OpinionSeva

एका ध्येयसाधकाच्या जीवनाचा कॅलिडोस्कोप – ‘अनंता’नुभव

अनंता’नुभव –  डॉ. अनंत कुलकर्णी

शब्दांकन :- सुधीर जोगळेकर

प्रस्तावना :- डॉ. अशोक कुकडे

वैद्यकीय क्षेत्र हा सेवेचा विषय होऊ शकतो आणि त्याचा अनेक अंगांनी विचार होऊ शकतो असा विचार करणारे अनेक व्यक्ती आणि संस्था  समाजात बघत असतो. सामान्य माणसाला वैद्यकीय क्षेत्रातले भलेबुरे अनुभव बरेचदा येत असतात. साधारण ३५ चाळीस वर्षांपूर्वी अशा बुऱ्या अनुभवांचा भल्या अनुभवात बदल करण्याचा विचार मनाशी ठरवून एमबीबीएस झालेला एक तरुण डॉक्टर व्यवसाय न करता एका ध्येयाने प्रेरित होतो, कोणताही आर्थिक विचार न करता  वंचित, दुर्गम भागातील वनवासींची रुग्ण सेवा करण्याचा निर्णय घेतो त्याची ही कथा आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह सुरेश उपाख्य भय्याजी जोशी यांच्या हस्ते ‘अनंता’नुभव या पुस्तकाचे प्रकाशन यशवंत भवन येथे होणार आहे. त्यानिमित्ताने या पुस्तकाचा घेतलेला आढावा.

सुरुवातीला जव्हार मोखाडा भागातील वनवासी बांधवांसाठी काम करणाऱ्या “प्रगती प्रतिष्ठान” या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून कामाची सुरुवात करून तिथल्या कामाचा, अनुभवांचा, संस्थेच्या धुरिणांनी केलेल्या मार्गदर्शनाचा व्यापक विचार आणि सखोल चिंतन करून जनकल्याण समितीमार्फत आरोग्यारक्षक आणि रक्तपेढी यांचे जाळे अनुक्रमे दुर्गम वनवासी भागात आणि नागरी भागात विणून आरोग्यसेवेच्या कामाचा ठोस तसेच पथदर्शक आराखडा समाजासमोर ठेवतो, त्याचा एक सुंदर कॅलिडोस्कोप म्हणजे डॉ. अनंतराव कुलकर्णी यांच्या अनुभवावर आधारित “अनंतानुभव” हे पुस्तक !

हे पुस्तक हातात आलं आणि डॉ. अशोकराव कुकडे यांनी प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे “हे निवेदन अत्यंत प्रभावी, हृदयस्पर्शी, ओघवते व म्हणूनच परिणामकारी झाले आहे. एकदा वाचन सुरू झाल्यावर पूर्ण करेपर्यंत खाली ठेवावे असे वाटणार नाही” याची प्रचिती आली. “दर्जेदार वाङ़मयाशी स्नेह” हे बिरूद बाळगणाऱ्या स्नेहल प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे.

हे समृध्द “अनुभव संचित” अधिक सकस होण्यात हातभार लावला आहे तो डॉ. कुकडे यांच्या छोटेखानी पण महत्त्वपूर्ण अशा प्रस्तावनेने ! कारण हा माणूस हा एक “ध्येयसाधक” आहे, वैद्यकीय क्षेत्रातील आहे आणि रुग्णसेवा करायची म्हणून पुण्यासारख्या शहरापासून लांब लातूरसारख्या तेव्हाच्या तुलनेने अविकसित भागात जाऊन आज “प्रथितयश” म्हणून नावाजलेल्या विवेकानंद रुग्णालयाचे ते एक आधारस्तंभ आहेत.

संघाने अनेक कार्यकर्त्यांना घडवले पण त्यांना फेसलेस ठेवले हे जरी संघटनेच्या जडणघडणीच्या दृष्टीने आवश्यक असले तरी गेल्या काही वर्षात परिस्थिती बदलली आहे. अनेक प्रचारक, गृहस्थी कार्यकर्ते यांच्या अनुभव संचिताने संघ साहित्यात मोलाची भर घातली आहे. हे पुस्तकही त्या अनुभव विश्वात भर घालणारे आहे.

या पुस्तकाचे मोल  केवळ ते  प्रेरणादायी आहे एवढ्यापुरतंच मर्यादित  नाही तर सार्वजनिक काम करताना कार्यकर्त्याने कसे वागावे? कधी नम्र तर कधी आक्रमक होऊन प्रसंगाना सामोरे जावे याचे अनेक जिवंत अनुभव या पुस्तकात ठायी ठायी आढळतात म्हणून ते ‘मार्गदर्शनपर’ असेही त्याचे महत्त्व आहे.

