HinduismRSS

हेडगेवार-गांधी ऐतिहासिक संवाद(लेखमाला – विश्वगुरु भारत – भाग 13)

दुसरा कारावास भोगून तुरुंगातून बाहेर आल्यावर डॉ. हेडगेवारांनी सरसंघचालकपदाची जबाबदारी पुन्हा एकदा स्वीकारली आणि संघकार्य देशभरात पोहोचवण्यासाठी रात्रंदिन काम करण्यास सुरूवात केली. डॉ. हेडगेवार यांचे शारिरीक, मानसिक आणि बौद्धिक गुण स्वयंसेवकांमध्ये प्रकट होऊ लागले. डॉक्टर मुळातच मेहनती होते. त्यांच्याकडे प्रबळ इच्छाशक्ती आणि उच्चकोटीची बुद्धिमत्ताही होती. ढासळत्या तब्येतीकडे दुर्लक्ष करत स्वेच्छेने निस्वार्थपणे सेवा करण्याचा वाट त्यांनी निवडली. संघाचे मुख्य कार्य म्हणजे हिंदु राष्ट्र आणि हिंदुंना एकत्र आणणे आणि संघटित करणे यावर त्यांचा पूर्ण रोख होता.

डॉक्टरांच्या प्रेरणादायी संन्यस्त जीवनाची संघकार्याच्या प्रसारात मदत

कठोर परिश्रमांचा त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम झाला होता. आत्यंतिक व्यग्रतेमुळे त्यांना आपल्या दैनंदिन बाबींशीही तडजोड करावी लागत होती. दुपारी दोन-दोन वाजेपर्यंत न जेवणे, मध्यरात्री दोन वाजेपर्यंत बैठकांचे सत्र सुरू राहणे आणि लोकांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याबद्दलची मते – बव्हंशी कडवी टीका – शांतपणे ऐकून घेणे, हे त्यात नित्याचे होते. तरुण स्वयंसेवकांना प्रचारक म्हणून काम करण्यासाठी ते प्रवृत्त करत. दैनंदिन जीवनात हाच त्यांचा नित्यक्रम झाला होता. हिंदुहिताशी वचनबद्ध असणाऱ्या अनेक लहानसहान पक्ष आणि संघटना या संघात सामावल्या. लहान नद्या आणि जलप्रवाह ज्याप्रमाणे शक्तिशाली आणि पवित्र गंगेला येऊन मिळतात तशाच पद्धतीने या पक्ष-संघटना संघाशी एकरूप झाल्या. संघाची उद्दिष्टे आणि त्याची आवश्यकता मदन मोहन मालवीय, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, डॉ. आंबेडकर आणि महात्मा गांधी आदी राष्ट्रीय नेत्यांना पटवून देण्यात डॉक्टरजी यशस्वी झाले.

१९३४ सालच्या वर्ध्यातील संघाच्या शिबिराला गांधीजींनी दिलेली भेट हा त्यावेळी चर्चेचा विषय झाला होता. आपल्या विद्यार्थीदशेपासून डॉक्टरांना जवळून पाहिलेले नारायण हरी पालकर यांनी आपल्या १०६० साली प्रकाशित झालेल्या डॉ. हेडगेवार चरित्र या पुस्तकात गांधीजी आणि डॉक्टरांच्या भेटीचा उल्लेख  केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, स्वयंसेवक संघाच्या शिबिरात येताना स्वतःचा बिछाना, गणवेश, कपडे स्वतःच घेऊन येत असत आणि आपला खर्च आपण करत असत. परस्परांच्या सोबतीत पुढील तीन-चार दिवस लष्करी शिस्तीच्या उत्साहपूर्ण आणि आरोग्यपूर्ण वातावरणात व्यतित होत असत.  राहण्याचा व भोजनाचा सर्व खर्च स्वयंसेवक करत असत. गांधीजींचा ‘सत्याग्रह आश्रम’ हा संघाच्या शिबिरस्थानाजवळच होता. सकाळी फिरायला बाहेर पडल्यावर गांधीजींना स्वयंसेवक आपल्या शिबिरातील व्यवस्थापनाची कामे शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात व्यग्र असलेले दिसायचे. गांधीजींना शिबिराबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. ही कोणती संघटना आहे आणि त्यांचे हे अधिवेशन (शिबिर) कशाबद्दल आहे, अशी चौकशी त्यांनी केली.

