NewsRashtra Sevika SamitiRSSSevaकोकण प्रान्त

मुंबईच्या अप्पा पाड्यातील भीषण अग्निकांड आणि संघाचे सेवाकार्य

सेवा है यज्ञकुंड समिधा सम हम जले

मालाड पूर्व येथील अप्पा पाडा (appa pada) येथे १३ मार्च रोजी लागलेल्या भीषण अग्नीकांडात, बेचिराख झालेल्या कुटुंबांना संघाच्या सहकार्याने गृहोपयोगी वस्तूंचे वाटप २६ मार्च रविवारी होणार, असे समजल्यावर या ठिकाणी जाण्याचे ठरले. कार्यक्रमाच्या तासभर आधीच आम्ही पोहोचलो. पण त्याआधी तेथे प्रचंड गर्दी उसळलेली पाहिली. पण स्वयंसेवकांनी न डगमगता या गर्दीवर नियंत्रण मिळवले, आम्हाला आत घेतले. आत अतिशय भव्य असे मंडप बांधण्यात आले होते. स्वयंसेवकांची लगबग सुरू होती. बोलण्यासाठी कुणाकडे वेळ नव्हता. मागील बारा तेरा दिवस स्वयंसेवक मंडळी अहोरात्र या मदतकार्यात झटत होती. स्वयंसेवकांवर शासनाचा आणि पिडीतांचाही विश्वास असल्याचे दिसून येते.संघाच्या सेवा कार्याचा आणि शिस्तीचा केलेला जणू हा सन्मानच होता . संघ आणि सेवाकार्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत , हे एव्हाना भारतीयांना ठाऊक झालेले आहे.

अगदी फाळणीच्या वेळी (भाग मिल्खा भाग या चित्रपटामध्ये हे मदतकार्य आपणास बघायला मिळते) विविध नैसर्गिक आपत्तीच्या वेळी , भूकंप , पूर , कोरोना काळात स्वयंसेवकांनी केलेले मदतकार्य आपल्यासमोर आलेले आहे. काही वर्षांपूर्वी मुंबईच्या दामू नगर अग्नीकांडात तत्परतेने धावून जाणारे स्वयंसेवक आपण बघितले असणारच. म्हणून अशा आपत्तीच्या वेळी शासकीय यंत्रणाही संघाच्या माध्यमातून नियोजनबद्ध पद्धतीने शिस्तीत मदत करण्यास प्राधान्य देऊ लागल्या आहेत. आंध्रप्रदेशातील १९७८/७९ च्या सुमारास आलेल्या प्रचंड चक्रीवादळाच्या विनाशकारी आपत्तीच्या वेळी तेथील एका महानुभावांनी म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला(RSS) रेडी फॉर सेल्फलेस सर्विस R eady for S elfless S ervice(RSS) असे नामकरण केले होते .अप्पा पाडा येथील मदत कार्यात पावलोपावली याची प्रचिती येत होती. या मदत कार्यातील प्रमुख दिंडोशी भाग सेवा प्रमुख शशीभूषणजी शर्मा तथा गोकुळ नगर कार्यवाह दीपेश नाडकर्णी व अन्य स्वयंसेवकांकडून १३ दिवसांच्या या मदतकार्याचा घेतलेला इत्यंभूत आढावा .तसेच २६ मार्च रोजीच्या गृहोपयोगी वस्तू वाटपाच्या कार्यक्रमाचा प्रत्यक्ष घेतलेला अनुभव, आपल्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

