EntertainmentOpinion

हा हुंकार हिंदुत्वाचा आहे..!

गेल्या एक – दीड महिन्यात अनेक घटना फार वेगाने घडलेल्या आहेत. महाबलाढ्य रशिया ने युक्रेन वर आक्रमण केले. साधारण दोन – चार दिवसात युक्रेन चा पूर्ण पाडाव होईल हेच सर्वांचे भाकीत होते. मात्र तसे झाले नाही. नाटो देश आणि अमेरिका यांनी प्रत्यक्ष मैदानातून माघार घेऊनही युक्रेन सारखा लहानसा देश, आज सदोतीस दिवस झाले तरी चिवटपणाने झुंजतोय. लढतोय. ह्या दरम्यान दोन गोष्टी घडल्या. एक – पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि दोन – दिनांक ११ मार्च ला ‘द कश्मीर फाईल्स’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. विधानसभांच्या निकालांनी एक गोष्ट परत अधोरेखित केली की उत्तर प्रदेश सारख्या महाकाय राज्यातली जनता हिंदुत्वाचे समर्थन करणार्‍या भाजपा च्या मागे उभी आहे.

द कश्मीर फाईल्स’ ने मात्र जणू एखाद्या क्रांतीची सुरुवात केली. सुमारे चौदा कोटींचा हा सिनेमा. भारतीय सिने जगताच्या भाषेत बोलायचं तर सर्वार्थानं ‘लो बजेट फिल्म’. पण या चित्रपटाने इतिहास घडविला. फक्त ६३० स्क्रीन्स वर प्रदर्शित झालेल्या ह्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी चक्क ४.२५ कोटी रुपये कमावले. या यशाला ह्या दृष्टिकोणातून बघता येईल – काही महिन्यांपूर्वीच, म्हणजे नोव्हेंबर २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या ‘अंतिम’ ह्या चित्रपटाला ३,२०० पडद्यांवर प्रदर्शित केल्या गेले होते. ह्या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे उत्पन्न होते – मात्र ५ कोटी रुपये ! या पार्श्वभूमीवर कश्मीर फाईल्स चे यश झळाळून दिसतेय.

अगदी पहिल्या दिवसापासूनच हा चित्रपट ‘लोकांचा चित्रपट’ झाला. सर्वसामान्य चित्रपटात असणार्‍या ‘मसाल्याचा’ पूर्ण अभाव. गाजलेली गाणी नाहीत, की खूप गाजलेले कलावंतही नाहीत. चित्रपट गंभीर. अंगावर येणारा. आणि तरीही हा चित्रपट रोज यशाचे नवनवीन कीर्तिमान स्थापित करत होता. चित्रपट संपल्यावरही लोकांनी आपापल्या खुर्च्यांवर बसून राहणं; त्याच स्थितीत अनेक ठिकाणी कोणी तरी हृदयाच्या तळातून आलेल्या आत्यंतिक आवेशानं, या चित्रपटाच्या निमित्ताने सद्य स्थितीवर भाष्य करणं; हिंदूंच्या भविष्याबद्दल बोलणं; शहरा – शहरांतून, गावा – गावांतून लोकांनी चक्क मोर्चे काढत, गटा-गटाने घोषणा देत, भगवे ध्वज नाचवत हा चित्रपट बघायला जाणं….. हे सारं अद्भुत होतं. या देशात प्रथमच घडत होतं. हिन्दी चित्रपटसृष्टीला जबरदस्त हादरे देत होतं..!

या देशाच्या एका भागात हिंदूंवर भयानक आणि अमानुष अत्याचार होत होते आणि या देशातील अधिकांश हिंदूंना त्याची माहिती नव्हती, जाणीव नव्हती. ह्या जळजळीत सत्याने अनेक जण अस्वस्थ होत होते. आणि ह्या वेदनेतूनच जणू काही या देशातील हिंदू खडबडून जागा झाला. त्याला हिंदू एकोप्याची, संघटित ताकदीची गरज जाणवायला लागली. अखिल विश्वात हिंदूंना संघटित करणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल कुतूहल आणि आकर्षण निर्माण झाले. आणि त्यातूनच, जेंव्हा काही चित्रपटगृहांत, हा चित्रपट संपल्यावर एक – दोन स्वयंसेवक संघाची प्रार्थना म्हणू लागले, तेंव्हा त्या गच्च भरलेल्या चित्रपटगृहातील प्रत्येक व्यक्तीने अत्यंत अनुशासित पद्धतीने संघाची प्रार्थना म्हटली. हे असं विलक्षण या देशात पहिल्यांदाच घडत होतं.

