बालपणाला स्थूलतेचा अभिशाप ?
बाळसेदार मुले ही सर्वसाधारणपणे कौतुकाचा विषय असतात. मात्र, अलीकडच्या काळात हा बाळसेदारपणा वाढत्या वयानुसार कमी होत नसल्यामुळे तो कौतुकाचा नव्हे तर चिंतेचा विषय ठरत असल्याचा इशारा तज्ज्ञ डॉक्टरांकडून देण्यात येत आहे. भारतात सुमारे एक कोटी ४४ लाख मुलांना लठ्ठपणाचा विकार (पिडियाट्रिक ओबेसिटी) आहे. त्यामुळे मुलांमधील लठ्ठपणाच्या क्रमवारीत भारताचे जगातील स्थान चीनपाठोपाठ दुसरे आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये मुलांचा लठ्ठपणा हा मुलांचे पालक आणि तज्ज्ञ डॉक्टर यांच्या चिंतेचा विषय ठरत आहे. आहारातील जंकफूडचा वाढता समावेश, गोड पदार्थाचा अतिरेक, व्यायाम आणि हालचालींचा अभाव, करोना काळात घरात बंदिस्त राहावे लागणे अशा अनेक कारणांमुळे विशेषत: करोनाकाळ आणि टाळेबंदीनंतर मुलांच्या वजनाचा काटा वर जात आहे.
लहान मुलांमधील लठ्ठपणाची कारणे काय आहेत?
मागील काही वर्षांत कुटुंबाची, पर्यायाने मुलांची बदलेली जीवनशैली हे त्यांच्या लठ्ठपणाचे प्रमुख कारण आहे. पालकांचा बदललेला आर्थिक स्तर, त्यातून संसाधने आणि पर्यायांची उपलब्धता, वाढत्या स्पर्धेमुळे शाळा, शिकवणी या चक्राला बांधली गेलेली मुले खेळ आणि व्यायाम या निकषावर मागे पडत आहेत. पालकांकडून मुलांना वेळ देणे कमी होत आहे. त्याचा परिणाम म्हणून मुलांचे हट्ट पुरवणे, त्यांना बाहेर खायला नेणे या गोष्टींचे प्रमाण वाढले आहे
बालरोगतज्ज्ञांच्या मते,मुलांच्या वाढीच्या वयात शक्यतो त्यांच्यावर आहाराबाबत निर्बंध घालायचे नाहीत असे आहारशास्त्रामध्ये शिकवले जाते. मात्र, लठ्ठ मुलांना त्यांच्या वजनामुळे पुढे जाऊन अनेक त्रास होतात. जीवनशैलीजन्य आजारांच्या धोक्यांचे वयही आता अलीकडे आले आहे. त्यामुळे मुलांसाठी आहार नियोजन करणे हे आवश्यक ठरत आहे. तरी, शक्यतो मुलांना आवडतील अशा स्वरूपात पौष्टिक पदार्थ देण्याचा प्रयत्न केला जातो. मोड आलेली कडधान्ये, प्रथिने, डाळी, मांसाहार यांचे योग्य प्रमाण मुलांच्या पोटात जाईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
लहान वयातील अतिरिक्त वजन हे मोठेपणीही मुलांच्या प्रकृतीसाठी चिंतेचे असल्याने मुलांच्या वजनाच्या काटय़ाकडे लक्ष ठेवण्याची गरज डॉक्टरांकडून अधोरेखित होत आहे.