मालाड पूर्व येथील तानाजी नगर मधील अप्पा पाडा म्हणून परिचित भागातील आंबेडकर नगर या वस्तीमध्ये , सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास झोपड्यांना आग लागली असल्याची सूचना , त्याच परिसरात राहणारे दिंडोशी भाग शारीरिक शिक्षण प्रमुख सुरेंद्र गावडे यांनी सर्वप्रथम दिली. सिलेंडरचे स्फोट मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे आग वेगाने पसरुन भयावह परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे मदत कार्यात अडथळा निर्माण झाला व जोखीमही वाढली होती. झोपडपट्टीतील अरुंद गल्ल्यांमुळे अग्निशमन दलाच्या गाड्या तेथे पोहोचू शकत नव्हत्या. एका बाजूने त्यांनी आग विझविण्यास प्रारंभ केला तर दुसऱ्या बाजूने झोपड्या नसल्यामुळे आग पसरण्याची थांबली. अकराशे घरं या अग्निकांडात भस्मसात झाली. गरिबांच्या संसाराची राख रांगोळी झाली व होत्याचे नव्हते झाले. तानाजी नगर व क्रांती नगरचे स्वयंसेवक आग विझविण्यासाठी प्रयत्नशील होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी एव्हाना श्री गावडे यांच्या सूचनेनुसार आपली रचना लावण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम बेचिराख झालेल्या कुटुंबांना खाण्याची सोय करणे गरजेचे होते. पवनजी काबरा जे नेहमी या परिसरात भंडारा( लंगर) लावतात, त्यांना अडीच हजार जणांसाठी खिचडी बनवण्यासाठी सांगण्यात आले. सत्संग परीवारानेही जवळपास तेवढीच खिचडी बनवली. वेगवेगळ्या मदत शिबिरात या खिचडीचे वाटप साडेदहा वाजता करण्यात आले. सोबत बिस्कीट, पाणी, ब्रेड, केळी यांचेही वाटप करण्यात आले.

याआधीही जवळपासच्या परिसरातील झोपडपट्टीमध्ये आगीत सत्तर घरांना आग लागली होती. त्यावेळी केलेल्या मदत कार्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी व आयुक्तांशी परिचय झाला होता. रात्री आठ वाजता त्यांच्याशी बोलणे केले, त्यांनी आपल्या सर्व विभागांना आरएसएस बरोबर सहकार्य करण्याचे निर्देश दिले. तसेच एक मुख्य अधिकारी श्री जमादार यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे विशेषत्वाने सांगितले. महानगरपालिकेतच आम्ही आपल्या मदतकार्याचा कक्ष सुरू केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबतच इतर अनेक संस्थाही आपापल्या परीने या मदत कार्यात सहभागी झाल्या होत्या.

१३ मार्चच्या पहिल्या रात्रीची भोजनाची सोय झाल्यावर , रात्री अकरा वाजता आम्ही दिंडोशी भागातील स्वयंसेवकांची बैठक घेतली व पुढील नियोजनासाठी १४ मार्च २०२३ रोजी सकाळी भागाचे सांघिक आंबेडकर नगर, अप्पा पाडा वस्ती जवळच ठेवले. आग मोठ्या प्रमाणात वस्तीत पसरल्यामुळे एकाच ठिकाणी भोजन वितरण करणे सोयीचे नव्हते, त्यामुळे पाच वेगवेगळ्या ठिकाणी भोजनाच्या वितरण स्टॉलची रचना केली गेली. तानाजी नगरच्या पाच शाखा आणि भागातील एक एक नगर यात जोडले.

सत्संग परिवाराशी बोलणे करून त्यांनी रोज नाश्ता आणि दोन वेळचे जेवण बनविण्यास सांगितले आणि भोजनाची व्यवस्था लावण्यात आली. परंतु बाहेरुन जेवण बनवून आणणे आणि वितरीत करणे , यात समस्या येत होत्या. दुसऱ्या दिवशी कार्यकर्त्यांच्या लक्षात आले की, त्याच वस्तीतील एका हनुमान मंदिरात आणि परिसरात भोजन बनण्यासाठी जागा, भोजन सामग्री ठेवण्यासाठी जागा व भोजन वितरणासाठीही मुबलक जागा आहे. सत्संग परिवार आणि आचाऱ्यांशी चर्चा करून तेथेच भोजन बनविण्याचे ठरविले.

कार्यकर्त्यांनी मंदिर व परिसरात साफसफाई केली. भोजन सामग्री ठेवण्यासाठी जागा केली व तेथूनच भोजन तयार करुन वेगवेगळ्या पाच भोजन वितरण स्टॉलवर देण्याची व्यवस्था पुढे कार्यान्वित झाली. दरम्यान दोनदा अचानक आलेल्या पावसामुळे त्रेधातिरपीट झाली सकाळी ५ वाजता सूचना मिळताच स्वयंसेवक धावून गेले तेथे असलेली भोजन सामग्री भिजण्याचा धोका निर्माण झाला होता पण वेळीच स्वयंसेवक पोहोचल्यामुळे अनर्थ टळला. “संघ कार्य हे ईश्वरी कार्य आहे “ याची प्रचिती पदोपदी येत होती.

