Opinion

इस्लामी अव्यवस्थांचे कठोर टीकाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्मावर केलेले टीकात्मक भाष्य खूप वाढवून सांगितले जाते, त्यामागचा हेतू हा फक्त राजकीय आहे. बाबासाहेबांनी हिंदू धर्मात प्रचलित असलेली जातिव्यवस्था, जातिभेद आणि त्याला जबाबदार असलेल्या घटनांवर टीका केली, अर्थात त्याला मानवी कारणे देखील आहेत. त्यांची टीका हिंदू समाजानेही स्वीकारली. कारण त्या टीकांमागे पवित्र हेतू होता. परंतु बाबासाहेबांच्या खांद्यावर बंदुक ठेवून हिंदू धर्माला लक्ष्य करून नुकसान करण्याचा प्रयत्न करणारे हे विसरतात की, बाबासाहेबांनी केवळ हिंदू धर्मातील दोषांवर टीका केली नाही, तर त्यांनी ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मावर देखील आपल्यातील दोषांसाठी प्रश्नचिन्ह उभे केले आहेत.

१ जुलै १९२७ रोजी ‘बहिष्कृत भारत’ मध्ये लिहिलेल्या ‘दुःखामध्ये सुख’ या लेखात बाबासाहेब लिहितात – “ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र इत्यादी भेद फक्त हिंदू धर्मात आहेत, असे नाही. उलट ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मातही असे भेद उघडपणे दिसून येतात.” बाबासाहेबांनी इस्लामवर तर खूप लेखन केले आहे. परंतु हे लोक जेव्हा बाबासाहेबांच्या इस्लामबद्दलच्या विचारांवर मौन बाळगतात किंवा त्या विचारांवर पांघरूण घालण्याचा अयशस्वी प्रयत्न करतात. तिथेच तथाकथित पुरोगामी बुद्धिजीवी जगाचा आणि इतर काही लोकांचा बौद्धिक धूर्तपणा उघड होतो. आज बाबासाहेब असते तर ‘भीम-मीम’च्या पोकळ, खोट्या आणि भ्रामक घोषणा देणाऱ्यांचा त्यांनी नक्कीच समाचार घेतला असता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा इस्लाम या विषयावर सखोल अभ्यास होता. वास्तविक, जेव्हा त्यांनी हिंदू धर्म सोडण्याची घोषणा केली, त्यानंतर त्यांनी शीख, इस्लाम, ख्रिश्चन आणि बौद्ध धर्माचा खूप अभ्यास केला. जोपर्यंत त्यांनी इस्लामचा अभ्यास केला नव्हता, तोपर्यंत त्यांनी नक्कीच हिंदूंना एक-दोन वेळा इशारा दिला की जर अस्पृश्यांनी इस्लाम स्वीकारला, तर हेच उच्चवर्णीय हिंदू त्यांना स्वीकारू लागतील. १५ मार्च १९२९ च्या ‘बहिष्कृत भारत’च्या अंकात त्यांनी एक लेख लिहिला होता. ज्यामध्ये त्यांनी अस्पृश्य वर्गाला सांगितले की, जर तुम्हाला हिंदू धर्मात राहून सन्मान आणि समान अधिकार मिळत नसेल आणि तुम्हाला धर्म बदलायचाच असेल, तर मुस्लिम बना. पण बाबासाहेब जसजसे इस्लामचा अभ्यास करत गेले तसतसा त्यांचा इस्लामकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. त्यानंतर ते अस्पृश्य बांधवांना समजावून सांगू लागले की, मुस्लिम होऊन आपण भारतीयत्वाच्या कक्षेबाहेर जाऊ, आपल्या राष्ट्रीयत्वावर शंका येईल. सोबतच बाबासाहेबांचा असाही विश्वास होता की “जर त्यांनी इस्लामचा स्वीकार केला तर या देशातील मुस्लिमांची संख्या दुप्पट होईल आणि पुन्हा मुसलमानी प्रभुत्वाचा धोका उत्पन्न होईल.”म्हणजेच बाबासाहेब मुस्लिमांच्या वाढत्या संख्येकडे देशावरील संकट म्हणून पाहत असत. म्हणूनच बाबासाहेबांनी वेळोवेळी केवळ इस्लामवरच टीका केली. उलट अल्पसंख्याकांच्या नावाखाली मुस्लिमांना खूश करण्याच्या सर्व प्रकारच्या प्रयत्नांनाही विरोध केला आहे.

१८ जानेवारी १९२९ रोजी ‘बहिष्कृत भारत’मध्ये ‘नेहरू समितीची योजना आणि हिंदुस्थानचे भविष्य’ या शीर्षकासह त्यांचा एक अग्रलेख प्रकाशित झाला. काँग्रेस नेते मोतीलाल नेहरू यांनी भारताच्या भावी राज्यघटनेचा मसुदा सादर केला. नेहरू समितीचा हा मसुदा किती चांगला आहे, हे काँग्रेसच्या प्रचारयंत्रणेतून ठासून सांगितले जात होते. तर बाबासाहेबांनी या मसुद्यावर चर्चा करून नेहरू समितीची योजना देशासाठी घातक असल्याचे सांगितले होते.

