News

सौगंध राम की खायी थी , हमने मंदिर वही बनाया है.. भाग १

ayodhya ram mandir inauguration ramlala pran pratishtha

(रामजन्मभूमीची संघर्षगाथा उलगडणारी १८ भागांची रोमांचकारी मालिका)

सकल हिंदु समाज ज्या क्षणाची ५०० वर्षांपासून आतुरतेने वाट पाहत होता, तो क्षण आता अगदी समीप आला आहे. मोक्षभूमी अयोध्येत जगत्पालक, भक्तवत्सल, मर्यादापुरुषोत्तम,करुणानिधान श्रीरामाच्या भव्य मंदिराचे उदघाटन होणार आहे आणि आपण या ,“एको अहं, द्वितीयो नास्ति, न भूतो न भविष्यति” अश्या अनुपम क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार होणार आहोत !

मोक्षभूमी अयोध्या…

अयोध्या ही मनुनिर्मित नगरी. हिच्या रचनेचा जेव्हा मानस झाला, तेव्हा आपल्या सर्व कुशलतेचा परिचय देत देवशिल्पी विश्वकर्त्याने या नगरीची रचना केली. स्कंद पुराणात अयोध्येचे वर्णन आहे.अथर्ववेदात अयोध्येला प्रत्यक्ष ईश्वराची नगरी म्हटलेले आहे.

अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका।

पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका ॥

या सप्त मोक्षदायिनी पुण्य नगरी, यात सर्वांत आधी नाव घेतली जाणारी नगरी अयोध्या. भारताची संस्कृती प्राचीन, सनातन. काही हजार वर्षांत ही सभ्यता बहरत गेली, वृद्धिंगत होत गेली. या संस्कृतीला-सभ्यतेला नावलौकिकास आणण्यास, जगत्वंद्य करण्यास, अर्थ देण्यास ज्या अनेक घटकांनी योगदान दिले, त्या घटकांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजेच ही प्राचीन नगरी अयोध्या.

‘अष्टचक्रा नवद्वारा देवानां पूरयोध्या.’ अथर्ववेद म्हणतो की, “या नगरीच्या संपन्नतेची, वैभवाची श्रेष्ठता ही स्वर्गाइतकीच आहे. या नगरीला त्यांनी ‘स्वर्गतुल्य’ म्हटलेले आहे. या नगरीचं नावच तिचं वैशिष्ट्य आहे. तिची ओळख आहे. ‘अ + योध्या’. ‘यौध्य’ म्हणजे ज्याच्याशी युद्ध करू शकतो असा म्हणजे असे की, जो आपला तुल्यबळ आहे. याच अर्थाने अयोध्या म्हणजे जिच्याशी युद्ध करता येणार नाही, अशी नगरी. कौशल राज्याची राजधानी, जिच्या तुल्यबळ कोणीच नाही. जी अजेय आहे, अतुल आहे. हे अक्षरक्षः सार्थ करून दाखविणाऱ्या ज्या नरपुंगवांनी या नगरीचं राजपद भूषवलं, त्या नावांवर जरी दृष्टी टाकली तरी याची प्रचिती येईल.

सुर्यपुत्र ‘वैवस्वतः मनुंनी’ अयोध्या नगरीची निर्मिती केली. ‘सरयू’ म्हणजेच सृजन करणाऱ्या नदीच्या परिसरात… वैवस्वत मनुंचा महान पुत्र इक्ष्वाकु, ज्याने राजधर्माचे, समाजधर्माचे, व्यक्तिधर्माचे आचारण करणारी संहिता त्याच्या राज्यात अमलात आणली. पुढील काळात ‘सूर्यवंश’ म्हणून ओळखले गेलेली महाप्रतापी कुळाचे आद्य ते हेच. याच कुळात पुढे जन्माला आले महाराजा पृथु. असं म्हणतात की, “या धरित्रीला जी ‘पृथ्वी’ ही संज्ञा प्राप्त झाली आहे, ती महाराजा पृथु यांच्यामुळेच. जर याचा वेगळा अर्थ लावायचा झाला, तर असं म्हणता येईल की, सगळी पृथ्वीच पृथु राज्याच्या राज्याचा विस्तार होती. महाराजा गंधात्री, ज्याने शंभर अश्वमेध आणि शंभर राजसूय यज्ञ केले आणि ज्यांचे स्वामित्व जगाने पुन्हा पुन्हा स्वीकार केले. राजा हरिश्चंद्राबद्दल काय सांगावं? दान आणि सत्यनिष्ठता यांचं पर्यायी नावच राजा हरिश्चंद्र आहे. खऱ्या अर्थाने राजयोगी.