मदत कार्य सुनियोजित पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रत्येक व्यवस्थेसाठी एक टोळी(टीम) बनवण्यात आली.

१) भोजन वितरण व्यवस्था स्थानिक स्वयंसेवकांसोबत प्रत्येक नगरातील स्वयंसेवकांनी वाटपाचे काम हाती घेतले. यात प्रमुख जबाबदारी किशन राजभर, तुलसीराम यादव ,राजेश पांडेय, सुरेंद्र गावडे आणि सुशील उपाध्याय यांच्या मार्गदर्शनात भोजन वितरण २६ मार्चपर्यंत पार पाडले गेले .

२) कार्यालय व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणाहून येणारी मदतीसाठीची रोख रक्कम व धनादेश तसेच इतर वस्तू ठेवण्यासाठी एकच जागा असावी असे ठरले. त्याकरिता एक टोळी बनवण्यात आली. तिथे लगेच पैसे मिळाल्यावर पावती बनवून देण्यात येत होती.
३) सर्वेक्षण टोळी : गुगल फॉर्मवर माहिती गोळा करून ती एकत्रित करण्यासाठी सत्यम सिंह आणि सहकाऱ्यांची एक टोळी बनवण्यात आली. संपूर्ण वस्तीचे व अग्नीकांडात बेचिराख झालेल्या कुटुंबांचे प्रत्यक्ष वस्तीत जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून शाळेत जाणाऱ्या मुलांची सूची बनवण्यात आली. तसेच मुंबई महानगरपालिका व पोलीस खात्याकडे आलेल्या नावांचाही अकराशे कुटुंबाची यादी बनवताना समावेश करून ख-या अपघातग्रस्तांची यादी बनविण्यात आली.
४) सफाई टोळी एन एस एसच्या NSS टीम बरोबर आपल्या सफाई टोळीने भरपूर वेळा सफाई अभियान चालवले. त्यात मुंबई महानगरपालिकेकडून हातमोजे, झाडू ,मास्क आदी जरूरी सामान पुरविण्यात आले. तसेच फिरते शौचालय मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आले.

५) महिलांची टोळी (टीम) राष्ट्रसेविका समिती च्या सेविकांची एक टीम सीमा अमित गोगटे यांच्या नेतृत्वामध्ये बनविण्यात आली. सेविकांच्या माध्यमातून खालील कामं करण्यात आली .

अ) महिलांना सॅनिटरी पॅड्स आणि अंतर्वस्त्र पुरवठा करण्यात आला .

ब) या घटनेने व्यतीत झालेल्या स्त्रियांशी अनौपचारिक गप्पा मारून त्यांचे मन हलके करण्याचा प्रयत्न केला.

क ) सर्वेक्षणानुसार ज्या गर्भवती स्त्रियांबाबत माहिती मिळाली होती त्यांच्याशी बोलून गरजेनुसार निर्णय घेण्यात आले.

ड ) काही परिवार असेही होते की, ज्यांच्या घरात लग्नकार्य होते व मुलीसाठी केलेले दागिने व कपडे या अग्निकांडात जळून खाक झाले. अशा मुलींच्या सामुदायिक लग्नाचा विचार सुरू आहे.

इ) दिवसा भयंकर ऊन असल्याने मुलांना डिहायड्रेशन होऊ नये म्हणून इलेक्ट्रॉल पावडर देण्यात आली.

६) सुरक्षा टोळी : काही असामाजिक तत्त्वांनी भोजन बनणाऱ्या आचा-यांबरोबर दांडगाई केली. तशी सूचना मिळताच पटकन स्वयंसेवक जागेवर पोहोचले आणि त्यांना तेथून पिटाळून लावले. नंतर तेथील स्थानिक मुलांसह एक टोळी बनविण्यात आली ,जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नयेत.

फ) निधी संकलनाकरता टोळी : या महत्त्वाच्या विषयासाठी नगर संघचालकांची बैठक घेऊन २६/२७ संस्थांची नावं काढण्यात आली . सहा संघचालकांनी निधी जमविण्याची जबाबदारी घेतली आणि पुरेसे धन आजमितीला या मदतकार्यासाठी मिळविण्यात ते यशस्वी झाले.

