OpinionSeva

समृद्धीचा, समाधानाचा मार्ग या अनामिक शक्तीमुळे राष्ट्राची चिती घडवत जातो हे नक्की

संघ कामात असणाऱ्या महिला शक्तीच्या कामाची मिडिया तितकी फारशी दखल घेत नव्हता. जवळपास ८७ वर्षाहून अधिक काळाची पार्श्वभूमी असलेलं काम. एका बाजूला आर्थिक प्रगतीच्या दिशेने वेग घेत असलेला भारत, वाढते शहरीकरण आणि शिक्षण म्हणून महिलांचा सहभाग समाजजीवनात नक्कीच वाढता राहिला आहे. संघाचं कुठलंही काम समाजाच्या परिघाबाहेर नाही. अगदी ते महिला क्षेत्रातीलही असो.

एका बाजूला विरळ होत चाललेली कुटुंबपद्धती आणि भारतीय समाजासमोर असलेलं सांस्कृतिक एकात्मतेचे आव्हान यामुळे महिलांचा एकूणच सामाजिक कामातील प्रत्यक्ष सहभाग आवश्यक वाटत होता. त्याचा यशस्वी प्रयोग संघ आणि सहयोगी संस्था यांच्या माध्यमातून नक्की झाला आहे. बदलत्या वातावरणात महिलांविषयी आदर आणि सुरक्षा या दोन्ही गोष्टी महत्वाच्या होत्या आणि अजूनही आहेत. समाजातील महिलांच्या सन्मानाबरोबर मातृत्वाला प्राथमिकता देणारे कार्यशैली याचा आधार राहिला आहे. भारतीय समाजमानस म्हणून एक सुरक्षात्मक कवच महिलांच्या भोवती घराघरात आहे. भारतीय संस्कृतीचा गौरव आणि आत्मविश्वासाचे प्रतिक हे महिला क्षेत्रातील काम आहे.

स्व सरंक्षणासाठी स्री शारीरिकदृष्ट्या दृष्ट्या सक्षम असण्याबरोबर कुटुंबाचा, समाजजीवनाचा आधारस्तंभ आहे या हेतूने कामाकडे बघण्याची अधिक गरज आहे. गरुड आकाशात झेप घेत असताना आपले पंख समतोल स्थितीत आणतो. त्यातल्या एकाही पंखाला जर इजा झाली तर तो आकशात झेप घेवू शकणार नाही. दोन्ही पंख तितकेच सक्षम रहावे. याच अर्थाने राष्ट्राची उभारणी करताना या कामाला दिशा देणारे काम हे महिला क्षेत्रातील आहे. याचमुळे कुटुंब आणि समाजजीवन या कामाशी जोडले गेले आहे हे नक्की.

दैनंदिन नागरी जीवनातील सहभागाबरोबर राष्ट्रीय जीवनाशी जोडलेलं हे काम. देशभक्तीने भारावलेले मातृत्व हे भारतीय इतिहासातून वारंवार घडत असलेलं दर्शन राष्ट्रीय स्री शक्तीचं द्योतक आहे. हे येथपर्यंत थांबत नाही सेवाकार्यातील आणि महिला सक्षमीकरण म्हणून उभी केलेले अनेक काम सहजगत्या सांगता येतील. त्यातील एक उदाहरण सोलापूरच्या चंद्रिकाभाभींचे आहे. तर दुसरीकडे सावित्रीबाई फुले एकात्म समाज या नावाने चाललेलं डॉ. हेडगेवार रुग्णालयातील काम.

समाज जिच्यामुळे जोडला जातो. ती तितकीच अनामिक आहे. ती धागा आहे. बाकी सगळे एकमेंकाना जोडलेलं दिसत असताना जोडणारा धागा दिसेलच असं नाही. याचा अर्थ असा नाही तिचं अस्तित्व नाही. समाजातील सकारत्मक आणि चांगल्या बदलांचा केंद्रबिंदू होऊ पाहणारे महिला क्षेत्रातील काम आहे यात कुठलीही शंका नाही. ह्यातील स्रीशक्तीच्या एकेक पावलांनी, कृतीने कुटुंब जोडली जातात, सण समारंभाच्या निमित्ताने कुटुंब, निसर्ग मानवी आयुष्याशी जोडला जातो. त्यातून सांस्कृतिक जीवन आकाराला येते. समृद्धीचा, समाधानाचा मार्ग या अनामिक शक्तीमुळे राष्ट्राची चिती घडवत जातो हे नक्की.

-संजय साळवे

Back to top button