२२ डिसेंबर रोजी आकर्षक कसरती आणि घोषांच्या प्रात्यक्षिकांनी शिबिराचे उद्घाटन झाले. गांधीजींनी त्यांचा निवास असलेल्या बंगल्यातून हा संपूर्ण कार्यक्रम पाहिला. आपली शिबिर पाहण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली. आपले सहकारी महादेव भाई यांना त्यांनी संघचालकांकडे पाठवून भेटीची इच्छा प्रकट केली. त्यानुसार शिबिरप्रमुख अप्पाजी जोशी यांनी गांधीजींची भेट घेतली आणि त्यांनी त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही वेळी शिबिरास भेट द्यावी, मात्र भेटी वेळ आधी कळवावी जेणेकरून त्यांचे स्वागत करता येईल, असे सांगितले. त्यावर आपण उद्या सकाळी सहा वाजता शिबिराला भेट देऊ आणि दीड तास शिबिरस्थळी थांबू, असे गांधीजींनी त्यांना सांगितले.

संघ शिबिरात महात्मा गांधी

दुसऱ्या दिवशी सकाळी ठीक सहा वाजता गांधीजी शिबिरास्थळी दाखल झाले. त्यांचे समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले. महादेवभाई देसाई, मीरा बेन आणि आश्रमातील अन्य काहीजणही गांधीजींसोबत होते. स्वयंसेवकांची प्रभावी प्रात्यक्षिके पाहिल्यानंतर गांधीजींनी आपण अत्यंत आनंदी झाल्याचे आणि अशी प्रात्यक्षिके देशभरात यापूर्वी कुठेही न पाहिल्याचे अप्पाजींना आवर्जून सांगितले. १५०० स्वयंसेवकांचे जेवण कोणतीही अडचण न येता एका तासाच्या आत तयार होते तसेच त्यासाठी प्रत्येकी केवळ एक रुपया आणि काही शिधा संकलित केला जातो, त्यात येणारी तूट स्वयंसेवक स्वतः भरून काढतात, हे ऐकल्यावर गांधीजी स्तिमित झाले.

नंतर ते स्वयंसेवकांची निवासाची सोय आणि दवाखाना पाहण्यास गेले. शेतकरी, मजूर अशा वेगवेगळ्या पेशातील तसेच ब्राह्मण, महार, मराठा अशा विविध जातींतील लोक स्वयंसेवक म्हणून शिबिरात सहभागी झालेली आहेत, असे त्यांना लक्षात आले. हे सारे स्वयंसेवक कुटुंबाप्रमाणे एकत्र राहतात आणि जेवणही एकाच रांगेत उभे राहून वाढून घेतात, हे त्यांना कळले. आपली उत्सुकता शमविण्यासाठी त्यांनी स्वयंसेवकांना जातीय भेदांबद्दल प्रश्न विचारले. स्वयंसेवक म्हणाले, जेव्हा ते संघशाखेत वा शिबिरात असतात तेव्हा ते आपली जातीची ओळख विसरून जातात. त्यामुळे कोणालाही स्वयंसेवकांची जात माहीत नसते. आपण सर्व हिंदू आहोत आणि  म्हणूनच एकमेकांचे बंधूही आहोत, असेही स्वयंसेवकांनी त्यांना सांगितले.

जातीपातींची भावना दूर सारणे आपल्याला कसे शक्य झाले, असे महात्मा गांधींनी अप्पाजी जोशी यांना विचारले. आपणही प्रयत्नपूर्वक अनेक संघटना चालवतो, परंतु जातीपातीचा भावना आणि अस्पृश्यता दूर सारणे अद्याप जमले नाही. संघात हे कठीण काम साध्य करण्याची क्षमता आहे हे पाहून मी चकित झालो, असेही ते जोशी यांना म्हणाले. अप्पाजी म्हणाले की, आपण सर्व हिंदू हे बांधव आहोत. त्यामुळे अर्थातच भेदाभेदाचा प्रश्नच उद्भवत नाही. एकदा ही भावना मनात तयार झाली की भेदाभेद नष्ट होतात. ही भावना कोणत्या भाषणातून तयार होत नसून ती वैयक्तिक अनुभव आणि  उदाहरणांतून साकार होते. याचे सर्व श्रेय जाते ते डॉ. हेडगेवार यांना. हे संभाषण सुरू असताना अचानक ध्वजारोहण कार्यक्रमाचे सूचन करणारे बिगूल वाजले. अप्पाजी आणि गांधीजी या दोघांनीही भगव्या ध्वजाला वंदन केले.

