Opinion

भाऊसाहेब जावडेकर ते सूर्योपासना.. आणि निखील कुलकर्णी ते विवेकानंद केंद्र..

75 कोटी सूर्यनमस्कारांचा महत्वाकांक्षी राष्ट्रव्यापी प्रकल्प एक जानेवारीला सुरू झाला असून तो 14 जानेवारी (मकर संक्रांती) ते 7 फेब्रुवारी (रथसप्तमी) चालणार आहे.. विवेकानंद केंद्रही या उपक्रमात सहभागी होत आहे.. या निमित्ताने.. )

भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्ताने ७५ कोटी सूर्यनमस्कार घालून विश्वविक्रम रचण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम पतंजली योगपीठ, गीता परिवार, क्रीडा भारती, हार्टफुलनेस संस्था आणि नॅशनल योगासन स्पोर्ट्स फेडरेशन या पाच संस्थांनी हाती घेतला असल्याची आणि त्या उपक्रमात विवेकानंद केंद्राच्या हजार-बाराशे शाखाही सहभागी होत असल्याची बातमी कानावर आली आगामी वर्षात १ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या ३८ दिवसांच्या दरम्यान या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने, किमान एकवीस दिवस रोज किमान १३ सूर्यनमस्कार घालावयाचे असल्याची माहिती समजताच आठवण झाली ती इंदापूरच्या भाऊसाहेब जावडेकरांची..


इंदापूर हे पुणे जिल्ह्यातलं पंचवीस हजार वस्तीचं छोटेखानी गाव. महाराष्ट्राच्या विद्यमान राजकारणात आज ते गाव ओळखलं जातं ते हर्षवर्धन पाटील यांचं गाव म्हणून. हर्षवर्धन पाटील सुमारे चार वेळा याच मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. पण महाराष्ट्राच्या ज्ञात इतिहासात हे गाव ओळखलं गेलं ते छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांची जहागीर असलेलं गाव म्हणून..
या गावात सरकारी शाळा सुरु झाली ती १८६५ च्या सुमारास. दीडशे वर्ष झालेली ती शाळा आजही सुरु आहे..भाऊसाहेब जावडेकर इंदापूरच्या या शाळेत नेमके कधी लागले त्याचे तपशील माहित नाहीत, परंतु विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकादरम्यान भाऊसाहेब त्या शाळेत शिकवत होते याचे उल्लेख सापडतात. हे भाऊसाहेब म्हणजे शंकर हरी तथा गुरुवर्य भाऊसाहेब जावडेकर. भाऊसाहेब हे एकाच वेळेस सहावी आणि सातवीला शिकवणारे केवळ कळकळीचे शिक्षक नव्हते, ते उत्तम व्यायामप्रेमी होते, सखोल अभ्यास व प्रयोग करून सिद्धांत मांडणारे एक संशोधक, खंदे देशभक्त आणि उत्तम संघटक होते..
भाऊसाहेब अभ्यासक्रम तर पूर्ण करून घेतच, परंतु मुलांमध्ये श्रमप्रतिष्ठा बाणावी, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत यासाठी स्वतःच शाळा उघडायचे, शाळेची पहिली घंटाही द्यायचे. पंधरा मिनिटांनी शाळेची दुसरी घंटा देखील तेच द्यायचे, ती असायची प्रार्थनेची. शाळेच्या मुख्य दरवाजाजवळ पाण्याचा रांजण, टॉवेल आणि भला मोठा आरसा ठेवलेला असायचा. त्या आरशाखाली समर्थ रामदासांच्या दासबोधातील एक चरण लिहिलेला असायचा,
दंत, चक्षु आणि घ्राण I पाणी, वसन आणि चरण II
हे सर्वकाळ जायचे मलीन I तो एक मूर्ख II


शाळेत जाताना प्रत्येकानं आरशात डोकावून जावं, आपले दात, हात, पाय निर्मळ आहेत असं पहावं हा त्यामागचा उद्देश असे. शाळेत येण्यापूर्वी सकाळी सातच्या आत प्रत्येकानं स्नान करून यावं असाही भाऊसाहेबांचा दंडक असायचा..
इंदापूरला केळकर नावाचे फौजदार होते. त्यांचे बंधू सांगलीहून इंदापूरला आले असताना भाऊसाहेबांना आवर्जून भेटले होते आणि शाळेत मुलांसाठी सूर्यनमस्कार सुरु करण्याची विनंती त्यांनी केली होती. याच सुमारास परांजपे नावाचे कुणी सूर्य-नमस्कारांचे प्रचारक इंदापूरमध्ये आले होते. त्यांनी तर कपडे काढून उघड्या अंगाने सूर्यनमस्कार घालून दाखवले होते आणि त्याचा शरीरातील निरनिराळ्या अवयवांवर आणि स्नायूंवर काय परिणाम होतो ते विषद करून सांगितले होते..