बाबासाहेब लिहितात- “आशियाचा नकाशा पाहिल्यास हा देश कसा दोन वेशींमध्ये अडकला आहे, हे लक्षात येईल. एकीकडे चीन, जपान अशा विविध संस्कृतींच्या देशांचा फास आहे, तर दुसरीकडे तुर्कस्तान, पर्शिया आणि अफगाणिस्तान या तीन मुस्लिम राष्ट्रांचा फास आहे. या दोघांमध्ये अडकलेल्या या देशाने अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे, असे आम्हाला वाटते… या परिस्थितीत चीन आणि जपान यांच्यापैकी कोणीही हल्ला केला तर… सर्वजण एकजुटीने त्यांच्या हल्ल्याला सामोरे जातील. परंतु स्वतंत्र हिंदुस्थानवर तुर्कस्तान, पर्शिया किंवा अफगाणिस्तान या तीन मुस्लिम राष्ट्रांपैकी कोणत्याही एका राष्ट्राने आक्रमण केले, तर सर्व जनता एकजुटीने या हल्ल्याला सामोरे जाईल, याची खात्री कोणी देऊ शकेल काय? आम्ही तरी याची खात्री देऊ शकत नाही.”

मुस्लीम देश भारतावर हल्ला करतील तेव्हा एकजुटीने सामना केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सूचित केले आहे. मुस्लीम राष्ट्रांच्या हल्ल्यांपुढे कोणीही उभे राहणार नाही, हे त्याचे संकेत स्पष्ट होते. बाबासाहेबांची ही भावना झाली असावी कारण भारतातील बहुसंख्य मुस्लिम आजही भारतावर आक्रमण करणाऱ्या आक्रमकांना आपला नायक मानतात. बाबासाहेबांच्या नावाचा उल्लेख न करता हीच गोष्ट लिहिली, तर ते एका ‘हिंदुवादी’ नेत्याचे मत म्हटले जाईल. या लेखाच्या शेवटी बाबासाहेब लिहितात – “आम्ही नेहरू समितीची चौकशी स्वार्थापोटी आंधळेपणाने केलेली नाही. नेहरू समितीच्या योजनेला आमचा विरोध यासाठी नाही की समितीने अस्पृश्यांना तुच्छतेची वागणूक दिली आहे, तर यासाठी आहे की, त्यामुळे हिंदूंना धोका निर्माण झाला आहे आणि हिंदुस्थानात वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे.”

‘पाकिस्तान ऑर पार्टीशन ऑफ इंडिया’ हे बाबासाहेब डॉ.आंबेडकरांचे मुस्लिमांबद्दलचे महत्त्वाचे पुस्तक आहे. या पुस्तकात त्यांनी म्हटले आहे की, “मुस्लिम कधीही मातृभूमीचे भक्त असू शकत नाहीत. हिंदूंशी त्यांची मने कधीही जुळणार नाहीत. देशात राहून शत्रुत्व ठेवण्यापेक्षा त्यांना स्वतंत्र राष्ट्र द्यायला हवे. भारतीय मुस्लिम म्हणतात की ते आधी मुस्लिम आणि नंतर भारतीय. त्यांच्या निष्ठा देशाबाहेर असतात. ते देशाबाहेरील मुस्लिम राष्ट्रांची मदत घेऊन भारतात इस्लामचे वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे. ज्या देशात मुस्लीम राज्यकर्ते नाही, तिथे इस्लामिक कायदा आणि त्या देशाचा कायदा यांच्यात संघर्ष असेल तर इस्लामी कायदाच श्रेष्ठ मानला पाहिजे. देशाच्या कायद्याची पायमल्ली करून इस्लामिक कायद्याचे पालन करणे मुस्लिमांना मान्य आहे. बाबासाहेबांच्या मुस्लिमांबद्दलच्या या विचारांनीच त्यांना नेहमी मुस्लिमांशी राजकीय करार करण्यापासून आणि इस्लामला धर्म म्हणून स्वीकारण्यापासून रोखले होते.

मुस्लीम आक्रमकांनी केवळ ऐश्वर्य लुटण्यासाठी भारतावर हल्ला केला नव्हता, तर त्यामागे एक मानसिकता कार्यरत होती, हे बाबासाहेबांनी या पुस्तकात पुरावे आणि तथ्यांच्या आधारे सिद्ध केले आहे. बाबासाहेब लिहितात की – “मुस्लीम आक्रमक हिंदूंच्या विरोधात द्वेषाचे गाणे गात आले होते. पण द्वेषाचे गाणे गात आणि वाटेत काही मंदिरे पेटवून ते परतले नाहीत. तसे असते तर ते वरदान मानले गेले असते. अशा नकारात्मक परिणामांना ते समाधानी नव्हते. त्यांनी तर भारतात रोप रोवले. या वनस्पतीचा चांगला विकास झाला आणि नंतर त्याचे एका मोठ्या वटवृक्षात रुपांतर झाले.

