Health and WellnessNews

कोविड लसीची निर्मिती आता मुंबईत

मुंबई, दि. १८ मार्च : हाफकीन बायोफार्मा कॉर्पोरेशन आणि हैदराबाद येथील भारत बायोटेकच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत कोविड लसीचे उत्पादन करण्यात येणार असून त्यासाठी १५४ कोटी रुपये खर्चाचा नवीन प्लांट मुंबईत सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली.  

हाफकिनमार्फत सुरू करण्यात येणाऱ्या लसीचं उत्पादन दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात भारत बायोटेक यांच्याकडील लस ठोक स्वरुपात घेण्यात येणार असून ती हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनमार्फत रिपॅकिंग आणि फिलिंग करून आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्यात येईल.

सध्या या लसीचे उत्पादन भारत बायोटेक आणि इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्यामार्फत संयुक्तपणे केले जाते. कोवॅक्सिन या नावाने ही लस सध्या बाजारात आणली आहे. यापैकी इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ही संस्था केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाच्या अधिनस्त कार्यरत असून हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनला ही लस ठोक प्रमाणात लवकर मिळाल्यास येत्या एप्रिल किंवा मेपासून हाफकिनमार्फत ही लस उपलब्ध केली जाईल. तर स्वतंत्रपणे कोरोना लशीचे उत्पादन करण्यासाठी हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनला एक ते दीड वर्षाचा कालावधी लागेल.

भारत बायोटेककडून ठोक स्वरुपात कोविड लस पुरवण्यासंदर्भात केंद्र शासनाला सविस्तर प्रस्ताव तातडीने पाठवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनामार्फत नव्याने उभारण्यात येणाऱ्या प्लांटसाठी आवश्यक निधीची मागणी करण्यात येणार आहे अशी माहितीही अमित देशमुख यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button