गांधीजी आणि डॉ. हेडगेवार यांच्यातील महत्त्वपूर्ण बैठक

संघाची कार्यपद्धती आणि विचारप्रवाह याबद्दल जाणून घेतल्यानंतर गांधीजींनी डॉ. हेडगेवार यांना भेटण्याची इच्छा प्रकट केली. डॉक्टर दुसऱ्याच दिवशी शिबिरात येणार होते. अप्पाजी जोशी आणि भोपटकर यांना सोबत घेऊन डॉक्टर गांधीजींना भेटण्यास त्यांच्या आश्रमात गेले. पुढील एक तास डॉक्टर आणि गांधीजी यांच्यात वैचारिक देवाणघेवाण झाली.

या भेटीदरम्यान चर्चेत आलेले काही महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे –

गांधीजींनी डॉ. हेडगेवार यांना विचारले की, जर तुम्ही प्रसिद्ध काँग्रेस पक्षात सक्रिय होतात तर मग संघाची स्थापना काँग्रेसच्या झेंड्याखाली का केली नाही? आपण ही संघटना स्वतंत्र्यपणे का सुरू केलीत? डॉक्टरांनी उत्तर दिले की, डॉ. परांजपे यांच्यासह त्यांनाही संघाची स्थापना काँग्रेस पक्षांतर्गतच करायची होती. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. पैशाच्या कमतरतेमुळे हे शक्य झाले नाही का असे गांधीजींनी कुतुहलापोटी विचारले. डॉ. हेडगेवार म्हणाले, पैसा हा मुद्दाच नव्हता. मुद्दा होता तो बिनशर्त  एकनिष्ठतेचा. काँग्रेसची स्थापनाच मुळात राजकीय कारणाने झाली होती.

काँग्रेसच्या कार्यक्रमांचे आयोजन हे केवळ राजकीय हेतू साध्य करण्यासाठी झालेले होते. त्यांना केवळ व्यासपीठ, मंडप आणि खुर्च्यांच्या रचनेसारख्या पायाभूत कामांसाठी स्वयंसेवकांची आवश्यकता होती. त्यांच्या शारिरीक आणि बौद्धिक विकासासाठी वा राष्ट्राप्रती असणाऱ्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी कॉंग्रेसकडे कोणताही कार्यक्रम नव्हता. केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघच दूरदर्शी दृष्टीकोनातून निःस्वार्थीपणे बहुसंख्यांचे नेतृत्व घडविण्यासाठी कार्यरत होता. बौद्धिक आणि शारिरीक क्षमतांचा विकास होत होत तळागाळातील स्वयंसेवकांची नेतृत्व म्हणून संघशाखांमध्ये जडणघडण होत होती.

डॉ. हेडगेवार त्यांना म्हणाले, आमचे स्वयंसेवक हे पैसे घेऊन खुर्च्या, व्यासपीठाच्या व्यवस्थांसाठी काम करत कोणाच्यातरी कृपादृष्टीची वाट पाहणारे आणि भविष्यात राजकीय क्षेत्रात कारकीर्द घडविण्याची मनीषा बाळगून असणारे कामगार नाहीत. आमच्या स्वयंसेवकांना शारिरीक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी प्रशिक्षित केले जाते. आमचे स्वयंसेवक देशाच्या सर्वांगीण विकासासाठी उत्साहाने निस्वार्थपणे काम करतात. हे सर्व काँग्रेसमध्ये शक्य झाले नसते.

गांधीजींना डॉक्टरांना ‘स्वयंसेवक’ ही संकल्पना स्पष्ट करण्यास सांगितले. ते म्हणाले, नेतृत्वक्षमता असलेली, राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व काही समर्पित करण्याबाबत वचनबद्ध असणारी व्यक्ती म्हणजे स्वयंसेवक. स्वयंसेवक म्हणून अशा नेतृत्वगुणांचा विकास करणे हे संघाचे काम आहे. हे सर्व माहिती असताना एकमेकांप्रत प्रेमाची आणि आदराची भावना असावी. इथे भेदाभेदाचा प्रश्नच उभा राहात नाही. पैसा आणि संसाधनांपलिकडील या वास्तवातच संघाच्या अपूर्व वृद्धीचे गमक आहे.

