RSS

मातृभूमीला परमवैभव प्राप्त झालेले (याचि देहि याचि डोळा) पाहण्याचे स्वप्न अपूर्णच

(लेखमाला – विश्वगुरु भारत – भाग 14)

भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठी सुरू असलेल्या सर्व चळवळी, आंदोलने यांकडे डॉ. हेडगेवार यांचे बारिक लक्ष होते. म्हणूनच त्यांनी  स्वतःच्या ढासळत्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करीत लाखो स्वयंसेवक आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या जडणघडणीसाठी सगळा वेळ समर्पित केला. येऊ घातलेल्या दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या आगेमागे ब्रिटिश साम्राज्याचा बुरूज ढासळणार याचा त्यांना अचूक अंदाज आला होता. भविष्यात जगाच्या पटलावरील विविध उदयोन्मुख देश एकत्र येणार असल्याचे चित्र त्यांच्या डोळ्यासमोर साकार झाले होते. त्यांच्या मते अखंड भारताच्या संपूर्ण साम्राज्यासाठी ब्रिटिश साम्राज्याला शेवटचा निर्णायक धक्का देण्याची वेळ आली होती.

स्वातंत्र्य सैनिकांचा अज्ञात दूरदर्शी सेनापती

डॉ. हेडगेवार यांच्या  राष्ट्रीय आणि द्रष्ट्या कृतीयोजनांवर त्यांच्यासोबतच अनुशीलन समितीचे त्रिलोक्यनाथ चक्रवर्ती, स्वा. सावरकर, सुभाषचंद्र बोस आदी रथी महारथीही कार्यरत होते. ब्रिटनच्या नाजूक आणि अस्थिर अवस्थेचा फायदा घेतल्यास भारताला स्वातंत्र्य मिळण्याची सुवर्णसंधी आहे असे या सगळ्यांचेच मत होते. जागतिक पातळीवर बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीचे पूर्ण आकलन झालेल्या डॉक्टरांनी ब्रिटीश प्रशासनाच्या विरोधात सशस्त्र क्रांतीची योजना आखली.

जागतिक युद्धाच्या दिशेने जगाची वेगाने वाटचाल सुरू झाल्याचे लक्षात आल्यावर दूरदर्शी डॉ. हेडगेवार म्हणाले, ही संधी वाया दवडणे हा मूर्खपणा ठरेल. योग्य वेळी निर्णायक तडाखा देण्यात आपण अयशस्वी ठरलो तर ब्रिटिश पुन्हा एकदा बलशाली होतील आणि आपल्या देशाचे तुकडे तुकडे करून मगच भारत सोडतील. आपल्या देशाचे तुकडे तुकडे करण्याची ब्रिटिशांची योजना हाणून पाडण्यासाठी आपल्याला सुनियोजित सशस्त्र क्रांतीची आवश्यकता आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या क्रांतीची मशाल पेटली की लष्करी जवानही आपल्यासोबत येतील आणि ब्रिटिश साम्राज्याविरोधात उभे ठाकतील.

डॉक्टरांचा अंदाज आणि सूचना खऱ्या ठरल्या यास इतिहास साक्षी आहे. पुढल्या काळात तिन्ही सेना दलांमध्ये अनेक ठिकाणी उठाव झाले. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना उभारली आणि ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात पूर्वेकडून मोहीम सुरू केली. संपूर्ण देशाने ‘भारत छोडो’ आंदोलनात सहभाग घेतला. त्याचवेळी, डॉक्टरांनी धोक्याची सूचना दिली की, बलशाली आणि अजेय हिंदू शक्ती संघटित झाली नाही तर मुस्लीम लीग, काँग्रेसमधील काही घटक आणि ब्रिटिश हे शतकानुशतकांचे अस्तित्व असणाऱ्या या देशाचे विभाजन करण्यास हातमिळवणी करून एकत्र येतील.

सुभाषचंद्र बोस, सावरकर आणि डॉ. हेडगेवार यांची युद्धनीती

स्वा. सावरकर, सुभाषचंद्र बोस, त्रिलोक्यनाथ चक्रवर्ती आणि डॉ. हेडगेवार हे ब्रिटिशांच्या विरोधात सशस्त्र क्रांतीची अदम्य योजना तयार करण्यात व्यग्र होते. डॉ. हेडगेवार आणि सुभाषचंद्र बोस यांच्या दृष्टीकोनात विलक्षण साम्य होते, हे ही लक्षात घ्यायला हवे. दोघेही वसाहतीअंतर्गत स्वराज्याच्या विरोधात होते. त्यांना अखंड भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्याशी कोणतीही तडजोड मान्य नव्हती. ते ध्येयपूर्तीसाठी व्यवहारात आणता येणे शक्य असलेल्या, सशस्त्र-अहिंसात्मक अशा, सर्व प्रकारच्या चळवळींच्या बाजूने होते. ते दोघेही भारताच्या कोणत्याही प्रकारच्या फाळणीच्या विरोधात होते. दोघेही नजिकच्या काळात होऊ घातलेल्या दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या संधीची वाट पाहात होते. तो क्षण जवळ येताना दिसत होता.

