NewsRSS

ज्येष्ठ विचारवंत मा. गो. वैद्य यांचे निधन

नागपूर, १९ डिसेंबर (वि.सं.कें.) – विचारवंत पत्रकार, हिंदुत्वाचे भाष्यकार, तरुण भारतचे माजी मुख्य संपादकरा. स्व. संघाचे माजी बौद्धिक व प्रचार प्रमुख माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य यांचे शनिवार, १९ डिसेंबर २०२० रोजी दुपारी साडेतीन वाजता निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते. मागील काही दिवस प्रकृतीअस्वास्थ्यामुळे ते रुग्णालयात उपचार घेत होते.

त्यांच्या पश्चात पत्नी सुनंदा, विभावरी नाईक, डॉ. प्रतिभा राजहंस, भारती कहू या मुली व धनंजय, डॉ. मनमोहन (सह सरकार्यवाह, रा. स्व. संघ), श्रीनिवास, शशिभूषण व डॉ. राम (हिंदू स्वयंसेवक संघ, सह संयोजक) ही पाच मुले तसेच बराच मोठा आप्त परिवार आहे. रविवार, २० डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता त्यांच्या राहत्या घरातून अंत्ययात्रा निघणार असून व अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

मा. गो. वैद्य यांनी पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केल्यानंतर १९६६पर्यंत आधी शिक्षण आणि नंतर प्राध्यापक म्हणून काम केले. १९६६ ते १९८३ या काळात दै. नागपूर तरुण भारतमध्ये पत्रकार म्हणून काम सुरू केले. त्यानंतर १९८३ ते १९९६ या काळात नरसेकरी प्रकाशनमध्ये अनुक्रमे प्रबंध संचालक आणि अध्यक्षपद भूषविले. ते महाराष्ट्र विधान परिषदेचे नामनियुक्त सदस्य ही राहिले होते. नागपूर विद्यापीठात दीर्घकाळ सिनेट सदस्य आणि १९६९ ते १९७४ व १९७६ ते १९७९मध्ये नागपूर विद्यापीठ कार्यकारिणी सदस्य होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात अ. भा. बौद्धिक प्रमुख, अ. भा. प्रचार प्रमुख, अ. भा. प्रवक्ता अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्याचप्रमाणे २००८पर्यंत ते अ. भा. कार्यकारी मंडळाचे निमंत्रित सदस्य होते.

मा. गो. वैद्य यांची ‘संघ – काल, आज आणि उद्या’, संघबंदी, ‘सरकार आणि श्रीगुरूजी’, ‘सुबोध संघ’, ‘हिंदुत्व – जुने संदर्भ, नवे अनुबंध’, ‘हिंदू संघटन – शक्यता, आवश्यकता व सफलता’, ‘हिंदू, हिंदुत्व, हिंदू राष्ट्र’, ‘शब्दांच्या गाठीभेटी’, ‘ज्वलंत प्रश्न – मुलगामी चिंतन’, ‘काश्मीर – समस्या व समाधान’, ‘आपल्या संस्कृतीची ओळख’ अशी अनेक पुस्तके गाजली होती.

महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार(महाराष्ट्र शासन), राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुरस्कार(नागपूर विद्यापीठ), बौद्धिक योद्धा पुरस्कार(डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी शोध संस्थान), राजमाता विजयाराजे शिंदे पत्रकारिता पुरस्कार, गणेश शंकर विद्यार्थी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार(मध्यप्रदेश सरकार) लोकमान्य टिळक पत्रकारिता पुरस्कार(नागपूर श्रमिक पत्रकार संघ) अशा अनेक अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी मा. गो. वैद्य यांना गौरविण्यात आले होते.माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय पत्रकारिता विद्यापीठातर्फे मानद डी.लिट.नेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे, द्रष्टे विचारवंत, संपादक, निर्भीड लेखक व जाज्वल्य राष्ट्रप्रेमी श्री मा. गो. वैद्य यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. श्री वैद्य यांनी आपल्या विचारांमधून तसेच प्रखर लेखणीतून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर समाजाचे सातत्यपूर्ण प्रबोधन केले. निष्ठावान स्वयंसेवक असलेल्या मा.गो. वैद्य यांनी  आपले संपूर्ण जीवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारधन जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी वेचले. ‘तरुण भारत‘चे संपादक असलेल्या वैद्य यांनी पत्रकारांच्या अनेक पिढ्या घडविल्या. त्यांच्या निधनाने विदर्भातील ज्ञानदीप मालविला आहे. वैद्य यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली.   

संघाच्या वैचारिक जडणघडणीत बाबुरावांचे मोठे योगदान आहे. शेवटच्या श्वासापर्यंत ते आपल्या विचारधारेप्रती समर्पित होते. ‘नागपूर तरुण भारत’चे संपादक म्हणून बाबूरांवांचे पत्रकारितेतील योगदान सर्व पत्रकारांना कायम प्रेरणा देणारे राहील. विदर्भात जनसंघ रुजविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे.

ज्‍येष्‍ठ विचारवंत व ज्‍येष्‍ठ संपादक मा.गो. वैद्य यांच्‍या निधनाने प्रामाणिक, निस्‍वार्थ भावनेने देशकार्यासाठी आयुष्‍य वेचणारा सच्‍चा संघ स्‍वयंसेवक, हाडाचा पत्रकार हरपल्‍याची शोकभावना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली.

`तरुण भारत’चे माजी मुख्य संपादक, हिंदुत्वाचे भाष्यकार, रा. स्व. संघाचे माजी बौद्धिक व प्रचार प्रमुख माधव गोविंद उपाख्य बाबूराव वैद्य यांच्या निधनाने एक थोर विचारवंत पत्रकार हरपला आहे, अशा शब्दांत मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांनी दु:ख व्यक्त केले. मा. गो. वैद्य हे पत्रकारितेचा आधारवड होते. त्यांच्या तालमीत अनेक दिग्गज पत्रकार तयार झाले. विदर्भातील अनेक पत्रकारांनी त्यांच्याकडूनच पत्रकारितेचे धडे घेतले. त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणातून व्यक्त झालेले त्यांचे प्रगल्भ विचार समाजाला दिशा दाखवितील, असे श्री. वाबळे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

Back to top button