“तब्बल ३५ वर्षे स्वयंसेवी संस्थांसाठी वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या कार्याचे अनुभवांकन” कशासाठी याची नेमकी भूमिका डॉ. अनंतरावांच्या मनोगतात स्पष्ट होते. असे अनुभव अनंतरावांनी जे जे काही घडले ते  ते तसेच कागदावर उतरवावेत असा आग्रह मित्रांनी केला म्हणून लिहिले. दैनंदिनी स्वरूपात काही न लिहिताही अचूकता यावी म्हणून तारखा, जागा, प्रसंग, माणसे याची अचूकता राहावी म्हणून केवळ स्मरणशक्तीवर विसंबून न राहता त्यांनी मेहेनत घेतली हे विशेष !

अनुभव पाठीशी असले तरी ते शब्दबद्ध करण्याची कला सर्वांना अवगत असते असे नाही. मुळात विनम्रता असल्याने  ह्या अनुभवांना शैलीदार भाषा आणि उत्तम संपादकीय संस्कार होणं आवश्यक आहे हे लक्षात आणून दिल्यावर ते योग्य हातात जाणं महत्त्वाचं असतं. अभिप्रायासाठी म्हणून आलेल्या टिपणांचे उत्तम शब्दांकन आणि संकलन करण्याचं महत्त्वाचं काम सिद्धहस्त पत्रकार,संपादक आणि असा मोठा अनुभव असणारे सुधीर जोगळेकर यांनी ते लीलया केलंय. पुस्तक प्रवाही होण्यात त्यांचा हातभार मोठा आहे.

एकूण १६ प्रकरणे असलेले हे पुस्तक आणि पुस्तकाच्या शेवटी वर उल्लेख केलेल्या दुर्गम वनवासी भागात काम करणाऱ्या ‘प्रगती प्रतिष्ठान’ या संस्थेपासून डॉक्टरांनी सुरुवात केली आणि जिथून स्वेच्छानिवृत्ती घेतली त्या ‘जनकल्याण समिती’ची सेवाकार्य यांच्या विद्यमान स्थितीवर दृष्टीक्षेप, आणि रक्तपेढ्यांच्या कार्याचा संख्यात्मक आढावा घेतल्याने ह्या पुस्तकाचे महत्त्व वाढले आहेच पण ती केवळ आकडेवारी न राहता  आपण केलेल्या समाज कामाचा स्वच्छ आरसा अनंतरावांनी  आपल्यासमोर ठेवलाय.

वैद्यकीय क्षेत्रातले अनुभव या पुरती या पुस्तकाची व्याप्ती नाही तर अनंतरावांच्या सहवासात आलेल्या,सहकारी असलेल्या, मार्गदर्शन करणाऱ्या अनेकांची व्यक्तिचित्रे तर  यात आहेतच पण वनवासी विकास, त्यांच्यातलं नेतृत्व, ग्रामविकास, आरोग्य रक्षक योजना, शिक्षण, स्वावलंबन, स्वच्छता, आरोग्यसेवेचे विविध आयाम ( अंधश्रद्धा निर्मूलन ते रक्तदान)या संबंधीचे जिवंत अनुभव हे या पुस्तकाचे बलस्थान आहे. केवळ अनंत या नावाच्या व्यक्तीचे अनुभव म्हणून  “अनंतानुभव” हे नाव समर्पक आहेच पण संख्यावाचक शब्द म्हणूनही इथे लिहिलेले अनेक अनुभव, प्रसंग ठायी ठायी वाचायला मिळतात म्हणून  ह्यातले अनुभव हे बहुपेडी असे आहेत.

सामान्य वनवासी स्त्री – पुरुष,ग्रामीण, शहरी, अशिक्षित, सुशिक्षित नागरिक, स्थानिक –  राज्यस्तरीय पुढारी, वन विभाग – आरोग्य विभागाचे शासकीय अधिकारी, सरकारी यंत्रणा यांच्या संबंधताले एकेक अनुभव वाचून कधी गलबलायला होतं, डोळ्याच्या कडा ओल्या होतात,समाजाची स्थिती वाचून वाईट वाटतं तर कधी समाजाचा,व्यक्तींचा पुढाकार बघून ऊर अभिमानाने भरून येतो,  कधी राग येतो तर कधी अंतर्मुख व्हायला होतं.

हे “अनुभवामृत”  तर आहेच पण एका समर्पित कार्यकर्त्यांच निर्अभिनिवेशी असं “नम्र निवेदन” आहे.

(स्नेहल प्रकाशन, प्रथमावृत्ती,

५ सप्टेंबर २०२०, किंमत ३००/- ₹ )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button