यावर गांधीजींनी समाधान व्यक्त केले आणि संघाच्या ध्येयपूर्तीतच राष्ट्राचे कल्याण असल्याचे डॉ. हेडगेवार यांना सांगितले. गांधीजींना संघाच्या आर्थिक स्रोतांबाबत काही शंका होत्या. संघाला जमनालाल बजाजांसारख्या काही धनिकांकडून देणग्या व निधी मिळतो का असे त्यांनी विचारले. तसे काही नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. भगव्या ध्वजासमोर दिल्या जाणाऱ्या गुरुदक्षिणेसारख्या आपापल्या योगदानातूनच संघाचे सर्व खर्च भागवले जातात. पुढे ते असेही म्हणाले की, एखादे काम महत्त्वपूर्ण असल्याचे समाजाला वाटले तर संघ त्यासाठी समाजाकडून आर्थिक मदत स्वीकारेल. लोकही मुक्त मनाने पैसे देतील. पण संघकार्याबाबत मात्र संघ आर्थिक बाबींमध्ये पूर्णपणे स्वावलंबी आहे.

संघाच्या कामासाठी बराच वेळ व्यतीत केल्यावर डॉक्टर हेडगेवार यांना आपल्या वैद्यकीय कार्यासाठी कसा वेळ मिळतो? हे जाणून घेण्याचीही गांधीजींना इच्छा होती. जेव्हा डॉक्टरांनी आपण वैद्यकीय व्यवसाय करीत नसल्याचे सांगितले तेव्हा, मग आपण आपल्या कुटुंबाचा चरितार्थ कसा चालविता? हा गांधीजींचा स्वाभाविक सवाल होता. डॉक्टर म्हणाले की मी विवाहच केला नाही. ते उत्तर ऐकून गांधीजी थक्क झाले. गांधीजींचा निरोप घेताना डॉ. हेडगेवार त्यांना म्हणाले की, मी आपला फार वेळ घेतला. आपल्या आशीर्वादाने संघ आपले ध्येय नक्कीच पूर्ण करेल. गांधीजी उठले आणि डॉक्टरांना सोडण्यास आश्रमाच्या दारापर्यंत आले. दृढ व्यक्तिमत्त्व आणि अंगिकृत कार्याबाबतच्या ठाम विश्वासाच्या बळावर आपले ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल, असे गांधीजींनी डॉक्टरांना निरोप देताना सांगितले.

गांधीजींची संघशाखेला पहिली भेट

द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरूजी यांना भेटण्याची इच्छा गांधीजींनी सप्टेंबर १९४७ मध्ये व्यक्त केली होती हे ही आवर्जून सांगायला हवे. संघाच्या वाढत्या प्रभावाची कल्पना गांधीजींना होती. गांधीजीच्या इच्छेबाबत समजताच गुरुजी दिल्लीला गेले आणि बिर्ला भवनात त्यांची भेट घेतली. गांधीजींनी स्वयंसेवकांना एखाद्या कार्यक्रमात संबोधित करण्याची इच्छा त्यावेळी बोलून दाखवली.

१६ सप्टेंबर १९४७ रोजी बिर्ला भवन शेजारील भंगी वस्तीत ५०० स्वयंसेवकांसमोर गांधीजींचे भाषण झाले. आपल्या भाषणात त्यांनी संघ आणि त्याच्या ध्येयाचे मुक्तपणे कौतुक केले. दुसऱ्या दिवशी ‘द हिंदू’ या राष्ट्रीय स्तरावरील दैनिकाने या कार्यक्रमाचे वृत्तांकन छापले होते. त्यात लिहिले होते की, अनेक वर्षांपूर्वी, डॉ. हडगेवार हयात असताना गांधीजी रा. स्व. संघाच्या प्रशिक्षण वर्गाला उपस्थित होते. तेथील शिस्त, साधेपणा आणि अस्पृश्यतेला आधार नसणे हे पाहून ते अत्यंत आनंदी झाले होते. तेव्हापासून संघ वृद्धिंगत होत राहिला आहे. सेवा आणि समर्पण भावाने प्रेरित असलेली ही संघटना दिवसेंदिवस वाढत जाईल असा विश्वास गांधीजींनी व्यक्त केला.

……क्रमशः

(लेखक पत्रकार व स्तंभलेखक आहेत)

**

Back to top button