OpinionRSS

स्वयंप्रेरीत लोकशाहीचा परिचय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिनिधी सभा : – भाग १

सध्याच्या प्रचलित लोकशाहीत नकारात्मक टीकेला कुठलेही स्थान नाही. आधुनिक युगाची एक मजबूत आणि सशक्त प्रणाली म्हणजे पुरोगामी लोकशाही ज्यात विचार करण्याचे, बोलण्याचे आणि लिहिण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. ही पुरोगामी लोकशाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधींच्या ‘अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या’ वार्षिक बैठकीत दिसून येते. यावर्षी ही बैठक बंगळुरूमध्ये  १९-२० मार्च रोजी होणार आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासूनच त्याच्यावर अविरत आरोप होत आले आहेत की , संघ हा फॅसिस्ट आहे, संघात हुकूमशाही आहे, संघ जातीयवादी आहे, संघ अशी एक संघटना आहे जी निवडणुका घेत नाही, संघात तुम्हाला मत मांडण्याचा अधिकार नाही  व  तुम्हाला चर्चा करायची परवानगी नाही, संघाचे कामकाज लोकशाहीला धरून  नाही. पण परिस्थिती याउलट आहे. संघात चर्चेपासून ते निवडणुकांपर्यंत सर्व काही घडते. फक्त इथे कुणाची आलोचना , निंदनीय भाषण गडबड गोंधळ , घोषणाबाजी आणि निवडणुकांचा गोंगाट असे काहीही  होत नाही.

ह्या सशक्त लोकशाही प्रक्रियेची कार्यप्रणाली  समजण्यासाठी संघाचे कार्यक्रम, सभा, विविध चर्चा यांचे बारकाईने निरीक्षण केले पाहिजे. संघाच्या संघटनात्मक संरचनेत शहरापासून ते  अखिल भारतीय स्तरापर्यंत सशक्त आणि पुरोगामी लोकशाहीची एक अतिशय सुंदर आणि अदभुत अशी कार्यप्रणाली आणि रचना दिसून येईल. जी इतरत्र संस्था,संघटना आणि पक्षांमध्ये क्वचितच दिसून येते. याला एकच प्रमुख कारण आहे ते म्हणजे – संघ हे राष्ट्र उभारणीचे असे विधायक कार्य आहे ज्याचा पक्षाच्या राजकारणाशी काही संबंध नाही. असो,

आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊ, इथे आपण संघाच्या प्रतिनिधी मंडळाच्या वार्षिक बैठकीवर चर्चा करत आहोत. वर्षातून एकदा होणाऱ्या ह्या  बैठकीत सुमारे १४०० स्वयंसेवक आणि कार्यकर्ते सहभागी होतात. संघटनेच्या सरसंघचालकांचे मार्गदर्शन आणि सरकार्यवाह यांच्या द्वारे संचालित असणाऱ्या बैठकीत भारतातील सर्व जिल्ह्यातील निवडलेले प्रतिनिधी, अखिल भारतीय व प्रांतीय पातळीवरील अधिकारी, सर्व विभागांचे अग्रणी कार्यकर्ते, प्रचारक आणि संबंधित संघटना उपस्थित असतात.

या वार्षिक सभेच्या मुख्य कार्यक्रमांमध्ये  शाखेत भगव्या ध्वजासमोर प्रार्थना, मग  परिचय, विविध कामाचे वृत्त ,निवेदन, कामाची प्रगती, भविष्यातील नियोजन, चर्चा सत्र, विशेष बौद्धिक वर्ग, राष्ट्रीय हितसंबंधित विषयांवर ठराव संमत करणे, संघटना यांचा समावेश आहे. राष्ट्रीय विचारांच्या नवीन पुस्तकांचा परिचय आणि नियमित पत्रकार वार्ता इत्यादी कार्यक्रम आयोजित केले जातात.

हे कार्यक्रम अतिशय गंभीर, शांत  आणि आनंदी वातावरणात होतात. येथे कुणाचा जयजयकार केला जात  नाही, आरडा – ओरड नाही किंवा साधी टाळीही वाजत नाही. अतिशय प्रेरणादायक, उत्साहवर्धक आणि ईश्वरसम दृष्य असते इथे. या बैठकीत तथाकथित लोकशाहीचे कुठलेही नियम कुणावरही लादले जात नाहीत. स्वयंप्रेरित लोकशाहीचा व्यावहारिक परिचय येथे आपल्याला होतो आणि  हे संघाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.

अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या  या वार्षिक बैठकीत  पारित होणाऱ्या ठरावांवर उघडपणे चर्चा केली जाते. प्रत्येकास देशाची सुरक्षा, सामाजिक ऐक्य व सुसंवाद, समरसता , राष्ट्रीय समस्या इत्यादींच्या ज्वलंत प्रश्नांविषयी सविस्तर चर्चा करण्याची संधी दिली जाते. मागील बैठकांमध्ये असे बरेच प्रसंग घडलेले आहेत जेव्हा एका प्रतिनिधीच्या ठोस सूचने नंतर प्रस्तावाचा विषय आणि भाषा बदलली गेली आहे.

ह्या बैठकीत आपल्याला वरील लोकशाहीव्यवस्थे व्यतिरिक्त अनेक प्रेरणादायक व अतुलनीय दृश्ये बघायला आणि अनुभवायला मिळू शकतात. एकत्रित मंत्रोच्चारण केल्यानंतर एकत्र भोजन घेऊन सर्व कार्यकर्ते त्यानंतर अनौपचारिकरित्या होणाऱ्या गाठीभेटी आणि एकमेकांच्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि संघटनात्मक जीवनात प्रेम आणि सुसंवादात हरवून जातात. हयामुळे एखाद्या राष्ट्रीय नेत्याच्या भावनेला नव्हे तर प्रत्यक्ष संघटनेच्या धोरणालाच बळकटी मिळते…

क्रमशः …..

लेखक- नरेंद्र सहगल

माजी केंद्रीय प्रचारक, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक

भ्रमण ध्वनी – ९८११८ ०२३२०.

अनुवाद – अनुप देशपांडे , संभाजीनगर

© विश्व संवाद केंद्र, देवगिरी.

Back to top button