CultureSpecial Day

मुत्सद्दी क्रांतिशौर्य : रंगो बापूजी गुप्ते

भारतीय स्वातंत्र्यासाठी योगदान देणारे क्रांतिकारी चळवळीचे खंद्दे कार्यकर्ते म्हणून रंगो बापूजी गुप्ते अनेकांना ज्ञात आहेत. रंगोजी हे सातारा संस्थानचे छत्रपती प्रतापसिंह भोसले यांचे विश्वसनीय सेवक, मुत्सद्दी आणि वकील म्हणून ओळखले जातात. ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात भाग घेतल्याबद्दल साताऱ्यातील गेंडा माळावर रंगो बापूजी गुप्ते यांच्या मुलासह १८ क्रांतिवीरांना आजच्या दिवशी ८ सप्टेंबर १८५७ साली फाशी देण्यात आली होती.

अठराव्या शतकात रोहिडखोऱ्याच्या दादाजी नरस प्रभू या मावळ्यातील ऐतिहासिक घराण्यात त्यांचा जन्म झाला होता. छ. प्रतापसिंह वासोटा किल्ल्यात बाजीरावाच्या नजरकैदेत असताना त्यांच्या विपन्नावस्थेची हकीकत इंग्रजांपर्यंत पोहोचविणे आणि गव्हर्नर एल्‌फिन्स्टनच्या साहाय्याने त्यांची सुटका करणे इ. कामी इतरांबरोबर रंगो बापूजींनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती.

छत्रपतीं प्रतापसिंह महाराजांचे निष्ठावान सेवक :

छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचे अखेरचे वारस सातारचे राजे छत्रपती प्रतापसिंह १८०८ साली गादीवर आले होते. त्यांना गादीवरून घालवण्यासाठी इंग्रजांनी त्यांच्या विरुद्ध अल्प संतुष्ट लोकांसह कट-कारस्थान करायला सुरुवात केली. त्याच वेळेस “रंगो बापूजी” यांना वडिलोपार्जित वतन वापस मिळवायची धडपड चालू होती. पण त्यांच्या  धन्याचे हाल त्यांना पहावले नाहीत. राजाकडे गोपनीय पत्रव्यवहार पोहोचवणे आणि त्यांच्याकडून कामाची कागदपत्रे विश्वासू माणसांना सोपवणे अशा कामापासून त्यांनी सुरुवात केली.

ईस्ट इंडिया कंपनीला रंगोजी बापूंचा वाटू लागला होता धोका :

रंगो बापूजी प्रतापसिंहांकडे राहिले तर ते कंपनीस धोक्याचे ठरेल, असे वाटून कंपनी सरकारने त्यांना परगणे नासिक येथे अमीन (मामलतदार) म्हणून नेमले होते. होळकर-इंग्रज यांतील मेहिदपू येथे झालेल्या संघर्षात ते कॅप्टन ब्रिग्जबरोबर होते. १८२० साली तो परगण्याचा अमीन होते. जिवापेक्षा अधिक श्रम करून आपण कंपनीची चाकरी केल्याचा त्यांनी निर्वाळा दिला होता. सर्व काही आलबेल चालू असताना १८३१ च्या सुमारास त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची नोकरी सोडली आणि छत्रपतींच्या सेवेतच रूजू झाले होते.

इंग्रजांना दिले त्यांच्याच भाषेत उत्तर :