केळकर आणि परांजपे यांच्या आग्रहाने भारावून गेलेल्या भाऊसाहेबांनी एक नवाच प्रयोग करायचे ठरवले. जोर बैठकांचा व्यायाम आणि सूर्य-नमस्कारांचा व्यायाम या दोनपैकी नेमका कशाचा फायदा शरीराला होतो हे पाहण्यासाठी भाऊसाहेबांनी पाचवी-सहावी-आणि सातवीमधील मुलांच्या दोन तुकड्या केल्या. दोन्ही तुकड्यातील मुलांची उंची, वजन, छातीचा घेर, दंडाचा आणि मांडीचा घेर यांची मापं घेऊन नोंदवून ठेवली होती. एक तुकडी जोर-बैठकांचा व्यायाम करायची तर दुसरी सूर्यनमस्कारांचा. दरमहा ठराविक दिवशी मुलांच्या मापांची नोंद व्हायची. तीन वर्षे हा प्रयोग चालला. तिसऱ्या वर्षाच्या शेवटी असे आढळले की जोर-बैठकांनी मांड्या आणि दंड यातील स्नायू अधिक वाढतात, फुगतात आणि त्यांची शक्ती वाढते, तर सूर्यनमस्कार घालण्याने छाती जास्त भरून येते, उंची अधिक प्रमाणात वाढते, पोट पोळीसारखे मऊ व पातळ बनते..


इंदापूर शाळेत चाललेले सूर्यनमस्काराचे कार्य औंधचे महाराज बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्या कानावर गेले आणि एके दिवशी दुपारी तीनच्या सुमारास अकल्पितपणे ते शाळेत आले. भाऊसाहेब त्यांना पाहून आश्चर्यचकित झाले. थोडी चौकशी करताच पंतप्रतिनिधी म्हणाले, “ मला तुमच्या येथील नमस्कारांचा व्यायाम, जोर-बैठकांचा तुलनात्मक प्रयोग आणि तुमची शाळा पहायची आहे. त्यासाठी मी मुद्दामहून औंधहून आलो आहे. ”


भाऊसाहेबांनी मुलांचे सूर्यनमस्कारांचे प्रात्यक्षिक महाराजांना दाखवले. मुलांचा मंत्रांचा उच्चार आणि नमस्कारातील शरीराची शास्त्रीय पद्धतीने होणारी हालचाल, श्वसनपद्धती पाहिली, जोर-बैठका आणि नमस्कार या व्यायामाचे तुलनात्मक रेकॉर्ड पाहिले, शाळा पाहिली आणि शेवटी मुले आणि शिक्षकांच्या सभेत पंतप्रतिनिधी म्हणाले, “ माझ्या हातात औंधची राजसत्ता असतानाही माझा आवडता व्यायाम मी अशा पद्धतीने व सामुदायिक रीतीने करून घेऊ शकलो नव्हतो. ते काम इंदापूर सारख्या खेड्यातील शाळेचा एक प्राथमिक शिक्षक करू शकला हे पाहून मला आनंद होतो आहे. पण त्याचबरोबर भाऊसाहेबांकडे सूर्यनमस्काराबद्दल श्रद्धा, कामाबद्दल कळकळ, तळमळ, असे कितीतरी गुण असल्याने हे कार्य झाले आहे, मला झालेल्या आनंदाचे प्रतिक म्हणून मी माझ्या हातातील ही सोन्याची अंगठी त्यांच्या हातात घालतो आहे. ” औंधला सकाळी राजेसाहेबांच्या कुटुंबातील सर्व मंडळी, म्हणजे मुले, मुली, राणीसाहेब, सर्वजण स्नान उरकून समंत्र सूर्यनमस्कार घालत. .


भाऊसाहेब जावडेकर यांच्या या सूर्योपासनेविषयीची माहिती मला वाचायला मिळाली ती पु. ग. तथा पंडित जावडेकर यांनी संकलित केलेल्या एका पुस्तिकेत. व्यक्तिमत्व दर्शन हे त्या पुस्तिकेचे नाव. भाऊसाहेबांचे चिरंजीव सुधाकर जावडेकर यांनी ही पुस्तिका छापली. भाऊसाहेबांना एकूण आठ मुलं, त्यातले मनोहर, श्यामसुंदर, जनार्दन, प्रभाकर, मधुकर, बाळकृष्ण, सुधाकर हे सात मुलगे तर शांता, सुमन आणि इंदू या तीन मुली. माझा संबंध यातल्या प्रभाकर जावडेकर यांच्याशी आला तो त्यांचा नातू आशय याचे माझ्या मुलीशी लग्न झाल्यामुळे..


भाऊसाहेब हे पंडित जावडेकरांचे चुलते. भाऊसाहेबांचे शिष्योत्तम शंकरराव थोरात १९२६ साली बदली होऊन दौंडहून इंदापूरला आले आणि त्यांना भाऊसाहेबांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी “ धडपडीचे जीवन “ नावाचे आत्मचरित्र लिहिले, त्यात भाऊसाहेबांविषयीच्या अनेक आठवणी ग्रथित करण्यात आल्या होत्या. त्या हस्तलिखितातील भाऊसाहेबांविषयीच्या आठवणी वेगळ्या काढून पु. ग. जावडेकरांनी १९९१ साली त्या पुस्तिकारूपाने प्रसिद्ध केल्या. थोरातांचे हस्तलिखित तेव्हापर्यंत तरी अप्रकाशितच होते..


