HinduismOpinion

म्लेंच्छक्षयदीक्षित-छ.शिवाजीमहाराज

छत्रपती शिवाजी जयंती विशेष माहिती श्रृंखला – २

सध्या छत्रपती शिवाजीमहाराजांबाबत मुद्दाम काही गैरसमज निर्माण केले जात आहेत. ते कसे मुस्लिमप्रेमी होते,त्याच्या सैन्यात 57% तर कुठे 90%मुसलमान कसे होते आणि त्यांनी रायगडावर मशिद बांधली अशा भाकडकथा रचून सांगितल्या जात आहेत. इतिहासात मुस्लिम आक्रमकांनी हिंदुवर केलेल्या अत्याचारावर पांघरुण घालण्यासाठी खेळली जाणारी ही खेळी आहे.

वास्तविक शिवाजीमहाराज कसे होते?
प्रत्येक हिंदुराजा हा सहिष्णुच असतो. त्याप्रमाणे महाराजही सहिष्णु होते. भारत हा विविध उपासनापध्दती आणि संप्रदायानी नटलेला देश आहे.सगळ्याच उपासनापध्दती एकाच सत्याकडे जातात,ही आमची श्रध्दा आहे. आम्ही भारतीय लोक आपली ईश्वरविषयक संकल्पना इतरांवर लादण्याचा प्रयत्न करत नाही अथवा त्यासाठी सक्ती करत नाही. पण सहिष्णु असणे याचा अर्थ परकीयांनी आमची मंदिरे पाडावी,आणि आम्ही ते बघत बसावे,हे शिवाजीमहाराजांना कदापि मान्य नव्हते.

परंतु इस्लाम आणि ख्रिश्चन या दोन संप्रदायांनी जगभर तलवारीच्या जोरावर आपल्या धर्माचा प्रसार केला. गोव्यात पोर्तुगिजांनी ख्रिस्तीधर्म स्वीकारण्यासाठी लोकांवर केलेले अत्याचार माणुसकीला काळीमा फासणारे आहेत किंवा मुहम्मद बिन कासीमपासून औरंगजेबापर्यंत मुस्लिम आक्रमकांनी हिंदुवर केलेले अत्याचारही याच श्रेणीत येतात.

बाबराने तर हिंदुची कत्तल करत त्यांच्या मुंडक्याचे मिनार उभे केल्याची उदाहरणे आहेत. बाबर लिहीतो –

“गंगा यमुनेच्या दुआबात आमच्या छावणीजवळ असलेल्या एका छोट्या टेकडीवर लढाई झाली.या लढाईत मारलेल्या काफीर हिंदुंच्या मुंडक्यांचे मिनार या टेकडीवर रचण्याची आज्ञा मी दिली”

बाबरनामा (इंग्रजी भाषांतर ) जाॅन लेयडन आणि विल्यम अर्स्कीन ,खंड-2 , पृष्ठ क्र- 308 )

“द ग्रेट” म्हटला जाणारा अकबरदेखील काही कमी धर्मांध नव्हता, अकबराने पानिपतच्या दुसर्या लढाईत हेमचंद्राचा पराभव केल्यानंतर दुसर्या दिवशी जेव्हा अकबर पानिपतावर आला तेव्हा त्याने शत्रुच्या मुंडक्याचे मिनार रचण्याची आज्ञा दिली.

( मुन्तखाब-उत-तवारिख, बदायुनी ,इंग्रजी अनुवाद डब्ल्यू.एस.लो,पृष्ठ क्र-10)

याच अकबराने चित्तोड विजयानंतर 30,000 निरपराध राजपुतांची कत्तल केली होती.

