News

टीका करणाऱ्यांनी संघात येऊन संघाच्या कार्यपद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा – डॉ. मोहन भागवत

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर अनेकांनी अनेक प्रकारच्या टीका केल्या आहेत. हिंदूराष्ट्रापासून ते घरवापसीपर्यंतच्या मुद्द्यांवर संघावर निशाणा साधण्यात आला आहे. मात्र, टीका करणाऱ्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात यावे. संघाची कार्यपद्धती, आचरण यांचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. दै. लोकमत नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

हिंदुत्त्व आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावर डॉ. मोहन भागवत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ. मोहन भागवत यांनी अनेकविध मुद्द्यांवर आपली मते मांडली.  

हिंदुत्व या संकल्पनेचा प्रथमोच्चार रा.स्व.संघ किंवा स्वा. सावरकर यांनी पहिल्यांदा केला असे नाही. हिंदुत्वाचा पहिला उच्चार गुरुनानक यांनी केला. हिंदू समाज शस्त्रास्त्र घेऊन बलशाली झाला, तरी तो गोष्टी भगवद्‌गीतेच्या करेल, असे स्वा. सावरकर यांनी म्हटले होते. याचे कारण म्हणजे हिंसेचे समर्थन हिंदू करत नाही. अहिंसा, सत्याच्या मार्गावर चालणारा हिंदू आहे. प्राचीन काळापासून आतापर्यंत हिंदुंनी केलेली युद्धे विनाश करण्यासाठी नाही, तर रक्षणासाठी केलेली दिसतात, असे सांगत हिंदुत्व संस्कृती सर्वत्र पवित्रतता पाहते. हा स्वभाव समाजाचा आहे.

माजी राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जी यांच्या आठवणींना उजाळा देताना सरसंघचालक म्हणाले की, भारताला अमेरिकेकडून लोकशाहीचे प्रमाणपत्र नको आहे, असे प्रणव मुखर्जी म्हणाले होते. या देशाच्या राज्यघटनेत धर्मनिरपेक्षता हा शब्द नसता तरी देशाला धर्मनिरपेक्ष म्हणावे लागेल कारण भारतीय समाज आणि संस्कृतीत 5 हजार वर्षांपासून धर्मनिरपेक्षता रुजली आहे असे मुखर्जींनी सांगितले होते. संघाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे प्रणव मुखर्जी यांना हिंदुत्ववादी म्हटले गेले. मुखर्जी यांच्यावर टीका करताना हिंदुत्व हा शब्द वापरण्यात आला. हिंदुत्व हा टीकेचा विषय नाही, असे सांगून डॉ. सरसंघचालक म्हणाले की, पूर्वीच्या काळी ब्रिटिशांनी भारतीय समाजाला गुलाम बनवण्याचा कट रचला होता. इंग्रजांना या देशात आपल्यासारख्या काळ्या इंग्रजांची मानसिकता आणि गुलामगिरीला चालना देणारी व्यवस्था विकसित करायची होती. ब्रिटीश राजवटीत केलेले नाटक पुन्हा भारतासोबत घडत असल्याचा इशारा सरसंघचालकांनी दिला. सरसंघचालक म्हणाले की, जगातील काही शक्तींना भारताचा उदय होऊ द्यायचा नाही. परिणामी भारतीय समाजात संभ्रम आणि परस्पर संघर्ष निर्माण होतो, त्यामुळे अशा गोष्टींना जाणीवपूर्वक प्रोत्साहन दिले जाते.

यावेळी भागवत म्हणाले की, काही दिवसांपूर्वी झालेल्या धर्मसंसदेतील काही गोष्टींवर टीका होत आहे. अयोग्य विधानाचे समर्थन होऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीने त्वेषात येऊन कोणतेही अनुचित विधान केले तर त्याला धार्मिक प्रतिक्रीया म्हणता येणार नाही. अशा गोष्टी स्वीकारार्ह नाहीत, देशात कोणीही त्यांचे समर्थन करत नाही असे सरसंघचालकांनी स्पष्ट केले.

भारतभक्ती, संस्कृती, पूर्वजगौरव महत्त्वाचे आहे. कारण आपल्या पूर्वजांनी राष्ट्र उभे करण्यासाठी, संस्कृती रुजवण्यासाठी तसेच ती वाढवण्यासाठी अनेक कष्ट सोसले आहे. असे पूर्वज आपले आदर्श आहेत. त्यांना आपण आदर्श मानले पाहिजे. म्हणूनच आम्ही या तीन तत्त्वांचा आग्रह धरतो, असे मोहन भागवत यावेळी म्हणाले. चुकीच्या गोष्टींचा त्याग करण्याची आवश्यकता आहे. आमचेही काही चुकत असले, तरी ते आम्ही सोडून दिले पाहिजे. एकता हाच विचार समान आहे. असे मोहन भागवत यांनी सांगितले.

Back to top button