्रिटिशांना खुले आव्हान देत भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठी डॉक्टरांनी नागपूर राष्ट्रीय संघटनेची स्थापना केली. संपूर्ण स्वातंत्र्याचे आपले ध्येय देशाच्या कोनाकोपऱ्यात पोहचविण्यासाठी डॉक्टरांनी आपल्या स्वातंत्र्यसैनिक सहकाऱ्यांच्या साथीने ‘स्वातंत्र्य प्रकाशन मंडळा’ची स्थापना केली. या प्रकाशनसंस्थेच्या अंतर्गत ‘स्वातंत्र्य’ हे दैनंदिन वृत्तपत्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्कालीन विदेशी शासनाचा दबाव आणि प्रतिकूल वातावरणात, संपूर्ण स्वातंत्र्यप्राप्तीसाठी समाजाचा आवाज बुलंद करणारे वृत्तपत्र प्रकाशित करणे तितकेसे सोपे नव्हते.
नागपुरातील चिटणीस पार्क येथे ‘स्वातंत्र्य’चे कार्यालय सुरू झाले. १९२४ च्या सुरुवातीस विश्वनाथ केळकर यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली हे वृत्तपत्र सुरू झाले. प्रकाशनसंस्थेच्या संचालक मंडळाच्या सदस्यांमध्ये डॉ. हेडगेवार यांचाही समावेश होता. तेच या प्रकल्पाचे मुख्य शिल्पकार होते असेही म्हणता येईल. ध्येयपूर्वक काम करता करणाऱ्या डॉक्टरांची आता एक प्रबळ आणि विचारप्रवर्तक लेखक अशीही ओळख निर्माण झाली. एकाच वेळी कठीण अशी अनेक कामे करत असताना त्याचा मोबदला म्हणून त्यांनी एक रुपयाही घेतला नाही. भांडवल आणि स्रोताच्या कमतरतेमुळे हे वृत्तपत्र जेमतेम वर्षभर प्रकाशित होऊ शकले व नंतर बंद झाले. पण या एका वर्षाच्या काळात भविष्यकालीन योजनांसाठी डॉक्टरांनी अनेक लेखक, साहित्यिक आणि पत्रकार यांच्याशी मैत्री केली.

काँग्रेसचे हिंदुत्वविरोध आणि तुष्टीकरणाचे धोरण यामुळे विभाजनाचा पाया घातला जाऊ लागला. याच काळात धर्मांध मुस्लिमांनी वायव्य प्रांत, सिंध पंजाबसह स्वतंत्र देशाची मागणी केली. अशा वेगाने बदलत्या परिस्थितीत भारत आणि भारतीयत्त्व वाचवायचे असेल तर सबळ संघटित हिंदू समाजाच्या उभारणीला पर्याय नाही याबद्दल अनेक राष्ट्रीय हिंदू नेत्यांच्या मनात कोणताही किंतू राहिला नाही. काँग्रेसच्याही अनेक हिंदू नेत्यांचे या विषयावर डॉ. हेडगेवार यांना खासगी स्तरावर पूर्ण समर्थन होते. भारतासंदर्भात हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व हे सर्वांना पटवून दिल्यानंतर डॉक्टरांनी असे अनेक प्रश्न चर्चेत आणले ज्यावर तत्पूर्वी कोणी विचारही केलेला नव्हता.

आपण आपले स्वातंत्र्य का गमावले?

आपला देश स्वतंत्र असायला हवा होता यावर सगळ्यांचे एकमत आहे. पण मग आपण स्वातंत्र्य कसे गमावले? विश्वगुरूला कलंक का लागला? एका महान आणि प्रचंड राष्ट्रात आलेल्या काही निवडक लूटारू परकीय आक्रमक येथे लूट, हत्याकांडे आणि बळजबरीने धर्मपरिवर्तन करण्यात यशस्वी कसे झाले? तुर्क, पठाण आणि मुघलांसारख्या आक्रमकांच्या हल्ल्यांपुढे, ब्रिटिश व्यापाऱ्यांपुढे आपले शूर सेनानी असणारे बलशाली सैन्य आणि शक्तिशाली राजे हतबल का झाले? आपले ज्ञान संपादन करणारे ग्रंथ, आपल्याला नीती आणि आध्यात्मिक मूल्ये शिकविणारी श्रद्धास्थाने यांची आपल्या डोळ्यांदेखत राखरांगोळी होत असताना आपण प्रतिकार का करू शकलो नाही? आपले काही शूर सेनानी शेवटपर्यंत झुंजत प्राणांचे बलिदान देत असतानाही आपण एका निशाणाखाली येत एक संघटित शक्ती म्हणून प्रत्युत्तर का देऊ शकलो नाही? राष्ट्रवादी नेत्यांसमोर डॉ. हेडगेवार यांनी पहिल्यांदाच हे प्रश्न उपस्थित केले होते. वरील सर्व प्रश्नांची उत्तरे ऐकून घेतल्यानंतर डॉक्टरांनी स्वतः केलेले सखोल विश्लेषण थोडक्यात सर्वांसमोर मांडले. विविध प्रकारच्या संघटना, राजकीय पक्ष, धार्मिक पंथ, आखाडे, क्रांतिकारकांचे गट इत्यादी संस्थांचे लक्ष्य निर्धारण व ते साध्य करण्याच्या पद्धती यांचे अध्ययन डॉक्टरांनी त्या-त्या संस्थांच्या उपक्रमातील सक्रिय सहभागातून केलेले होते हे आवर्जून सांगायला हवे. संघटित, शक्तिशाली आणि पुनरुत्थित हिंदू समाजच सुरक्षेची आणि टिकून राहणाऱ्या स्वातंत्र्याची हमी देऊ शकतो हाच त्यांच्या सखोल विश्लेषणाचा सारांश होता.

