OpinionRSS

संघाचे योगदान मोठे

साधी राहणी, स्वच्छ प्रतिमा आणि हसरा चेहरा…’कॉमन मॅन’चे मूर्तिमंत उदाहरण असलेले मनोहर पर्रिकर यांच्या पुण्यतिथिनिमित्त…   

“माझ्या जीवनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिकवणुकीचे योगदान मोठे आहे. देशसेवा करण्यासाठी आणि समाजसेवा करण्यासाठी मी मुख्यमंत्री झालो आहे. ही संघाची शिकवण आहे. वैयक्तिक लाभासाठी मुख्यमंत्री झालो असतो, तर पदाचा वापर करून पैसा कमावला असता. मी आयआयटीत शिकलो. आयआयटी व राजकारणाचा तसा काही संबंध नाही. मी लहानपणापासून म्हणजे १९६७ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होतो. आयआयटीत अनौपचारिकपणे शाखा चालवायचो. मी म्हापसा येथे वयाच्या २४ व्या वर्षी सर्वात तरुण संघचालक होतो. गोव्यात भाजपला ०.४१ टक्के मते मिळाली होती. त्यामुळे भाजपला मदत करण्याची जबाबदारी देण्यात आली. लोकसभेसाठी पक्षाला उमेदवार मिळत नव्हता. मला उमेदवारी दिल्यावर घरी गोंधळ झाला. मी गोव्यात १० वर्षांत भाजपचा मुख्यमंत्री झाल्यावर राजकारणातून बाहेर पडेन, असे पत्नीला सांगितले. पण १० वर्षे झाल्यावर मी मुख्यमंत्री झालो, पण पत्नी हयात नव्हती. माझ्या जीवनात संघाचे मोठे योगदान आहे. माझ्याकडे संघटनकौशल्य होते. संघाचे काम गोव्यात चांगले आहे. गंगाजल रथयात्रा, राम जन्मभूमी आदी आंदोलनांत सक्रिय भाग घेतला. रामजन्मभूमीच्या आंदोलनास पाठिंब्यासाठी स्वाक्षरी घेण्यासाठी मगोपचे नेते रमाकांत खलप यांच्याकडे गेलो. तेव्हा मी सही केली तर भारताला पेट्रोल मिळणार नाही, असे त्यांनी सांगितले. प्रतापगडावर जाऊन शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन खाली आल्यावर त्यांनी अफझलखानाला श्रद्धांजली वाहिली होती. अशा दोन-तीन घटनांमुळे लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. धर्मनिरपेक्षता म्हणजे हिंदूंचा द्वेष असे नाही. गोव्यात कॅथलिकांची लोकसंख्या मोठी असून सामाजिक योगदानही चांगले आहे. गोव्यात त्यांच्यामुळे काँग्रेसची सरशी होत होती. १९९१ मध्ये भाजप नेते प्रमोद महाजन लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार शोधत होते. मला तिकीट मिळाले, निवडणूक हरलो, पण अनामत रक्कम राखली. पण नंतर आमदार म्हणून निवडून आलो. गोव्यात संघाच्या १०० शाखा होत्या. पण तरीही मतदान भाजपला न होता महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला होत होते. तेथे धर्मातराचा विषय जुना असला तरी आज तो नाही. सामाजिक जाणीव म्हणून इतिहास माहीत असायला हवा. कॅथलिक हिंदूमध्ये सामाजिक दुही नाही. मलाही हिंदू असल्याचा अभिमान आहे. पण प्रशासन सांभाळताना मी धर्मनिरपेक्ष आहे. हिंदू, मुस्लिम, कॅथलिक यांचे समान हक्क आहेत. मतदानाचा विचार करून एखाद्याचे लांगूलचालन करणे चुकीचे आहे. मी कोणत्याही धर्माचा तिरस्कार करीत नाही. संघातही हीच शिकवण दिली जाते. रामराज्याचा अर्थ काय? रामराज्य खरे तर भरताने केले. त्याने राजा म्हणून नाही, तर रामाच्या पादुका ठेवून विश्वस्त नात्याने राज्यकारभार केला. त्याच पद्धतीने राज्यकर्त्यांनी जनतेचे विश्वस्त म्हणून काम पाहिले पाहिजे. माझ्या वैयक्तिक पैशांमधून कदाचित वायफळ खर्च होईल. पण राज्याच्या तिजोरीतील एकही पै फुकट जात नाही. संघाच्या शिकवणीतून मी हे शिकलो. मुख्यमंत्रीपदावर दोन वर्षे राहूनही मला भ्रष्टाचार करण्याची वेळ आली नाही. राजकारणात भ्रष्टाचार करण्याची वेळ आली, तर मी राजकारण सोडेन.”

– मनोहर पर्रिकर, लोकसत्ता आयडिया एक्स्चेंज. 31 मार्च 2013

(ज्येष्ठ पत्रकार दिनेश गुणे यांच्या फेसबुक वॉलवरून साभार)

Back to top button