देवराज इंद्राच्या आसनाला हादरा देणारा महाराजा सगर हाही याच कुळातला. प्रजेच्या हितासाठी समस्त जीवांच्या कल्याणाकरिता आपल्या तपोबलाने गंगेला स्वर्गातून धरतीवर अवतरित करणारा महातपस्वी भगिरथ राजा. दहा रथींचं बळ ज्या एकट्या वीराकडे आहे, असा महावीर राजा दशरथ. म्हणूनच यात काय आश्चर्य की, अशा या महान कुलामध्ये आणि पुण्यनगरीत प्रत्यक्ष परमेश्वराने प्रभु श्रीरामांच्या रूपाने अवतार धारण केला. एकीकडे ही अशी अयोध्येच्या क्षात्रतेजाची पताका दिगंताला पोहोचली होती. दुसरीकडे अध्यात्म, तत्त्वज्ञान या मूलगामी विचारांच्या धर्मध्वजेची पताका आसमंतात फडकत होती.

जैन पंथाचे पहिले तीर्थंकर आदिनाथ “ऋषभदेव” हे याच इक्ष्वाकु वंशातील महाराजा नभी आणि महाराणी मरुदेवी यांचे पुत्र. यांचा जन्म अयोध्येत झाला. विष्णुपुराणात यांचा उल्लेख आढळतो. ‘ऋषभो मरुदेण्याश्च ऋषभात भरतो भवेत भरताद भारतं वर्ष, भरतात सुमतिस्त्वभूत‘ अर्थात ऋषभदेवांचा जन्म मरुदेवींच्या पोटी झाला. ऋषभदेवांपासून भरत राजा झाला, भरतापासून भारतवर्ष निर्माण झाले. इतकंच नाही तर जैनांच्या २४ तीर्थंकरांपैकी २२ तीर्थंकर हे याच इक्ष्वाकु वंशातील, म्हणजेच अयोध्येशी संबंधित. यातील पाच तीर्थंकरांचा जन्म हा अयोध्येतला. यात ऋषभदेव किंवा ऋषभनाथ यांच्या व्यतिरिक्त अजितनाथ, अभिनंदन नाथ, सुमतिनाथ आणि अनंतनाथ आहेत.

जैनमतासोबतच ज्या तत्त्वाने संपूर्ण जगाला प्रभावित केले, ते बौद्ध तत्त्वज्ञान जगाला सांगणारे भगवान गौतम बुद्ध यांनी दीर्घकाळ अयोध्येत निवास केला. गौतमबुद्धांच्या काळात अयोध्या आणि साकेत अशा दोन्ही नावांचा उल्लेख सापडतो. ही दोन जुळी नगरं असावीत, असं वाटतं. पण, कवी कालिदासांच्या काळात आणि त्यांच्या रचनांमध्येही दोन वेगळ्या नगरांऐवजी एकाच नगराची दोन नावे असावीत, असे जाणवते. बुद्धांच्या निवासासाठी इथे विहारही निर्माण केले होते. पाली भाषेमध्ये ज्या कुळाचा उल्लेख ‘ओकाका’ असा केला आहे, त्याचा संस्कृतमध्ये ‘इक्ष्वाकु’ असा उच्चार होतो.

बुद्धांचा शाक्य वंशही मूळ इक्ष्वाकु वंशाचाच विस्तार आहे किंवा शाखा आहे. याहीपेक्षा भगवान गौतम बुद्धांना अनेक ठिकाणी ‘कोसलक’ म्हणून संबोधित करण्यात आल्याचे आढळते. कोसलक म्हणजे कोसल प्रांतातील असा त्याचा अर्थ होतो. रामायणात ज्या प्रांताचा उल्लेख ‘कोसल’, ‘कौशल’ किंवा ‘कोशल’ म्हणून केलेला आहे, त्या महाजन पदाची राजधानी अयोध्याच होती. इथे सांगावंसं वाटतं की, कौशल म्हणजे कुशल (डज्ञळश्रश्रशव) लोकांचा प्रांत.

सम्राट अशोकाच्या काळात मौर्य साम्राज्यामध्ये अयोध्या एक मोठे व्यापारी केंद्र देखील होते. तेराव्या शतकातील दक्षिण कोरियाचे क्रोनिकल ‘सैमगुक युसा’ यात ‘हिओ व्हांग ओके’ किंवा ‘हु व्हांग ओक’ या पौराणिक राणीचा उल्लेख आहे. कोरियाई द्विपाच्या दक्षिणेला एक ‘गया’ नावाचं राज्य होतं. सुरो हे या गया नावाच्या राज्याचे संस्थापक होते. या सुरो राजाने भारतीय राज्यांमधील अयुता साम्राज्याच्या राजकुमारीशी विवाह केला. हे अयुता नावाचे राज्य म्हणजे मूळ अयोध्या या नावाचे अपभ्रंशित रूप आहे.