छत्रपती प्रतापसिंह यांना इंग्रजांनी पदच्युत केल्यानंतर (१८३९) महाराजांची कैफियत कंपनी सरकारपुढे मांडण्यासाठी ते ३० जून १८४० रोजी विलायतेत दाखल झाले. मिलन, कॅप्टन कोगन या इंग्रजांनी त्यांना मुंबईत मदत केली. कॅप्टन कोगन त्यांना दर महिना २,००० रु. पगार देऊन लंडनमध्ये शिष्टाई करण्याचे काम दिले होते. या कामासाठी महाराजांनी एकूण ५० हजार रुपये रंगो बापूजींकडे सुपूर्द केले. महाराजांना न्याय मिळेल याची खात्री न वाटल्याने रंगो बापूजींसह सर्व शिष्टमंडळ मायदेशी परत येण्यास निघाले. पुन्हा एकदा प्रयत्‍न करून पाहू, या उद्देशाने मॉल्टाहून रंगो बापूजी परत लंडनला गेले. प्रतापसिंह यांची संपूर्ण हकीकत मोडी लिपीत त्यांनी छापून काढली होती (१८४३). इंग्रजी भाषेचा नीट अभ्यास करून त्यांनी अनेक पत्रे लिहिली. फेब्रुवारी १८४३ मध्ये त्यांनी कंपनीच्या प्रोप्रायटर्ससमोर भाषण केले. महाराजांच्या मृत्यूनंतरही (१८४७) पुढे ६ वर्षे इंग्लंडात राहून त्यांनी आपली बाजू मांडण्याचा अयशस्वी प्रयत्‍न केला.

इंग्लंडच्या रस्त्या-रस्त्यावर त्यांनी मराठी राजाच्या अन्यायाविरुद्ध फुंकले रणशिंग :

आंग्ल भाषा त्यांनी इंग्रज मित्राकडून शिकून घेतली. इंग्लंडच्या रस्त्या रस्त्यावर त्यांनी मराठी राजाच्या अन्यायाविरुद्ध रणशिंग फुंकले. रस्त्यावर तेथील लोकांना गोळा करून भाषण देऊन आवाज उठवत असत. रंगो बापूजी यांचा धडाडीपणा, चतुरस्त्रपणा बघून तेथील काही ब्रिटिश खासदार आणि अधिकारी मित्र बनले. तिथे इंग्लंडच्या रस्त्या – रस्त्यावर राजाच्या अन्यायाविरुद्ध त्यांनी वाचा फोडली. सतत १४ वर्ष तिथे राहून छत्रपतींची वकिली करत असताना त्यांनी अनेक भाषणे दिली, पुस्तके छापली आणि पत्रव्यवहार केला. त्यांनी संभाषण चातुर्य, लेखन, वक्तृत्व कौशल्य, हुशारीच्या जोरावर इंग्रज अधिकाऱ्यांचे अनेक डावपेच उधळले. ब्रिटिश संसदेमध्ये त्यांनी भाषण दिले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. ब्रिटिश संसद आणि ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनी एकच असल्यामुळे त्यांना काहीही न्याय मिळाला नाही. शेवटी १४ वर्ष वकिली केल्यानंतर ते भारतात परत आले. त्यांनी घरी वापस येऊन घोषणा केली की “इंग्रजांशी कायद्याची भाषा करणारा रंगोबा आता मेला”.

इंग्रज अधिकाऱ्यांना केला वेळोवेळी प्रखर विरोध :

साताऱ्यास परत आल्यावर १८५७ च्या उठावाचा लाभ घेऊन छत्रपतींचे राज्य परत मिळविण्याचा त्यांनी पुन्हा प्रयत्‍न केला. मांग, रामोशी, सरकारी कारकून, घोडदळ यांना आमिषे दाखवून त्यांनी आपल्या कटात सामील करून घेतले. परळी-दरोडा प्रकरणात त्यांनी पुढाकार घेतला होता. सातारा आणि महाबळेश्वर येथील इंग्रज अधिकाऱ्यांना मारणे, खजिना लुटणे इ. उद्योगही त्यांनी केले. पण हा कट त्यांचा फसला होता. परिणामी ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात भाग घेतल्याबद्दल साताऱ्यातील गेंडा माळावर रंगो बापूजी गुप्ते यांच्या मुलासह १८ क्रांतिवीरांना आजच्या दिवशी ८ सप्टेंबर १८५७ साली फाशी देण्यात आली होती.

प्रखर स्वामिनिष्ठा, बुद्धिमत्ता, लेखन आणि वक्तृत्व कौशल्य या गुणांच्या जोरावर ईस्ट इंडिया कंपनी सरकारविरुद्ध जवळपास १३ – १४ वर्षे सनदशीर मार्गाने लढा देणाऱ्या रंगोजींना विनम्र अभिवादन !

Back to top button