News

गोवंश हत्याबंदीमुळे देशात ‘लम्पी’चा प्रसार? — लोकसत्ताचे डोके ठिकाणावर आहे का?

महाराष्ट्रातील प्रथितयश दैनिक लोकसत्ताकडून ही अपेक्षा नव्हती. हिंदुस्थानात गोवंश हत्याबंदीचा उदो उदो कदापि खपवून घेतला जाणार नाही. आपल्या संस्कृतीची, इतिहासाची देखील चाड लोकसत्ताला उरली नाही याचीच खंत वाटते.

  • गाय हा हिंदू /भारतासाठी व अर्थशास्त्र यांचा अनोखा संगम आहे.
  • निरुपयोगी गोवंश कापायला परवानगी घ्यावी हा अत्यंत खतरनाक तर्क आहे. उपयोगी गोवंश पायावर लोखंडी रॉड मारून, डोळे फोडून निरुपयोगी केला जातो. त्यामुळे ‘संपूर्ण गोवंश हत्याबंदीचाच कायदा हवा.
  • या देशात भगवंताचे नाव गोपाल होते. शिवाजी महाराजांची राजमुद्रा देखील गो-ब्राम्हण प्रतिपालक अशीच आहे.

देशात आता तथाकथित बुद्धिमंताकडून (लोकसत्ता) गोवंश हत्याबंदी कशी अन्यायी, आर्थिक दृष्ट्या गोपालकांना कशी खड्ड्यात घालणारी, रोग प्रसार करणारी, भोजन स्वातंत्र्य हिरावून घेणारी आहे आणि यातून शेतकरी तथा सरकारला काहीही लाभ होणार नसून उपयोग नसलेल्या गोवंशाला का म्हणून विनाकारण पोसायचे, असे सवाल आता करत आहेत.

गोमांस हे स्वस्त प्रोटीन मिळण्याचे महत्वाचे साधन आहे, असाही प्रचार केला जात आहे आणि गोवंशहत्याबंदीमुळे गरीबांचा प्रोटीनचा महत्वाचा स्रोत हिरावून घेतल्याचाही प्रचार सुरु आहे.गोवंश हत्याबंदी शासनाने लागू तर केली मात्र केवळ गोवंश जगवणे एवढा एकाच उद्देश ठेऊन या कायद्याचा प्रचार आणि अंमलबजावणी व्हायला नको. तर यातून गोपालकांना आर्थिक लाभ देखील मिळायला हवा.

गोवंशापासून आर्थिक लाभ

गोमुत्र आणि गोमय हे भाकड गोवंशापासून मिळणारे मुख्य पदार्थ होय. आयुर्वेदात गोमुत्राचा कर्करोग आणि रक्तपिती या आजारांवर प्रामुख्याने औषध म्हणून वापर होतो. तसेच पांडुरोग तथा अनेमिया, संधीरोग, क्षयरोग या आजारात देखील गोमुत्र इतर औषधांबरोबर घेतल्याने लाभ होतात.केरळ मधील इद्दुकी जिल्ह्यातील थोडूपुझा येथील आयुर्वेदिक इन्स्टिट्युट धन्वंतरी वैद्यशाला चे प्रमुख सतीश नाम्बुर्दी यांच्या अभ्यासानुसार गोमुत्र हे अल्सर, यकृत दोष आणि अस्थमा या आजारांवर देखील उपयुक्त आहे.

भारतातील निरी या संस्थेने गोमूत्रापासून कर्करोगावर बनवलेल्या औषधाचे पेटंट घेतले आहे.

गोमुत्र हे आरोग्यदायी पेय म्हणून देखील २००९ साली कानपूर गौशाला सोसायटी यांनी बाजारपेठेत आणले होते. यात इतर आयुर्वेदिक औषधींच्या सह गोमुत्राचे ऑरेंज आणि लेमन हे फ्लेवर बाजारात आणले होते. गोमुत्राचा उपयोग साबण, शैम्पू आणि सफाईचे द्राव तयार करण्यासाठी देखील केला जातो.
गोमुत्राचा वापर शेतीसाठी खत म्हणून तसेच कीटकनाशक म्हणून देखील केला जातो. तसेच गोमूत्रापासून वीजनिर्मिती देखील करता येते याचे प्रयोग देखील यशस्वी झाले आहेत.