या बाबतीत अशी आख्यायिका आहे की, या राणीच्या आई-वडिलांना त्यांच्या स्वप्नात दृष्टांत झाला. त्यांना देवाने अशी आज्ञा केली की, “तुम्ही तुमच्या मुलीला म्हणजेच राजकन्येला ‘सुरो’ राजाकडे पाठवा. त्याच्याशी लग्न लावून द्या. स्वप्नातील दृष्टांताप्रमाणे त्यांनी राजकन्येला सेवकांसहित दक्षिण कोरिया (आजच्या) कडे रवाना केले. जवळजवळ दोन महिन्यांच्या सागरी प्रवासानंतर राजकन्या गया राज्यात पोहोचली आणि नंतरच्या दिवसांत ते दोघे विवाहबद्ध झाले. आज स्वतःला या राणीचे वंशज मानणाऱ्यांची संख्या कोरियामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. नजीकच्या काळात २००१ साली या राणीच्या सन्मानार्थ कोरियाई शिष्टमंडळाने अयोध्येत एक स्मारक उभारले आहे. नुकतेच २०१६ मध्ये या स्मारकाच्या जिर्णोद्धारासाठीसुद्धा प्रस्ताव कोरियातर्फे देण्यात आला होता. ६ नोव्हेंबर, २०१८च्या दीपावली उत्सवात कोरियाची राणी कीम यांनी या जिर्णोद्धाराची कोनशिला बसवली.

इसवी सन १५७४ मध्ये संत तुलसीदास यांनी आपल्या सुप्रसिद्ध ‘रामचरितमानस‘ या ग्रंथाच्या रचनेची सुरुवात अयोध्येत केली. भगवान श्री स्वामीनारायण, ज्यांनी स्वामीनारायण पंथाची स्थापना इसवी सन १८०० मध्ये केली. त्यांचे बालपण अयोध्येतेच गेले. पुढे भगवान स्वामीनारायण यांनी आपली सात वर्षांची यात्रा नीलकंठ या नावाने अयोध्येतूनच सुरू केली.

शीख संप्रदायाचाही अयोध्येशी जवळचा संबंध आहे. रामजन्मभूमी संग्रामात शीख गुरूंचेही योगदान आहे, उज्जैनचा राजा सम्राट विक्रमादित्य याने अयोध्येला भेट दिली होती. त्यांनी काळाच्या ओघात क्षतिग्रस्त झालेल्या या नगरीतल्या अनेक वास्तुंचे, देवालयांचे जीर्णोद्धार केले. हा साधारण इसवी सनाच्या पहिल्या शतकाचा काळ. काही नवीन मंदिरांची निर्मितीदेखील सम्राटाने केली. थोडक्यात सांगायचे तर विक्रमादित्याने अयोध्या पुन्हा वसविण्याचा प्रयत्न केला. इसवी सनाच्या तिसऱ्या चौथ्या शतकात ‘फा हीयान’ या चिनी बौद्ध भिख्खूने आपल्या प्रवासातील नोंदीत अयोध्येचा उल्लेख केलेला आहे.

भारतीय संस्कृतीची ध्वजा तेव्हा दशदिशांना तेजाने तळपत होती. अयोध्येची भूमी ही बृहद्भारतात, म्हणजेच सांस्कृतिक भारतात वंदनीय होती. आजच्या थायलंडमधील ‘अयुत्थ्या’ आणि इंडोनेशियामधील ‘जोगजा/ जोगजकर्ता’या दोन्ही नगरांची नावे ही अयोध्येवरून ठेवण्यात आलेली आहेत आणि आजही तीच आहेत.

इतिहासाच्या आरंभापासून ते आजपर्यंत अयोध्येचा उल्लेख सर्व काळात, सर्व युगात येतो. प्रत्येक स्थित्यंतराची ही नगरी साक्षी आहे. मग ती स्थित्यंतरे राजकीय असोत, सामाजिक असोत वा धार्मिक असोत. अयोध्या प्रत्येक वेळेस प्रासंगिक आहे. संकटे आली , अस्थिरता आली , परचक्र आले पण, या नगरीने आपली ओळख पुसू दिली नाही.

महाभारताच्या सभापर्वात ‘अयोध्या तु धर्मज्ञं दीर्घयज्ञं महाबलम्, अजयत् पांडवश्रेष्ठो नातितीव्रणकर्माणा ।’ असा उल्लेख आहे. ही तीच अयोध्या आहे, जिने इतिहासाचा आरंभ पाहिलाय, जिने पृथुचा पराक्रम पाहिलाय, जिने सत्यव्रती हरिश्चंद्र पाहिलाय, जिने दृढनिश्चयी भगीरथ पाहिलाय.

आपल्या पोटच्या कुमार वयाच्या राजपुत्रांना धर्मरक्षणासाठी महाभयंकर राक्षसांशी युद्धाला पाठवणारा राजा दशरथ पाहिलाय. या अयोध्येनेच रामराज्य पाहिलं आहे. आजही हिंदूतेजाला जागृत करणारी आणि त्यांच्या प्रतापाच्या परिचयाची साक्ष पुढच्या पिढीला सांगत आहे. अयोध्या चिरंतन आहे, अक्षय्यी आहे.

चला तर मग अयोध्येचा पर्यायाने रामजन्मभूमी इतिहास आपण जाणून घेऊया..

क्रमशः

Back to top button