दोन आठवड्यात अडीचशे कोटी रुपये गोळा करणार्‍या ह्या चित्रपटानंतर आला दक्षिणेतला ‘बिग बजेट’ चित्रपट – RRR. तेलंगाणा मधील दोन क्रांतिकारकांच्या जीवनावरील हा चित्रपट विशुध्द भारतीय रंगात रंगलेला होता. ह्याचे नायक आणि इतर अभिनेते चक्क भारतीय पध्दतीने धोतर नेसलेले आणि कपाळावर गंध लावलेले होते. छत्रपती शिवाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस हे आदर्श पुरुषांच्या रूपात दाखवले होते. महत्वाचे म्हणजे, चित्रपटाच्या शेवटी, चित्रपटाचा नायक हा कोदंडधारी रामाच्या स्वरुपात समोर येतो.

ह्या चित्रपटानेही उत्पन्नाचे सर्व कीर्तिमान ध्वस्त केले. या पूर्वी दणदणीत यश मिळवलेला, प्राचीन भारतीय परिवेशातला ‘बाहुबली’ हा चित्रपट या एस एस राजमौलींचाच. पण RRR ने त्याचाही विक्रम मोडला. ह्या सर्व गोष्टींचा हिन्दी चित्रपट सृष्टीवर परिणाम होताच होता. फक्त ‘पैसा’ आणि ‘यश’ या दोनच गोष्टी समजणार्‍या ‘बॉलीवुड’ ला पुरतेपणी कळून चुकलं की यापुढे या देशाच्या संस्कृती आणि परंपरेशी फटकून असलेला कोणताही चित्रपट, या देशात चालू शकणार नाही. आणि म्हणूनच या कालावधीत सलमान खान, शाहरुख खान, अमीर खान ही खान गॅंग बिळात लपून बसली होती. अक्षय कुमार ने, त्याच सुमारास प्रदर्शित झालेल्या, त्याच्या ‘बच्चन पांडे’ ह्या मार खाल्लेल्या चित्रपटावर फारसं काही न बोलता, त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली. दसरा – दिवाळीत प्रदर्शित होणारा त्याचा ‘पृथ्वीराज’ हा चित्रपट, पृथ्वीराज चौहान वर केन्द्रित आहे आणि संपूर्णतः भारतीय रंगात रंगलेला आहे!

हे सर्व सविस्तर सांगायचं कारण म्हणजे हिंदुत्वा बद्दल गेल्या महिन्या – दीड महिन्यात दिसलेली ही प्रचंड अनुकूलता आणि जनजागरण. हिंदू मूल्य, हिंदू संस्कृती, हिंदू परंपरा या बद्दल देश – विदेशात प्रचंड कुतूहल निर्माण झालेले आहे. कदाचित आपल्यापैकी अनेकांनी ‘आज तक’ ह्या वाहिनी वर युक्रेन च्या आंद्रे (Andre) नावाच्या सैनिकाची, भारतीय वार्ताहर महिलेने घेतलेली मुलाखत बघितली असेल. रशियन – युक्रेन युध्द प्रारंभ होऊन तीन आठवडे झाले होते. आपल्या देशासाठी लढणार्‍या त्या युक्रेन सैनिकाने सांगीतले की त्याला युध्दाची भीती वाटत नाही. तो निर्भयतेने लढतोय. कारण त्याची श्रध्दा आहे – ‘भगवान श्रीकृष्ण त्याच्या पाठीशी आहेत’. तो सैनिक आपल्या जवळची जपमाळ त्या वार्ताहर महिलेला दाखवतो आणि सांगतो की ‘अगदी युध्दाच्या धामधुमीतही मी भगवान श्रीकृष्णाचा जप करत असतो. त्यामुळे मला आत्मिक बळ मिळतं.’