गोमय अथवा शेणाचा वापर खत म्हणून केला जातो. तसेच यापासून गोबर गैस देखील तयार करता येतो. गोमयाचा वापर अनेक आयुर्वेदिक औषधी आणि भस्म तयार करण्यासाठी देखील केला जातो. गोमय हे उत्कृष्ट रोगाणु रोधक सुद्धा आहे. तसेच गोमय हे उष्णतारोधक देखील आहे.

हे झाले भाकड गोवंशा पासून मिळणारे पदार्थ आणि त्यांचे उपयोग पण यातून आर्थिक लाभ कसा मिळवावा.? यासाठी प्रत्येक गावातील, खेड्यातील अथवा शहरालगतच्या वस्त्यांमध्ये गो-प्रोडक्ट इंडस्ट्रीची उभारणी व्हायला हवी. शासन स्तरावर यासाठी अनुदानाची योजना आणावयास हवी, किंवा बिनव्याजी कर्ज द्यावयास हवे. याची अंमलबजावणी महिला बचत गट आणि पुरुष बचत गट या माध्यमातून व्हायला हवी. प्रत्येक गावात स्थापन झालेल्या उद्योगासाठी एक अथवा गरजेप्रमाणे स्वतंत्र गोशाळा उभारली जावी ज्यात गावातील संपूर्ण गोवंश राहील. यातून गोपालकांचा आर्थिक फायदा न झाल्यासच नवल.!

या उद्योगाचा समाजाला देखील प्रचंड लाभ होईल. जसे की सध्या सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय खाद्य पदार्थ याची मागणी वाढत आहे. रासायनिक खते आणि कीटक नाशकांचे तोटे आपल्याला माहिती आहेतच. तसेच एलोपथिक औषधांचे देखील अनेक दुष्परिणाम होतात. या सर्वावर रामबाण उपाय म्हणून गोमुत्र आणि गोमय उत्पादने यशस्वी होऊ शकतात. तसेच यातून शेतक-यांना स्वस्त खाते, कीटक नाशके उपलब्ध होतील. स्वस्त औषधे उपलब्ध होतील. गावांची विजेची गरज भागली जाईल. गावे स्वयंपूर्ण होतील. आणि मुख्य म्हणजे विनाकारण गोवंश पोसावा लागणार नाही. गोपालाकांच्या हातात दुग्धव्यवसाय व्यतिरिक्त या उद्योगातून देखील पैसा खेळता होईल.

आता गोमांसाचे व गोवंश हत्येचे समर्थन करणारे यांच्यासाठी, गोमांस हे जरी स्वस्त असले तरी गोमांस खाल्ल्याने अनेक प्रकारचे आजार होण्याची मोठी शक्यता असते. गोमांसात अनेक प्रकारची विषारी द्रव्ये असतात, जसे की डायओक्सीन. याचा सरळ सरळ संबंध हा कर्करोग, ऐन्डोमेट्रीओसीस व अटेन्शन डेफ़िसिट डिसऑर्डर आणि प्रजनन क्षमतेवर होतो. गोमांसात अनेक प्रकारचे जीवाणू, कीटक असतात ज्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोका असतो, गोमांसामुळे लठ्ठपणाची समस्या देखील होते.यामुळे गोमांस खाणे अहितकारकच आहे.

सर्वात महत्वाचे हिंदुस्थानात आमच्या धार्मिक प्रतिकांना कोणीही धक्का लावण्याचा प्रयत्न करू नये. हिंदूंची मानसिक,धार्मिक अस्मिता आता जागी झाली आहे,आमच्या अस्मितेला नख लावण्याचा कोणीही प्रयत्न करु नये . गोमाताच भारत राष्ट्राला विश्वगुरू बनवण्यास समर्थ आहे. लोकसत्ताने आपल्या भारतीय संस्कृतीचा,सनातन हिंदू संस्कृतीचा,आपल्या इतिहासाचा अभ्यास करावयास हवा नाहीतर लोकसत्ता देखील इतिहास झाल्यशियाय राहणार नाही.हे निश्चित..

खाली लोकसत्ताच्या अग्रलेखाची लिंक दिलेली आहे:-

https://www.loksatta.com/pune/lumpy-skin-disease-spread-in-india-due-to-ban-on-cattle-slaughter-zws-70-3129412/

Back to top button