https://www.vskkokan.org/rss/13/

पहिल्या जागतिक महायुद्धानंतर लगेचच दुसऱ्या महायुद्धाची शक्यता डॉ. हेडगेवार यांनी वर्तविली होती. पहिल्या महायुद्धाच्या वेळी ब्रिटिश साम्राज्यवादाच्या बाजूने उभे राहण्याची चूक काँग्रेसने केली होती. डॉक्टरांनी जुळवत आणलेला व्यापक उठाव (महाविप्लव) काँग्रेसने ब्रिटिशांना दिलेल्या त्या पाठिंब्यामुळेच अकाली बारगळला. त्यामुळे यावेळी डॉ. हेडगेवार यांना प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलायचे होते. त्याच सुमाराला, म्हणजे जानेवारी १९३८ मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेलेल्या  सुभाषचंद्र बोस यांना युरोपातील राजकीय घडामोडींवरून येऊ घातलेल्या महायुद्धाची चाहूल लागली होती. एका बाजूला देशात राष्ट्रव्यापी आंदोलनाची सुरुवात करायची आणि दुसरीकडे ब्रिटनच्या विरोधातील देशांचा पाठिंबा मिळवायचा अशा दुहेरी राजकीय रणनीतीच्या बाजूचे ते होते. डॉ. हेडगेवार आणि सावरकरही याच मताचे होते. पण यामुळे गांधीजी आणि सुभाषचंद्रांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसमध्ये यामुळे खोल दरी निर्माण झाली. गांधीजी हे अहिंसेच्या मताचे होते, तर सुभाषचंद्र बोस हे ब्रिटिशांवर विजय मिळविण्यासाठी सर्व (हिंसक वा अहिंसक) मार्गांचा अवलंब केला पाहिजे या मताचे होते.

गांधीजींच्या गटातील नेत्यांनी २९ एप्रिल १९३९ रोजी सुभाषचंद्र बोस यांना काँग्रेस पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. बोस यांनी ३ मे १९३९ रोजी काँग्रेसमधील आपल्या समर्थकांना सोबत घेऊन फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली. काँग्रेसबाहेरील सर्व राष्ट्रीय शक्तींना एकत्र आणण्यासाठी त्यांनी मोहीम सुरू केली. त्यांनी मुंबईत येऊन हिंदू महासभेचे नेते स्वा. सावरकर यांची भेट घेतली. विस्तृत चर्चेनंतर त्यांनी डॉ. संजगिरी आणि बाळाजी हुद्दार या दोन राष्ट्रवादी नेत्यांना नागपुरास डॉक्टरांशी चर्चा करण्यास पाठवले. ते डॉक्टरांना म्हणाले की, प्रचलित राजकीय परिस्थितीचा फायदा घेतला जाण्याबाबत ते अनुकूल असून ब्रिटिशांविरोधात सशस्त्र क्रांतीची सुरूवात करणार आहेत. डॉक्टरांनी याला सहमती दर्शवली आणि एकत्र येऊन देशव्यापी क्रांती करण्यास सुचवले.

संघ वाढ आणि डॉक्टरांची झपाट्याने खालावणारी तब्येत

ज्या संधीची २० वर्षे डॉ. हेडगेवार यांनी वाट पाहिली, ती त्यांच्यासमोर उभी होती पण शरीरप्रकृती मात्र त्यांना साथ देत नव्हती. संघाच्या विस्ताराच्या वेगापेक्षा डॉक्टरांच्या तब्येत खालावण्याचा वेग अधिक होता. जणू काही त्यांची एकमेकांशी स्पर्धाच सुरू होती. काही ज्येष्ठ संघनेत्यांच्या आग्रहामुळे ३१ जानेवारी १९४० रोजी हेडगेवार बिहारमधील राजगिर येथे उपचाराकरिता गेले. तिकडेही ते शांत नव्हते. देशाच्या स्वातंत्र्याच्या विचारामुळे त्यांच्या मनाला अशांतता व्यापून राहिली होती. एके दिवशी भोजनोत्तर विश्रांतीच्या वेळी ते झोपेतच बोलू लागले, ‘१९४१ साल उजाडले, पण अद्यापही आपण स्वतंत्र झालो नाही. पण काहीही करून आपण स्वातंत्र्य मिळवू.’ झोपेत असतानाही त्यांना राष्ट्राचीच चिंता असे. सशस्त्र क्रांतीचा त्यांचा विचार हळूहळू साकार होऊ लागला. गांधीजींच्या ‘भारत छोडो’ आंदोलनाने देशव्यापी भव्य रूप धारण केले आणि काही भारतीय सैनिकांनी ब्रिटिश सरकारविरोधात बंड केले. संघाच्या स्वयंसेवकांनीही आपली ‘संघ’ ही ओळख बाजूला ठेवून संपूर्ण समर्पिततेने ‘भारत छोडो’ आंदोलनात सहभाग घेतला.