हा सैनिक अपवाद नाही. अगदी रशियन सैन्यातही असे जपमाळ घेतलेले सैनिक सापडतील. रशिया आणि त्याच्या प्रभावाखाली असलेल्या अनेक देशांमध्ये ‘इस्कॉन’ चे मोठे काम आहे. हिंदुत्वाकडे आकर्षित झालेल्या लोकांसाठी ‘इस्कॉन’ हे माध्यम ठरत आहे. मध्य पूर्वेत आणि युरोपियन देशांत श्री श्री रविशंकर, माता अमृतानंदमयी वगैरे संतांचे अनुयायी वाढताहेत. अनेक ठिकाणी क्रिश्चन / इस्लामी पूजा पध्दती आणि हिंदू जीवन पध्दती हे त्यांच्या जीवनाचे सूत्र बनत चाललेय. अमेरिका आणि युरोप मध्ये अनेक चर्चेस चे रूपांतर मंदिरांमध्ये होत आहे.

हिंदुत्वाच्या पुनरुत्थानाचा (resurgence) हा प्रतिसाद अक्षरशः जगाच्या कानाकोपर्‍यातून मिळतोय. विशेषतः कोरोंना काळामध्ये ज्या पध्दतीने लोकांनी योग आणि आयुर्वेद यांचा स्वीकार केला, त्यामुळे ह्या हिंदू जीवन पध्दतीकडे, हिंदुत्वाकडे आकर्षित होण्याचा कल हा वाढता आहे. गेल्याच वर्षी इंडोनेशिया मध्ये सुकार्नोपुत्री मेघावती यांनी त्यांच्या २८,००० अनुयायांसह इस्लाम चा त्याग करून हिंदू धर्मात प्रवेश केला होता. त्यापूर्वी, साधारण वर्षभर आधी, जावा प्रांताच्या राजकुमारी ने तिच्या अनुयायांसह हिंदू धर्माचा स्वीकार केला होता. इंडोनेशिया मध्ये अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंची संख्या दरवर्षी वाढते आहे.

जवळपास हीच परिस्थिती घाना सारख्या आफ्रिकन देशातही आहे. सत्तर च्या दशकात स्वामी कृष्णांनंदांनी भारतातून जाऊन हिंदू धर्माचा प्रसार केला होता. आज त्यांच्या जाण्या नंतर ही त्यांचा शिष्य परिवार वाढता आहे. सुमारे चाळीस हजारांच्या वर कडवे आफ्रिकन हिंदू आज घाना मध्ये आहेत. अमेरिका, कॅनडा आणि युरोपियन विद्यापीठांमध्ये ‘भारतीय ज्ञान परंपरा’ (Indian Knowledge System – IKS) चे अनेक पाठ्यक्रम चालू आहेत. हे पाठ्यक्रम नॉन – ग्रेडेड असले तरीही फार मोठ्या संख्येत विद्यार्थी ते निवडताहेत. अनेक विद्यापीठांमध्ये IKS हा परवलीचा शब्द आहे. जगभरात शास्त्रशुध्द पध्दतीने योग शिकवणार्‍या लोकांची मागणी प्रचंड प्रमाणात वाढलीय. अस्सल आयुर्वेदिक औषधांच्या निर्यातीत जबरदस्त वाढ झालीय….

हे सर्व फार सुखद आहे. हे ‘हिंदुत्वाचे वैश्विक पुनरुत्थान’ (Global Hindu Resurgence) आहे. अनेक गोष्टी जुळून आलेल्या आहेत. अनेक गोष्टी जुळून येताहेत. राजकीय पटलावर योगींच्या पुन्हा झालेल्या विजयामुळे हिंदुत्वाचा राजकीय आधार सशक्त झालाय. ‘द कश्मीर फाईल्स’ मुळे हिंदू खडबडून जागा झालाय. जागतिक पातळीवर भारत हा विश्व नेतृत्व करण्याच्या दिशेने दमदार पावलं टाकतोय. आजच्या ह्या वर्षप्रतिपदेला हिंदुत्वाचं हे सुखद चित्र समोर येतंय. संघ संस्थापक डॉक्टर केशवराव बळीरामपंत हेडगेवार यांच्या जयंती च्या दिवशी सार्‍या जगात हिंदुत्वाचा जयघोष दुमदुमतोय. होय, हा हिंदुत्वाचा हुंकार आहे…!-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button