Opinion

परंपरा जतनाची आस आणि अभ्यास – RIWATCH

निमित्त होते एका संस्थेला भेट देण्याचे. ही संस्था घरापासून खूप दूर.. अरुणाचल प्रदेशात. संस्थेचे नाव आणि कार्याचे स्वरूप केवळ ऐकलेले. काहीतरी वेगळे आहे, जगातील प्राचीन परंपरा – म्हणजे जगात केवळ काही धर्मांचे (उदा., ख्रिस्ती आणि इस्लाम इ. धर्मांचे) प्राबल्य होण्याआधी जगात वेगवेगळ्या स्थानिक परंपरा, संस्कृती होत्या – अगदी युरोप, अमेरिका, आफ्रिका यासारख्या देशांतही आपण निसर्गाच्या जवळ, निसर्गाशी एकरूप होऊन निसर्गावर कुरघोडी न करता जगत होतो, तेव्हाची ही गोष्ट. त्या वेळी आपण आजच्या व्याख्येत पुढारलेले-प्रगत नसू, पण अधिक आनंदी, अधिक समाधानी, अधिक ‘हेल्दी’ नक्कीच असू. आयुष्याची वर्षे कमी असतील, पण ती निसर्गाच्या आणि आपल्या परंपरांच्या सान्निध्यात असतील, त्यामुळे कदाचित ती अधिक सुखावह असतील का? असा प्रश्न मला पडला, जेव्हा मी अरुणाचल प्रदेश येथील ठखथअढउक या संस्थेला नुकतीच भेट दिली तेव्हा. ठखथअढउक म्हणजे ‘रिसर्च इंस्टिट्यूट फॉर वर्ल्ड्स एन्शिअंट ट्रॅडिशन्स, कल्चर अँड हेरिटेज.’ निमित्त होते या संस्थेतील वाचनालयाच्या आणि स्पर्धा परीक्षा केंद्राच्या तसेच ‘विवेक गॅलरी’च्या उद्घाटनाचे.

रिवाच येथे स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडवणारे वस्तुसंग्रहालय आहे. अनेक प्राचीन दस्तऐवज, तसेच तिबेटी धर्मगुरू वंदनीय दलाई लामा यांनी भेट दिलेली ग्रंथसंपदाही आहे. या वस्तुसंग्रहालयाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यातील सर्व वस्तू लोकांनी भेट दिलेल्या आहेत. ‘पीपल्स म्युझिअम’ म्हणून हे वस्तुसंग्रहालय परिचित आहे. मानववंशशास्त्राचा अभ्यास आणि प्राचीन संस्कृतीचे आणि परपरांचे जतन व्हावे हे तर या संस्थेचे उद्दिष्ट आहेच, त्याचबरोबर ईशान्य भारतातील नवीन पिढीला वाचनाची गोडी लागावी, स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची आणि त्यायोगे शासनात, राज्य सरकारात विविध विभागात सहभागी होण्याची संधी उपलब्ध व्हावी, हाही आहे. पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी संस्था आणि रिवाच यांच्या संयुक्त विद्यमाने हे स्पर्धा परीक्षा केंद्र चालवले जाते. या वर्षी तेरा तरुण-तरुणी अझझडउ परीक्षा या उपक्रमातून उत्तीर्ण झाले आहेत.
 
 
या संस्थेच्या कार्यकारिणीत स्थानिकांचा मोठा सहभाग आहे. नबा म्हणजे वडील. काही वडीलधारे नबा मार्गदर्शक, तर अनेक तरुण-तरुणी आणि अरुणाचल प्रदेश शासन यांचा ह्या संस्थेच्या उभारणीत मोठा हातभार आहे. काही व्यक्तींचा नामोल्लेख जरूर करावा लागेल, तो म्हणजे विजय स्वामी. विजय स्वामी गेली तीस वर्षे अरुणाचल प्रदेशात कार्यरत आहेत. विवेकानंद केंद्र विद्यालयात शिक्षक म्हणून विजय स्वामी अनेक वर्षे होते. त्यांच्या हातून आज अनेक पिढ्या घडल्या आहेत असे म्हटले, तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. पद्मश्री सत्यनारायणमुन्दायुर यांनी 1979 साली सरकारी नोकरीला रामराम केला आणि ते लोहीत, अरुणाचल प्रदेश येथे आले. 1996 सालापर्यंत विवेकानंद केंद्र विद्यालयात ते कार्यमग्न होते. मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून सत्यनारायणजी लहानग्यांना केवळ पुस्तके वाचून दाखवत नाहीत, तर हावभाव करत, नाट्यपूर्णरित्या गोष्टी वाचून दाखवतात. ‘अंकल मोसा’ म्हणून लहान-मोठ्यांचे ते लाडके आहेत. एखादे काम उभे करायचे तर उभे आयुष्य वेचावे लागते, याची प्रचिती या दोघांना भेटून येते. रिवाच या संस्थेच्या संकल्पनेमागील आणखी एक नाव म्हणजे डॉ. यशवंत पाठक. मूळचे नागपूरकर डॉ. पाठक, आता फ्लोरिडा युनिव्हर्सिटी येथे असोसिएट डीन आहेत. फार्मसी (औषधनिर्माण क्षेत्र) विषयात अनेक पुस्तके ज्यांच्या नावावर आहेत असे डॉ. पाठक भारताशी आजही मनाने जवळ आहेत. 1980च्या दशकात रा.स्व. संघाचे प्रचारक म्हणून डॉ. पाठक अनेक वर्षे ईशान्य भारतात सर्वदूर फिरले. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे त्या काळी तिथे नक्षलवाद आणि इतर लोकशाही विरोधी कारवाया यांचा जोर होता आणि दळणवळणास केवळ काही ठिकाणी बस जात असे. बाकी चालत किंवा सायकल, एवढेच. डॉ. पाठक यांचे त्या वेळचे अनुभव ऐकणे म्हणजे कुठलीतरी ‘अ‍ॅडव्हेंचर स्टोरी’ ऐकतो आहोत असे वाटते.

