NewsPolitics

विजय वडेट्टीवारांचे संतापजनक वक्तव्य, साधूंबद्दल उच्चारले अपशब्द

मुंबई, दि. १३ फेब्रुवारी – साधूंवर अजिबात विश्वास ठेवू नका, ते संधीसाधू असतात हे संतापजनक शब्द आहेत महाविकास आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांचे. बुलडाणा येथे झालेल्या एका कार्यक्रमात साधू आणि संत यांच्यातील फरक समजावून सांगताना वडेट्टीवार यांची जीभ घसरली. या वक्तव्याचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. विजय वडेट्टीवारांचे संतापजनक वक्तव्य, साधूंबद्दल उच्चारले अपशब्द यामुळे हिंदू समाजात संतापाचे वातावरण असून त्यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

साधू आणि संत यांच्यातील फरक समजावताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, संत वेगळे आणि साधू वेगळे असतात. साधूंवर अजिबात विश्वास ठेऊ नका. साधूंसारखे नालायक लोक जगात भेटणार नाहीत. संत समाजासाठी समर्पित होऊन काम करतात पण साधू म्हणजे संधी साधणारे संधीसाधू असतात. चावणाऱ्या विषारी विंचूलाही वाचवणारे संत असतात.

यावर भाजप नेत्यांनी, हिंदू समाजाचा आणि साधूंचा हे सरकार किती अपमान करणार असे विचारत वडेट्टीवार यांचा वक्तव्यावर कठोर शब्दांत टिका केली आहे. भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले म्हणाले की, मंत्री झालात म्हणून तुम्हाला साधूंना शिव्या घालण्याचा परवाना मिळालेला नाही. माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे की हिंदू समाजाला हे दिवस दाखवण्याकरता तुम्ही मुख्यमंत्री झाले आहात का? तुमचे मंत्रीच जर साधू-संताना शिव्या घालणार असतील तर का साधूंच्या हत्या होणार नाहीत? विजय वडेट्टीवार यांनी साधूंची माफी मागावी अन्यथा परिणामांना सामोरे जावे असा इशाराही त्यांनी दिला.

**

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button