OpinionSeva

कोरोना रुग्णसेवेसाठी २४ तास तत्पर, ऑटोरिक्शाचालकाची आगळीवेगळी समाजसेवा

आज मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाने ग्रासला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयांमधील बेड्स आणि ऑक्सिजन इतकाच मोठा प्रश्न आहे तो रुग्णवाहिकांचा. हजारो खासगी आणि सरकारी रुग्णवाहिका अहर्निश सेवा देत असूनही पुरवठ्याला येत नाहीत. तशातच मुंबईतले काही परिसर सेवावस्त्यांचे. त्यातल्या वाटा इतक्या अरुंद की तिथे चारचाकी जाणंही शक्य नाही. मग भल्यामोठ्या रुग्णवाहिका येणं दूरच. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच काही दुर्दैवी व्यक्तींना आपले प्राणही गमवावे लागले आहेत.

अशा नकारात्मक स्थितीतही निःस्वार्थी भावनेने समाजसेवा करणाऱ्या अनेक व्यक्ती आपल्या आसपास आहेत. घाटकोपरचे रिक्शाचालक दत्तात्रेय सावंत हे असेच एक समाजसेवक. कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रकोप सुरू झाल्यापासून सावंत कोरोना रुग्णांना रुग्णालयापर्यंत सोडण्याचे आणि बरे झाल्यावर घरी आणून सोडण्याचे कार्य करीत आहेत. आजपर्यंत शंभरहून अधिक नागरिकांना त्यांनी ही सेवा दिली आहे.

विशेष म्हणजे दत्तात्रेय सावंत हे पेशाने शिक्षक आहेत. घाटकोपरमधील ज्ञानसागर विद्यामंदिर येथे ते आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय शिकवतात. पगार कमी असल्यामुळे त्यांनी आर्थिक जोड म्हणून साधारण चारेक वर्षांपूर्वी रिक्शा चालवायला सुरुवात केली. त्यांच्या पत्नी विशेष मुलांच्या शाळेत शिक्षिका आहेत.

जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा, चला कोरोनाला हरवू या कोविड रुग्णांना मदतीचा हात देऊया अशा घोषणांचा फलक लावलेली ही रिक्शा आपले लक्ष वेधून घेतेच. आर्थिक चणचण असतानाही मोफत सेवा देण्याचा विचार कसा आला याबद्दल विचारले असता ते म्हणाले, आपले डॉक्टर्स, मेडीकल कर्मचारी, पोलीस, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अहोरात्र सेवा देत आहेत. मी तर माझ्या व्यवसायातील काही वेळ या कामासाठी देत आहे. माझ्या पत्नीनेही या विचाराला पूर्ण पाठिंबा दिला म्हणून मी हे करू शकलो. जोपर्यंत कोरोना आहे तोपर्यंत ही सेवा सुरू ठेवायची असं मी ठरवलं आहे.

अशा संकटकालीन परिस्थितीतही माणुसकी विसरून आज काही रुग्णवाहिकाचालक हजारो रुपये रुग्णांकडून उकळत आहेत. असे अनेक रुग्ण आहेत ज्यांना ही रक्कम देणं शक्य नाही. अशा गरीब रुग्णांना सेवा देण्याची जबाबदारी सावंत यांनी घेतली आहे. आपल्या ऑटोच्या मागे त्यांनी आपला फोन नंबर दिला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी मी माझा नंबर ऑटोच्या मागे लिहिला आहे. जेणेकरून २४ तासात केव्हाही गरजू व्यक्तींना मला संपर्क करता यावा.

कोरोना संक्रमणाच्या दृष्टीने कशी काळजी घेता असे विचारल्यावर सावंत म्हणाले, मी कोरोना रुग्णाला सोडायला जाताना पीपीई किट घालून जातो. त्याला सोडायच्या आधी व सोडून आल्यानंतर संपूर्ण गाडी सॅनिटाईज करतो. वेळोवेळी सॅनिटायझरने हात स्वच्छ करतो. कोणताही प्रवासी असेल तरी त्याला आणि मला स्वतःला मास्क अनिवार्य असतो.

आज समाजात अनेक ज्ञात-अज्ञात समाजसेवक, सेवाभावी संस्था स्वयंस्फूर्तीने कोरोनापासून देशाचं रक्षण करण्यासाठी झगडत आहेत. मनाची संवेदनशीलता, समाजाप्रती असणारी जबाबदारीची जाणीव यातूनच मग असे अनेक दत्तात्रेय सावंत गरजवंतांच्या मदतीला तत्परतेने हजर होतात. सेवा दिसायला लहान असली तरी संसर्गाचा धोका लक्षात घेतला तर तिचे महत्त्व अधोरेखित होते. अशा व्यक्तींच्या साहायानेच तर कोरोना संकटावर मात करण्याचा गोवर्धन आरोग्य व्यवस्थेने पेलला आहे, पेलत आहे.

मृदुला राजवाडे
विसंकें मुंबई
**

Back to top button