मराठा विरुध्द अफगाण अशा महाविनाशकारी पानिपत युध्दानंतर अहमदशाह अब्दालीनेही मराठ्यांच्या मुंडक्याचे मिनार रचले होते. (काशीराजाची बखर)

मुस्लिम आक्रमकांनी कशा पध्दतीने बौध्दविहार जमिनदोस्त केले आणि बौध्द भिक्खुंच्या कत्तली केल्या याचे वर्णन डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनीही केले आहे. ( संदर्भ- डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समग्र वाड्मय, खंड-3 , पृष्ठ क्र.-229)

अशी ही निर्दयी ,अमानुष इस्लामी परंपरा संपवून टाकण्यासाठी शिवाजीमहाराजांनी आणि संभाजीमहाराजांनी आयुष्याच्या अंतापर्यंत संघर्ष केला.छत्रपती शिवाजीमहाराजांच्या आज्ञेने “शिवभारत” ग्रंथाचे लेखन कविंद्र परमानंदांनी केले आहे. त्यात लिहिले आहे –

” हतं तेन महोत्साहवता वीरेन मानिना l
स्वधर्माभिनिविष्टेन म्लेंच्छधर्मो विहन्यते ll
(शिवभारत अध्याय 17, श्लोक -12)

अर्थ – अरेरे! त्या महाउत्साही,मानी,स्वधर्माभिमानी वीराकडुन (शिवराय) मुसलमानी धर्माचा नाश होत आहे.

छ.संभाजीमहाराज यांनी बाकरेशास्त्री यांना 27 आॅगस्ट 1680 रोजी एक दानपत्र दिले,त्यात शिवाजीमहाराजांचा उल्लेख “म्लेंच्छक्षयदीक्षित” असा करण्यात आला आहे.म्हणजे “यवनांच्या नाशाची ज्यांनी दीक्षा घेतली असे माझे वडील” (शिवाजीमहाराज) होते, असा याचा अर्थ आहे.

आज्ञापत्रात तर स्पष्टच लिहिले आहे की “अवनीमंडळ निर्यवनी करावे,यवनाक्रांत राज्य आक्रमावे”

छ.शिवाजीमहाराज यांनी परकीय आक्रमकांविरुध्द संघर्ष केला,त्या आक्रमकांचा आणि भारतीय मुस्लिमांना काहीही संबंध नाही. भारतीय मुस्लिमांचे पूर्वज हिंदुच होते. त्यामुळे त्यांनी मुहम्मद बिन कासीम, बाबर,औरंगजेब यांना आपले पूर्वज मानण्याचे काही कारण नाही. सुप्रसिध्द कन्नड लेखक डाॅ.एस.एल.भैरप्पा लिहीतात ” मागे केलेल्या चुकांसाठी आजचे जबाबदार नाहीत हे तर खरचं, पण मागच्यांशी नाते जोडून ‘आपण त्यांचेच वारसदार या भावनेत आपण अडकणार असू ,तर त्यांनी केलेल्या कर्माची जबाबदारी स्वीकारावी लागेल” ( आवरण )

दुर्देवाने भारतात या अत्याचारी परकीय आक्रमकांना हिरो बनवून सादर केले गेले आहे. शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात त्यांचा अत्याचार कुठेही दिसणार नाही,याची ढोंगी सेक्युलर सरकारांनी काळजी घेतलेली आहे.उदाहरणार्थ- २८ एप्रिल १९८९ रोजी पश्चिम बंगालमधील मार्क्‍सवादी सरकारने एक परिपत्रक काढले. हे परिपत्रक बजावते की, ‘‘भारतातील मुस्लीम राज्यकर्त्यांच्या कालखंडाची निंदा होता कामा नये. मुस्लीम आक्रमकांनी या देशात मंदिरांचा विध्वंस केला त्याचा कुठेही उल्लेख नसावा.’’ (परिपत्रक एसवायएल/८९).

छत्रपती शिवरायांनी इस्लामिक आक्रमणांविरुध्द संघर्ष केला,हाच सत्य इतिहास आहे. सत्य हे कटू असले तरी ते स्वीकारावेच लागते.

Back to top button