मुस्लीम समाज इतर समाजात का मिसळत नाही याचे कारण सांगताना बाबासाहेब लिहितात की इस्लाम हे एक क्लोज कॉर्पोरेशन आहे आणि त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते मुस्लिम आणि गैर-मुस्लिम यांच्यात फरक करते. इस्लामचा बंधुभाव हा मानवतेचा वैश्विक बंधुभाव नाही. हा बंधुभाव फक्त मुसलमानांचा मुसलमानांप्रती आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर, इस्लाम खर्‍या मुस्लिमाला भारताला आपली मातृभूमी आणि हिंदूला आपला आत्मीय बंधू मानू देणार नाही. ते लिहितात – “मुसलमानांमध्ये आणखी एक दुर्गुण आहे, जो कॅनन लॉ किंवा जिहाद या नावाने प्रसिद्ध आहे. एका मुस्लिम राज्यकर्त्यासाठी हे आवश्यक आहे की जोपर्यंत इस्लामची सत्ता जगभर पसरत नाही. तोपर्यंत शांत बसायचे नाही. अशा प्रकारे संपूर्ण जग दोन भागात विभागले गेले आहे: दार-उल-इस्लाम (इस्लाम अंतर्गत) आणि दार-उल-हरब. सर्व देश एका श्रेणीत येतात किंवा दुसर्‍या तरी श्रेणीत येतात. तांत्रिकदृष्ट्या हे मुसलमान शासकांचे कर्तव्य आहे की, दार-उल-हरबला दार-उल-इस्लाममध्ये बदलणे. भारतातील मुस्लिम हिजरतमध्ये रस घेतात तर ते जिहादचा भाग बनण्यास देखील मागेपुढे पाहणार नाहीत.”

धर्माच्या आधारावर भारताची फाळणी झाली तेव्हा बाबासाहेबांनी लोकसंख्येच्या संपूर्ण अदलाबदलीची गोष्ट केली. लोकसंख्येची देवाणघेवाण झाली नाही, तर भविष्यात भारतात ‘नव्या पाकिस्तान’ची मागणी निर्माण होईल, हे त्यांच्या अभ्यासाच्या आणि अनुभवाच्या जोरावर त्यांना स्पष्टपणे दिसून आले. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर ‘लडकर लिया है पाकिस्तान, हसकर लेंगे हिंदुस्तान’ असे खुलेआम मुस्लिम नेत्यांनी सांगितले होते, हे सर्वांच्या लक्षात आहेच.

फाळणीच्या वेळी बाबासाहेबांनी लिहिले – “प्रत्येक हिंदूच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला होता की पाकिस्तानच्या निर्मितीनंतर संप्रदायिकतेचा मुद्दा भारतातून दूर होईल की नाही, हा एक वैध प्रश्न होता आणि त्यावर विचार करणे आवश्यक होते. पाकिस्तानच्या निर्मितीने भारताला जातीय प्रश्नातून मुक्त केले नाही, हेही मान्य करावे लागेल. भारताला एकसंध बनवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लोकसंख्येची देवाणघेवाण सुनिश्चित करणे, हे जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत हे मान्य करावे लागेल की पाकिस्तानच्या निर्मितीनंतरही बहुसंख्य विरुद्ध अल्पसंख्याक हा प्रश्न आणि भारताच्या राजकारणातील विसंगती कायम आहे तशीच राहील.” त्यांचे विधान आजच्या भारतात कटू सत्याच्या रूपाने उपस्थित आहे.

वरील विवेचनातून बाबासाहेबांच्या इस्लामविषयीच्या विचारांची कल्पना येते. बाबासाहेबांनी इस्लामचा सखोल अभ्यास करून ते आपले विचार लेखनातून मांडले. बाबासाहेबांनी इतिहासातून त्यांची दृष्टी घेऊन इस्लामी मानसिकतेचे वर्तमान आणि भविष्याचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न केला आहे.एकप्रकारे त्यांनी भारतीय मुसलमानांना आरसाही दाखवला आणि त्यांचा कमकुवतपणा आणि चुकीच्या संकल्पनासुद्धा त्यांच्यासमोर मांडल्या. हिंदू समाजाने तर बाबासाहेबांच्या विचारांचा स्वीकारला आणि त्यांच्या अनेक सुधारणा स्वीकारल्या आहेत, आता मुस्लिम कधी बाबासाहेबांच्या शब्दांचे चिंतन आणि अंमलबजावणी करतात हे पाहायचे आहे.

लोकेंद्र सिंग

Back to top button