जेव्हा जेव्हा येथील मूळ समाज असणारा हिंदू हा असंघटित आणि अशक्त झाला तेव्हा तेव्हा भारताचा पराजय झाला आहे. पण जेव्हा हिंदूंनी एकत्रितरित्या आक्रमकांशी लढा दिला तेव्हा आक्रमक केवळ पराजितच नाही झाले तर येथील संस्कृतीच्या मुख्य प्रवाहात सामावून गेले. डॉक्टरांच्या मते, फुटीरतावादी शक्ती आणि विचारांचा वेळीच बीमोड केला नाही जेव्हा स्वातंत्र्य मिळेल तेव्हाही ते अल्पजीवीच ठरेल. त्यामुळे स्वातंत्र्यलढ्यामागे एका जोरकस सघन राष्ट्रीय जाणीवेची आवश्यकता आहे.

विविध सामाजिक, धार्मिक आणि क्रांतिकारक गटांच्या संघटन कौशल्य आणि कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास करून भारताच्या स्वातंत्र्यासाठी झगडणारे डॉ हेडगेवार हे एकमेव नेते होते. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, मदन मोहन मालवीय, भाई परमानंद, डॉ. मुंजे, नेताजी सुभाषचंद्र बोस, वीर सावरकर, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि भगतसिंह या सर्व नेत्यांच्या ते संपर्कात होते. डॉक्टरांनी काँग्रेसमध्ये काम करता करता त्यांची अंतर्गत कार्यपद्धती समजून घेतली होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून सुरू असलेली स्वातंत्र्य चळवळ ब्रिटिशांच्या योजनेनुसार हिंदूविरोधी शक्तींच्या कह्यात जात असल्याचेही त्यांच्या लक्षात आले होते. ठराविक समुदायाच्या तुष्टीकरणाचे धोरण अंतिमतः विभाजनाला प्रोत्साहन देणारे ठरते आणि त्यातून देशातील दुफळीचा पाया घालणाऱ्या वातावरणाच्या निर्मितीस सुरूवात झाली असल्याचेही त्यांना लक्षात आले होते.

प्रत्येक भारतीयाचे नागरिकत्व एकच

डॉ. हेडगेवार हे मुस्लिमविरोधी नव्हते. उलट अनेक राष्ट्रभक्त मुस्लीम त्यांचे घनिष्ट मित्र होते. हेडगेवारांना काळजी होती ती मुस्लिम समुदायाच्या एका गटातील वाढती धर्मांधता आणि हिंदुत्व विरोध यांची आणि तेच त्यांना प्रत्येकाच्या नजरेस आणून द्यायचे होते. डॉ. हेडगेवारांनी असे स्पष्ट प्रतिपादन केले की, येथील मूळ समाजात हत्याकांड आणि बळजबरीने धर्मपरिवर्तन करूनच परकीय आक्रमकांनी येथे स्वतःचे बस्तान बसविले. अनेक हिंदूनी त्यास ठाम विरोध केला, धर्मांतर होऊ नये म्हणून प्रसंगी प्राणांचे बलिदानही दिले. मात्र, जे आक्रमकांच्या रानटीपणाला बळी पडले ते केवळ धर्मांतरितच झाले नाहीत तर ते आपल्याच लोकांच्या विरोधात आक्रमकांच्या लूटमारीत, मंदिरे आणि अन्य धार्मिक स्थळे उद्ध्वस्त करण्यात सहभागी झाले. खरे पाहता आपल्या सनातन संस्कृतीचा त्याग करून धर्मांतरित झालेल्यांनी तात्पुरती धार्मिक गुलामी स्वतःच्या हाताने कायमस्वरुपी गुलामीत रुपांतरित करून घेतली. त्यांनी आक्रमकांची लूटमारीची संस्कृती स्वीकारली. भारतमातेच्या सुपुत्रांनी स्वतःच्या मातेचा त्याग करुन दुसऱ्याच्या मातेचा स्वीकार केला.

डॉ हेडगेवार यांच्या मते आजच्या मुस्लिमांनी फक्त आपली उपासनापद्धती बदलली आहे. उपासनापद्धती बदलली याचा अर्थ तुम्ही तुमचे पूर्वज आणि सनातन संस्कृती बदलली असा होत नाही. आपण हिंदू आणि मुस्लिम यांचे पूर्वज, संस्कृती, वैभवशाली इतिहास आणि अभिमानास्पद वारसा हे सर्व एकच आहे. त्यामुळे आपले राष्ट्रीयत्वही एक आहे.

स्वातंत्र्य चळवळीचे अज्ञात सेनानी, डॉ. हेडगेवार यांनी आपल्या सखोल विश्लेषणात स्पष्ट केले की, आपल्या देशाला कमीपणा हा मुस्लीम वा ब्रिटिशांमुळे आलेला नाही तर राष्ट्रीयत्व या संकल्पनेकडे पाहण्याची व्यक्तिगत राष्ट्रीय भावना लयाला गेली यामुळे ते घडले आहे. असंघटित, दिशाहीन व्यक्ती आणि राष्ट्रीय आदर्शांची कमतरता यामुळे कधीकाळी सातही खंडात परमवैभवाप्रत पोहोचलेल्या शक्तिशाली देशाची ही निराशाजनक स्थिती झाली आहे. डॉ. हेडगेवार यांच्या सखोल विश्लेषणाचा परिपाक म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.

पुढे चालू…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button