ग्रामविकास, वनवासी विकास, अपारंपरिक ऊर्जेचा विकास, पर्यावरण रक्षण आणि गोवंश वृद्धी या पाच मुख्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कार्यान्वित असणारी भाईंदर, उत्तन येथील केशवसृष्टी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रेरित सामाजिक संस्था आपल्या वैभवशाली कामांमुळे प्रचलित आहे. सामाजिक विकासात नेहमीच अग्रेसर असणारी केशवसृष्टी ही संस्था वनवासींचे आर्थिक रक्षण, त्यांची आर्थिक उन्नती व्हावी, त्यांना अर्थार्जनाचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी कटिबद्ध आहे. भारतीय वाणाच्या गायींचा वंश टिकून राहावा म्हणून गोवंशपालन, पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने उपयुक्त अशा देशी झाडांचे संवर्धन करणे, बांबू प्रकल्प येथे राबविण्यात येतात. सौर ऊर्जा पॅनलचा मोठ्या प्रमाणात वापर करणाऱ्या केशवसृष्टीमुळे जव्हार, मोखाडा यासारख्या वनवासी गावांमध्ये वीज पोहोचली. इतकेच नव्हे तर आयुर्वेदिक औषधे तयार करणे यातही केशवसृष्टीचा हातखंड असून या औषध उत्पादनाच्या कार्यातही वनवासी समाजातील लोकांच्या हाताला मोठ्या प्रमाणावर मिळाले आहे. लहान मुलांना शेती कशी करायची,भातशेती कशी लावायची आदींचे ज्ञान मिळावे यासाठीही शिबिरे घेण्यात येतात. एक ना दोन अशा अनेक समाजोपयोगी आणि प्रत्येक स्तरावरील प्रत्येकाचा विचार करून आपल्या समाजबांधवांच्या वेदना, त्यांचे दुःख आपणच दूर केले पाहिजे असा मनाशी निर्धार करून ठिकठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपांतली प्रकल्प राबवणारी केशवसृष्टी कोरोनासारख्या महासंकटाच्या काळातही मागे नाही. प्रत्येक महिन्यांत कामे ठरवून ती पूर्णत्वास नेणाऱ्या केशवसृष्टीने एप्रिल २०२१ मध्येही अशीच काही महत्वपूर्णे कामे मार्गिस लावली.या कामांचा संक्षिप्त आढावा.
वनवासी महिलांना स्वयंरोजगाराची संधी
केळीच्या खांबापासून मिळत असलेला तंतू मऊसूत असतो तसेच तो चांगल्याप्रकारे फोल्डही करता येतो. हा तंतू ओला झाला तरीही तो मजबूत आणि टिकाऊ असतो. त्यामुळे सर्वोत्तम, इकोफ्रेंडली, बायो-डिग्रेडेबल अशा केळ्याच्या खांबाच्या तंतूंपासून (बनाना फायबर) बॅग, चटई, शोभेच्या वस्तू, रस्सी तसेच सुतळ बनविली जाते. केळ्याच्या खांबाचा उपयोग अनेकविध पद्धतीने केला जाऊ शकतो. केळ्याच्या झाडाचे हे बहुविध उपयोग लक्षात घेऊन केशवसृष्टीने केळ्याच्या झाडापासून तंतू बनविण्याचा कारखाना वाडा येथील बावली गावात सुरु केला आहे. या कारखान्याचे उदघाटन ५ एप्रिल २०२१ रोजी करण्यात आले. या तंतूंपासून विविध प्रकारच्या वस्तू बनविण्याचे प्रशिक्षणही वनवासी महिलांना देण्यात आले. या प्रकल्पामुळे या महिलांना स्वयंरोजगाराची संधी प्राप्त झाली आहे.
