NewsRSS

संघकार्याच्या विकासाचा सक्रिय साक्षीदार हरपला – रा. स्व. संघ

रा. स्व. संघाचे माजी बौद्धिक व प्रचार प्रमुख माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य यांचे शनिवारी दुपारी साडेतीन वाजता निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते. संघातील, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी बाबुराव वैद्य यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व सरकार्यवाह सुरेश उपाख्य भैय्याजी जोशी यांनी संघकार्याचा सक्रिय साक्षीदार हरपल्याची भावना संघाच्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.

माधव गोविंद उपाख्य बाबूराव वैद्य यांच्या निधनाने आम्हा कार्यकर्त्यांचे छत्र हरपले आहे, अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया सरसंघचालकांच्या शोकसंदेशात व्यक्त करण्यात आली आहे. या शोकसंदेशात म्हटले आहे की, संस्कृतचे प्रगाढ विद्वान, उत्तम पत्रकार, विधान परिषदेचे सक्रिय सदस्य, उत्कृष्ट साहित्यिक असे बहुआयामी प्रतिभावंत असणाऱ्या बाबूरावांनी आपली ही सर्व गुणसंपदा संघाला समर्पित केली होती. ते संघकार्याच्या विकासाचे सक्रिय साक्षीदार होते. वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि उपजीविका या चारही आयामांमध्ये संघसंस्कार अभिव्यक्त करणारे असे त्यांचे संघानुलक्षी, संपन्न आणि सुंदर गृहस्थजीवन होते. सोप्या शब्दांत सांगायचे तर तर्कशुद्ध रीतीने आणि अनुभूतीजन्य विवेचनाने त्यांनी आपली वाणी आणि लेखणी या माध्यमातून संघाला संपूर्ण जगापुढे मांडले. त्यांची पुढची पिढीदेखील देशहितासाठी तशाच पद्धतीने आपले जीवन जगत आहे. त्यांचे दोन सुपुत्र मनमोहन आणि श्रीराम हे देखील संघाचे वरीष्ठ प्रचारक आहेत.

अशा आदर्श व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने एक पोकळी निर्माण होते. वैद्य यांच्या संपूर्ण कुटुंबास आज एक मोठे छत्र गमावल्याचा अनुभव येत असेल. त्यांचे आणि आम्हा सर्वांचे सांत्वन करणे हे कठीण आहे. बाबूरावांचे आयुष्य आपल्याला प्रत्येक परिस्थितीत अविचल राहून, न डगमगता कर्तव्यपालन करण्यास शिकवते. त्यांची ही शिकवण आचरणात आणत, या दुर्धर प्रसंगास तोंड देण्याचे धैर्य आपल्याला आणि वैद्य कुटुंबाला प्राप्त व्हावे. तसेच दिवंगताच्या आत्म्यास त्याच्या जीवनतपस्येच्या अधिकारानुसार शांती व गती मिळावी हीच प्रार्थना, अशा शब्दांत बाबूराव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे, द्रष्टे विचारवंत, संपादक, निर्भीड लेखक व जाज्वल्य राष्ट्रप्रेमी श्री मा. गो. वैद्य यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. श्री वैद्य यांनी आपल्या विचारांमधून तसेच प्रखर लेखणीतून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर समाजाचे सातत्यपूर्ण प्रबोधन केले. निष्ठावान स्वयंसेवक असलेल्या मा.गो. वैद्य यांनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारधन जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी वेचले. ‘तरुण भारत‘चे संपादक असलेल्या वैद्य यांनी पत्रकारांच्या अनेक पिढ्या घडविल्या. त्यांच्या निधनाने विदर्भातील ज्ञानदीप मालविला आहे. वैद्य यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली.

मा. गो. वैद्य यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही ट्विट करून श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणतात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, ज्येष्ठ संपादक आणि विचारवंत मा. गो. उपाख्य बाबूराव वैद्य यांना माझी विनम्र श्रद्धांजली. पूज्य गुरुजी यांच्यासह सर्व सरसंघचालकांसोबत काम करण्याचे, त्यांना जवळून अनुभवण्याचे भाग्य बाबुरावांना लाभले होते. विधान परिषद सदस्य म्हणून त्यांची कारकीर्द सगळ्या लोकप्रतिनिधींसाठी सदैव आदर्शवत राहील. माझ्या लहानपणापासून बाबुरावजींशी माझा व्यक्तिगत व जवळचा संबंध राहिला. मला कायम त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळाले. ‘नागपूर तरुण भारत’चे संपादक म्हणून बाबूरांवांचे पत्रकारितेतील योगदान सर्व पत्रकारांना कायम प्रेरणा देणारे राहील. विदर्भात जनसंघ रुजविण्यात त्यांचे मोठे योगदान होते.

माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी विद्वान, शिक्षक, विचारवंत, पत्रकार, संघाचे माजी प्रवक्ते मा. गो वैद्य यांनी महत्त्वपूर्ण अशा राष्ट्रीय प्रश्नाकडे बघण्याचा एक स्पष्ट दृष्टीकोन दिला. राष्ट्रनिर्माणातील त्यांचे अमूल्य योगदानाचे कायम स्मरण राहील, अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही ट्वीटच्या माध्यमातून बाबूराव वैद्य यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्‍येष्‍ठ विचारवंत व ज्‍येष्‍ठ संपादक मा.गो. वैद्य यांच्‍या निधनाने प्रामाणिक, निस्‍वार्थ भावनेने देशकार्यासाठी आयुष्‍य वेचणारा सच्‍चा संघ स्‍वयंसेवक, हाडाचा पत्रकार हरपल्‍याची खंत वाटते. राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे आदर्श स्‍वयंसेवक, संस्‍कृत पंडित, शिक्षक, पत्रकार, विधान परिषद सदस्‍य अशा विविध भुमिका मा.गो. वैद्य यांनी यशस्‍वीरित्‍या पार पाडल्‍या. राजकीय क्षेत्र असो वा राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाने सोपविलेले कार्य, मिळालेल्‍या प्रत्‍येक जवाबदारीला वैद्य यांनी यशस्‍वीरित्‍या पार पाडल्‍या. राजकीय क्षेत्र असो वा राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाने सोपविलेले कार्य, मिळालेल्‍या प्रत्‍येक जबाबदारीला मा.गो. वैद्य यांनी शतप्रतिशत न्‍याय दिला. संघकार्यासाठी त्‍यांनी आपले आयुष्‍य समर्पित केले.

Back to top button