News

शेती विकली, पुण्यात घरकाम केलं, पण पोराला PSI बनवलं, त्या मातेला मानाचा मुजरा!

गंगाखेड तालुक्यातील घटंग्रा येथील मुंजाजी मोते यांच्या घरी अठरा विश्व दारिद्र्य. पण नशिबाला पोरं चांगली. लहान मुलगा अक्षय हा शिक्षणात हुशार असल्याने त्याला अभियांत्रिकी शिक्षणासाठी नाशिक येथे ठेवले होते. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अक्षयने आपल्याला मोठा अधिकारी होण्याची इच्छा आईवडिलांकडे व्यक्त केली. मात्र घरची गरिबी असल्याने असल्याने मुलाच्या शिक्षणासाठी पैसे कुठून आणायचे असा प्रश्न मोते कुटुंबीयांना पडला.

मात्र त्यांनी खचून न जाता मुलाच्या शिक्षणासाठी गावाकडे असलेल्या वडिलोपार्जित जमिनीपैकी एक एकर शेती विकून पुणे येथे वास्तव्यास गेले. अक्षय एमपीएससीची तयारी करत असताना त्यासाठी आवश्यक असणारे पैसे जमत नसल्याने अक्षयच्या आईने पुण्यामध्ये एका घरात घरकाम करण्यास सुरुवात केली. तर वडिल सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते.

यातून मिळणारा पैसा त्यांनी अक्षयच्या शिक्षणासाठी लावला. आई वडील आपल्यासाठी जीवाचे रान करत असल्याचे पाहून अक्षयने दिवस रात्र अभ्यास करून अक्षयने पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. नाशिक येथे नुकतेच प्रशिक्षण पूर्ण करून अक्षयची गडचिरोली येथे नियुक्ती झाली आहे. खूप संघर्षातून दिवस काढत मुलाने दिव्य यशाला गवसनी घातल्यामुळे अक्षयच्या आईचे डोळे अक्षरशः पाणावले होते. त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. पोलीस उपनिरीक्षक पदावर न थांबताच आपल्याला पुढे राजपत्रित अधिकारी होण्याची इच्छा असल्याचे अक्षयने सांगितलं.

Back to top button