या कारखान्यास भारतीय स्टेट बँक, सीएजी शाखा, मुंबईच्या वतीने आर्थिक साहाय्य मिळाले आहे. कारखान्याचे उदघाटन बँकेचे महाप्रबंधक श्री. सिन्हा जी यांनी त्यांच्या पत्नीसमवेत केले. यावेळी अन्य मान्यवरही उपस्थित होते. देवगाव आणि तिळगाव येथील वनवासी महिलांनी बनाना फायबर बनवण्याचे प्रात्यक्षिकही यावेळी उपस्थितांसमोर करून दाखविले.
संस्कार केंद्र आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची रक्त तपासणी – १२ ते १९ एप्रिल
केशवसृष्टी ग्राम आरोग्य योजनेअंतर्गत स्व-स्वास्थ जागरूकता तसेच तो वृद्धिंगत करण्यासाठी स्टार हेल्थ कार्डचा उपयोग केला जात आहे. याची सुरुवात संस्कार केंद्रांचे शिक्षक तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांची रक्त तपासणी करून करण्यात आली. या दरम्यान सहभागी नागरिकांकडून आहार सर्वेक्षण फॉर्म देखील भरून घेण्यात आले. या सर्वेक्षणाच्या आधारावर त्यांना योग्य आहाराचे प्रमाण सांगितले जाणार आहे. यामुळे लोहाची कमतरता तसेच वजन कमी असण्याच्या समस्येवर तोडगा काढणे सोपे होईल. यामध्ये ४५ हुन अधिक जणांनी सहभाग घेतला होता.
कोविड आपत्ती व्यवस्थापन – कोविड केअर सेंटर तसेच गावकऱ्यांचे समुपदेशन
कोरोनाचा प्रादुर्भाव डोंगरी पालघर येथेही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. केशवसृष्टीने काही एनजीओसोबत डोंगरी पालघर येथे कोविड केअर सेंटर उभारण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच मुंबई आणि जव्हार येथेही अशाचप्रकारची कोविड केअर सेंटर उभारण्यात आली आहेत.
जव्हार येथील दिव्य विद्यालयाने केशवसृष्टीच्या साहाय्याने ४० बेड्सचे कोविड केअर सेंटर तसेच समुपदेशन सुरु केले आहे. ही केंद्रे वनवासी भागात उभारण्यात आली आहेत. पालघरचे अतिरिक्त जिल्हा अधिकारी श्री. दिलीप गुप्ते यांच्या हस्ते २५ एप्रिल, २०२१ रोजी या केंद्राचे उदघाटन करण्यात आले. तसेच संपर्ककरिता हेल्पलाईनही सुरू करण्यात आली आहे. .
अंधेरी पूर्व येथे मुंबई मनपा के / ई वॉर्ड यांच्या सहयोगाने नित्यानंद कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. ३० कोविड रुग्णांसाठी सुरु करण्यात आलेल्या या सेंटरचे उदघाटन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच प्रवीण दरेकर यांनी केले.
याव्यतिरिक्त कुडूस, वाडा आणि विक्रमगड येथे ७० ते १०० रुग्णांकरिता कोविड केअर सेंटर उभारण्यात येत आहे. लवकरच हे केंद्र लोकार्पण करण्यात येणार आहे.
याचसमवेत ग्राम विकास योजनेतील सदस्य डॉक्टरांसोबत सर्व गावांतील कार्यकर्त्यांसोबत आभासी सभा घेऊन कोविड महामारी – त्यावर अटकाव कसा आणायचा तसेच त्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी याकरिता प्रयत्न सुरु आहेत. कोविड केअर सेंटर सोबतच समुपदेशन, महामारीचा प्रसार तसेच त्याविषयी असलेली भीती दूर करण्यासाठी याबाबी महत्वपूर्ण ठरणार आहेत.
परिस्थिती बिकट असली तरीही संकटांशी झगडण्याची आपली क्षमता, धैर्य आणि मनोबल कायम ठेवून संयमाने, शिस्तीने आणि परस्पर सहयोगाने केशवसृष्टी या भीषण परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्या या कार्यास मनापासून शुभेच्छा !!
- तृप्ती पवार, विश्व संवाद केंद्र, मुंबई
**