इतिहासकार देवेंद्र स्वरूप यांच्या मते, सुरुवातीला युद्धाचे फलित हे युरोपातील मित्रराष्ट्रांच्या विरोधात जाणारे होते. हिटलरने १३ जून १९४० रोजी फ्रान्सवर ताबा मिळवला. १६ जून रोजी इटलीच्या मुसोलिनीने मित्रराष्ट्रांविरोधात युद्धात उडी घेतली. ब्रिटिश सैन्याने फ्रान्समधून माघार घेतली आणि आपल्या राष्ट्रात परतले. सुभाषचंद्र बोस आणि डॉ. हेडगेवार हे दोघेही या संधीचा फायदा घेण्यास उत्सुक होते. सुभाषचंद्र बोस यांना एका बाजूला गांधीजींचे नेतृत्व आणि दुसरीकडे ब्रिटिश सरकार अशा दोन आघाड्यांवर लढायचे होते, तर, डॉक्टारांना एकीकडे विस्तारणारा संघ आणि दुसरीकडे ढासळणारी प्रकृती यांचा तोल सांभाळायचा होता.

संपूर्ण स्वातंत्र्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत झुंज

डॉ. हेडगेवार यांच्याकडे थक्क करणारा आत्मसंयम आणि प्रबळ इच्छाशक्ती होती. त्यांच्या निधनापूर्वीची गोष्ट आहे, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी त्यांना पाहण्यास आले होते. त्या काळात संघाचे प्रशिक्षण वर्ग नागपुरात होत असत. त्यांना डॉक्टरांच्या बिघडलेल्या प्रकृतीची कल्पना होती. डॉक्टरांच्या प्रकृतीची चौकशी करण्याची आणि बंगालमधील मुस्लिमांच्या हल्ल्यासंबंधी विचारविनिमय करण्याची त्यांची इच्छा होती. हेडगेवारांना प्रकृती अत्यंत नाजूक असतानाही त्यांचे आपुलकीने स्वागत केले. त्यावेळी त्यांच्या अंगात १०४ अंश ताप होता. असे असतानाही विविध विषयांवर सुमारे अर्धा तास त्यांनी चर्चा केली. स्वा. सावरकर आणि सुभाषचंद्र बोस यांच्या सशस्त्र क्रांतीच्या योजनेला त्यांनी मान्यता दिली.

डॉ. हेडगेवार यांच्या अशांत मनाची कहाणी सांगणारे अश्रू

ब्रिटिशांविरोधात क्रांती करण्याच्या योजनेबाबत विचार विनिमय करण्यासाठी १९ डिसेंबर १९४० रोजी सुभाषचंद्र बोस हे हेडगेवारांच्या भेटीला आले. हेडगेवार यांना झोपेची नितांत आवश्यकता होती आणि सुभाषबाबू आले तेव्हा नेमकी त्यांना झोप लागली होती. हे पाहून सुभाषचंद्र बोस यांनी डॉक्टरांच्या परिचारकांना उठवू नका, मी परत येईन असे सांगितले. जेव्हा हेडगेवारांना याबाबत समजले आणि एक मोठा स्वातंत्र्यसेनानी आपल्याला भेटण्यास आला असता आपल्याला का उठवले गेले नाही या विचाराने ते अत्यंत दुःखी झाले. हे योग्य नाही असे स्पष्ट करीत सुभाषचंद्र बोसांना परत बोलवा असे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले. पण तोपर्यंत सुभाषचंद्र बोस निघून गेले होते.

डॉ. हेडगेवार यांनी २१ जून १९४० रोजी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला. देहत्याग करतेवेळी डॉक्टरांच्या डोळ्यात अश्रू होते असे त्यावेळी उपस्थित असणाऱ्यांनी सांगितले. ज्या व्यक्तीने आपल्या व्यक्तिगत-कौटुंबिक महत्त्वाकांक्षा आणि इच्छा समर्पित केल्या आहेत तिलाही अंतिम क्षणी कसलासा खेद असावा हे खरोखर आश्चर्यकारक होते. लोहासारखे काठीण्य असणाऱ्या व्यक्तिमत्त्वालाही त्यावेळी दुबळेपणाच्या जाणिवेने रडू आले होते. बालपणापासून ज्या इच्छेसाठी आपले आयुष्य, सर्व वैयक्तिक महत्त्वाकांक्षा समर्पित केल्या ती त्यांच्या आयुष्यात पूर्ण झाली नाही, हे याचे कारण होते. ही वेदनाच डोळ्यांतून अश्रूंच्या रुपात वाहत होती.

क्रमशः

(लेखक हे ज्येष्ठ पत्रकार व स्तंभलेखक आहेत)

**

Back to top button