EducationNews

हिंदू मुलीचे प्रशासकीय सेवा परीक्षेत नेत्रदीपक यश; पाकिस्तानात रचला इतिहास

इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये सना रामचंद्र गुलवानी या हिंदू मुलीने इतिहास रचला आहे. तिचे वय 27 वर्ष असून सेंट्रल सुपेरियर सर्व्हीसेसच्या (सीएसएस) परीक्षेत ती पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली आहे. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच एका हिंदू मुलीला या परीक्षेत यश मिळाले आहे. परीक्षेतील नेत्रदीपक यशानंतर सनाची नियुक्तीही निश्चित झाली आहे. सीएसएस परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या २२१ उमेदवारांमध्ये सनाचाही क्रमांक लागतो. एकूण १८५५३ उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, केवळ २ टक्क्यांपेक्षाही कमी उमेदवारांना या परीक्षेत यश मिळते, यावरून पाकिस्तानमधील ही परीक्षा किती अवघड असते, हे लक्षात येते. सेंट्रल सुपेरियर सर्व्हीसेस म्हणजेच पाकिस्तानच्या प्रशासकीय सेवेतील नियुक्तींची परीक्षा असून भारतातील युपीएससी दर्जाची तुलना या परीक्षेसोबत करता येऊ शकेल. पाकिस्तान प्रशासकीय सर्व्हिसेच्या अंतर्गत ही जागा भरण्यात येते. सनाने सिंध प्रांतातील रूरल जागेतून परीक्षेत सहभाग घेतला होता.

सना च्या पालकांनी सांगितले की, सनाने वैद्यकीय क्षेत्रातच करिअर करावे, अशी आमची इच्छा होती. आमच्या इच्छेनुसार मेडिकलचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सीएसएस परीक्षेतून प्रशासकीय सेवेत स्थान निश्चित केले. सनाने पाच वर्षांपूर्वी शहीद मोहतरमा बेनजीर भुट्टो मेडिकल युनिव्हर्सिटीमधून बॅचलर ऑफ मेडिसिन विषयात पदवी घेतली होती. त्यानंतर ती सर्जनही बनली. युरोलॉजिमध्ये मास्टर डिग्री घेतल्यानंतर तिने प्रशासकीय सेवेची तयारी सुरु करत पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले.

Back to top button