त्या पुस्तिकेतील औंधच्या राजेसाहेबांविषयीचा उल्लेख वाचला आणि मला आठवण झाली ती विवेकानंद केंद्राने प्रकाशित करावयास घेतलेल्या एका सूर्यनमस्कार विषयक ग्रंथाची. जावडेकर इंदापूरचे, परंतु त्यांना सूर्यनमस्काराच्या उपक्रमाची प्रेरणा दिली ती सांगलीच्या केळकरांनी. त्याच सांगलीत शिकलेले आणि कॅलिफोर्नियात गेली अनेक वर्षे स्थायिक झालेले डॉ. निखील कुलकर्णी यांची आणि माझी गाठ कोविडग्रस्ततेच्या काळात फेसबुकवर पडली आणि त्यांचे सूर्यनमस्काराविषयीचे प्रेम, त्यांचा अभ्यास, त्यांचा सूर्यनमस्कार प्रचार-प्रसाराचा ध्यास पाहून त्यांचे लेखन पुस्तक रुपाने प्रसिद्ध करण्याचा निर्णय विवेकानंद केंद्राच्या मराठी प्रकाशन विभागाने घेतला..


आज आपण जे १० किंवा १२ आसनांचे सूर्य नमस्कार घालतो त्याचा पहिला प्रयोग, औंध संस्थानचे राजे भवानराव श्रीनिवासराव पंत यांनी साधारण १९३० च्या सुमारास केला. भवानराव पंत यांचे चिरंजीव म्हणजे आप्पासाहेब पंत, जे पुढे ब्रिटनमध्ये भारताचे राजदूत होते. औंधचे राजे भवानराव पंत आणि मिरजेचे संस्थानिक पटवर्धन बऱ्याच वेळेला दोघे मिळून व्यायाम करत. पंतप्रतिनिधी यांनी त्यांच्या राणीसाहेबांना देखील हा व्यायाम प्रकार शिकवला होता. आणि या व्यायामातून राणीसाहेबांची अनेक दुखण्यातून सुटका झाली होती. वयाच्या ८० व्या वर्षी देखील राजेसाहेब आणि राणीसाहेब चाळीशीतले वाटत. १९३५-३६ च्या सुमारास त्यांना भेटायला, Louise Morgan नावाच्या “News Chronicle” नावाच्या वृत्तपत्रात काम करणाऱ्या एक इंग्रज पत्रकार बाई इंग्लंडहून आल्या होत्या. राजेसाहेबांची तब्बेत आणि एखाद्या तरुणाला लाजवेल असा त्यांचा उत्साह पाहून त्या बाई इतक्या प्रभावित झाल्या की, त्यांनी राजेसाहेबांची या विषयावर एक प्रदीर्घ मुलाखत घेतली. ती मुलाखत पुढे इंग्लंडमध्ये पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली. आज आपण ज्या पद्धतीने सूर्यनमस्कार घालतो त्याचा पहिला लिखित दाखला म्हणजे हे पुस्तक आहे..


या पुस्तकात सूर्यनमस्कारात अंतर्भूत आसनांचा अभ्यास आहे, सूर्यनमस्काराचे फायदे आहेत. विशेष करून स्त्री उपासकांसाठी ते अतिशय वाचनीय आणि माहितीपूर्ण आहे. कॅलिफोर्नियाच्या बे एरियात डॉ. निखील कुलकर्णी सूर्यनमस्काराचे वर्ग घेतात, नमस्कारामागची तात्विक, योगिक आणि वैद्यकीय चिकित्सा अभ्यासार्थींना समजावून देतात आणि सूर्यनमस्काराची गोडी त्यांच्यात उत्पन्न करतात. त्यांनी शिकवलेल्या सूर्यनमस्कारांमुळे अनेकांना आरोग्यविषयक फायदे झाल्याचे ते म्हणाले. त्या फायद्यातला एक फायदा म्हणजे अनेकांची व्यसनातून सुटका झाली. हे सारे चिंतन निखील कुलकर्णी यांनी १२ लेखांमध्ये फेसबुकवरून मांडलं, पुढे पुण्याच्या टिळक स्मारक मंदिराच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या वसंत व्याख्यानमालेत त्यांनी ते चिंतन आभासी पद्धतीने श्रोत्यांसमोर मांडलं, त्याचं संकलन म्हणजे सूर्योपासना हे पुस्तक. सूर्यनमस्कारांच्या विश्वविक्रमी यज्ञाची माहिती वाचली आणि हे सारं आठवलं..


-सुधीर जोगळेकर
सचिव, विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग, पुणे.

Back to top button