News

“संघासारख्या संघटनांचे बळ वाढले तर भारतातील अतिरेकी कारवायांना आळा बसेल” : न्या. जे. बी. कोशी

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे आपल्या देशाच्या एकात्मता आणि प्रगतीसाठी कार्यरत असणारे राष्ट्रभक्तांचे संघटन आहे. हे असे संघटन आहे, जे देशाचे सर्वोपरि हित लक्षात घेऊन भूमिका घेते”, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात आपल्या अध्यक्षीय भाषणात न्या. कोशी म्हणाले. रविवार, दि. १० ऑक्टोबर रोजी एर्नाकुलम येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी रा. स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे व अन्य मान्यवर उपस्थित होते. न्या. जे. बी. कोशी हे केरळातील अल्पसंख्यांक ख्रिश्चन समाजाच्या समस्यांवर अभ्यास करण्यासाठी केरळ सरकारने स्थापन केलेल्या आयोगाचे विद्यमान अध्यक्ष आहेत.

न्या. कोशी पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून मे, २००९ मध्ये निवृत्त झाले आहेत. पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होण्यापूर्वी ते केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होते. २०११ ते २०१६ या काळात ते केरळ राज्याच्या मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष होते.

अल्पसंख्यांक समुदायांना रा. स्व. संघाविरोधात भडकावण्यात येते, असे विधान न्या. कोशी यांनी केले. आपण ख्रिश्चन असून एका ऑर्थोडॉक्स चर्चचे सदस्य आहोत, आपली ही संस्था भारतीय संस्कृतीशी समरस होऊन कुठल्याही परदेशी प्रभावाशिवाय काम करते, असेही न्या. कोशी यांनी सांगितले. तालिबानने अफगाणिस्तानातील गुरुद्वारांवर केलेले हल्ले आणि काश्मीर मध्ये नुकतेच झालेले पंडितांचे खून यांचा संदर्भ देऊन ते म्हणाले की, “संघासारख्या संघटनांचे बळ वाढले तर भारतातील अतिरेकी कारवायांना आळा बसेल”. आपल्या देशातील विविधतेमध्ये एकता दिसून येते. विजयादशमीचा सण जी नऊ मूल्ये दर्शवतो, त्यांचाही उल्लेख न्या. कोशी यांनी यावेळी केला.

Back to top button