नवीन पिढीपासून जुन्या चालीरिती, पारंपरिक वेश आणि पिढ्यानपिढ्या जतन केलेला निसर्गाचा आयुष्यातील महत्त्वाचा सहभाग सुटत चालला आहे, ही खंत तर सार्वत्रिक. पण तरीही रिवाचसारख्या संस्थेच्या माध्यमातून हा पारंपरिक ठेवा जपण्याचे यथार्थ प्रयत्न होत आहेत. संस्थेतील नव्या उपक्रमांच्या उद्घाटनप्रसंगी पारंपरिक ‘वॉर डान्स’ किंवा स्थानिक जेवणाचा रसास्वाद असो, किती विविधतेने भरलेला हा प्रदेश हेच पदोपदी जाणवत राहते.

मुख्य भारतापासून काहीसा दुरावलेला हा प्रदेश भारताचाच एक महत्त्वाचा भाग आहे, याची अनेकांना आजही जाणीव नाही. रिवाच संस्थेला भेट द्यायला आलेल्या एका उच्चपदस्थ शासकीय अधिकार्‍याच्या सुरक्षा रक्षकाशी गप्पा मारताना त्यांनी मनातील खंत माझ्यापाशी व्यक्त केली, “हम जब गुरगाव मे ट्रेनिंग के लिये था, तब वहा लोग हमको नेपाली, चिंकी बुलाता था. हम माइंड नहीं करता; पर हम नेपाली, चिंकी नही है, हम अरुणाचल का है.” दिसायला आणि काहीसे वागायला-बोलायला आपल्यासारखे नाहीत म्हणून आपल्याच देशवासीयांना असे दूर लोटणे, त्यांच्या दिसण्यावरून हिणवणे आपल्यालाच एक दिवस महागात पडण्याची शक्यता आपल्याला दिसत नाही, यासारखे दुसरे दुर्दैव नाही. सीमेवर टपून बसलेले परदेशाचे सैन्य चढाई करो अथवा न करो, आपणच आपल्या माणसांची मने दुखावणे खचितच उचित नाही. ईशान्य भारतातील सेव्हन सिस्टर्स – सप्तकन्या आणि सिक्किम ही सारी राज्ये आपल्या भारताचा एक महत्त्वाचा आणि सुंदर, विविधतेने नटलेला प्रदेश आहे. निसर्गाने केलेली सौंदर्याची मुक्त उधळण आणि निरागस-प्रेमळ साधी माणसे यांचा अनुभव घेऊन आपले आयुष्य समृद्ध करायचे असेल, तर ईशान्य भारताला भेट देणे क्रमप्राप्तच.

रिवाच संस्थेला आणि संस्थेच्या विविध उपक्रमांना पाठबळ देण्यास एकदातरी रोइंग, अरुणाचल प्रदेश येथे जायला हवेच. शहरात जन्मलेल्या, शहरातच उभे जीवन जगणार्‍या माझ्या शहरी तना-मनाला निसर्गाच्या सान्निध्यात प्राचीन संस्कृती-परंपरांची ओळख करून घेताना मनात एक सल उठत होता. माझ्या पूर्वजांनी माझ्यासाठी काय निर्माण करून ठेवले होते, जे मी जतन केले नाही आणि एका साचेबद्ध, त्याच त्याच रिंगणात वर्षानुवर्षे फिरत राहण्याची सवय करून घेतली. जे आजवर काळाच्या ओघात वाहून गेले ते गेले, जे काही थोडेफार उरले आहे, ते जपू या आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ म्हणत मने जोडू या.
 
 (फॅसिलिटेटर, सर्टिफाइड पॉश अ‍ॅक्ट ट्रेनर)

ॠता पंडित

सौजन्य : सा. विवेक


  

Back to top button