मदत कार्य करणाऱ्या संस्थांची नावे

१)अपने लोग फाउंडेशन
२)सत्संग परिवार
३) भागवत परिवार
४) राजस्थान सेवा समिती
५) अक्षरधारा फाउंडेशन
६)भारत विकास परिषद

७)लोखंडवाला येथील सोसायटी

८)लोखंडवाला इस्टेट एजंट असोसिएशन
९) बिव्हीपी फिल्मसिटी चॅरिटी ट्रस्ट
१०) समस्त महाजन
११) लायन्स क्लब
१२)रोटरी क्लब
१३)श्री राम लीला प्रचार समिती

१४)रा.स्व. संघ जनकल्याण समिती
१५)मानव सेवा संघ
१६) एकल श्रीहरी
१७)दर्यादिल मुंबईकर महिला ग्रुप
१८) वल्लभ नारी निकेतन
१९) राम लखानी जी
२०)दिलीप वडनाणीजी
२१) रोटरी क्लबचे आणि स्वयंसेवक स्वदेश खेतावत जी
२२)राष्ट्र सेविका समिती
२३)अभाविप
२४) हनुमान सेवा फाऊंडेशन
२५) मुंबई महानगरपालिका
२६) स्थानिक पोलीस
२७) अन्य

अपने लोग फाउंडेशन : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कांदिवली पूर्व द्वारा सेवा कार्य करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या या ट्रस्ट द्वारे अप्पा पाडा, मालाड पूर्व येथील अग्निकांडात उध्वस्त झालेल्या कुटुंबासाठी मदत कार्य करण्यात आले. सर्व स्वयंसेवकांनी याच ट्रस्टमध्ये निधी जमा करण्याचे ठरले ,कारण लगेच निधीचा उपयोग करता येईल. या ट्रस्ट द्वारा अपील करून मेसेज करण्यात आला . खात्याचा क्रमांक आणि क्यू आर (QR )कोड देण्यात आला.त्याला उत्तम प्रतिसाद समाजातील संवेदनशील दानशूरांकडून मिळाला आणि पर्याप्त निधी गोळा होऊ शकला.

मदत सामुग्री : मदत कार्य करताना कोणती वस्तू देणे आवश्यक आहे ,याचा खोलात जाऊन विचार करण्यात आला. आणि चार प्रकारचे किट देण्याचे ठरले. जसे रेशन किट यामध्ये स्वयंपाकासाठी लागणार सगळं साहित्य , स्वयंपाकासाठी लागणारी भांडी , गॅस आणि पूजा साहित्य असे चार भाग केल्यामुळे दान देणाऱ्यांना ते सोपे होईल .त्यासाठी वेगळ्या चार टीमचे आयोजन केले गेले.

रेशन किट (भोजन साहित्य) : राजीव कश्यपजी, शिवकुमार सिंगलजी आणि प्रफुल्ल कुमार श्रीमाळीजी
स्वयंपाकाची भांडी किट : स्वदेश खेतावतजी, आशिष पोद्दारजी आणि देवीलाल जैनजी
गॅस किट : संतोष मौर्यजी
पूजा साहित्य: वीरेंद्र याग्निकजी

प्रत्येक किट मध्ये पुढील प्रमाणे साहित्य होते :-

भोजन साहित्य (रेशन) किट :-
१) १० किलो. तांदूळ
२) १० किलो पीठ
३) २ किलो. डाळ
४) २ किलो साखर
५) १ किलो मीठ
६). १ किलो. खाद्यतेल
७)२०० ग्रॅम. मिरची पावडर
८)२०० ग्रॅम. हळद
९)१०० ग्रॅम चहा पावडर
१०) ५ किलो. कांदे
११). ५ किलो. बटाटे
१२) एक. झाडू
१३) एक. टुथ पेस्ट
१४)चार. टुथ ब्रश
१५) दोन. अंघोळीचा साबण
१६)दोन. कपडे धुण्याचा साबण
१७)एक बादली
१८) एक. मग

स्वयंपाकघरातील भांडी :-
१) ४. स्टीलची ताटं
२) ४. स्टीलच्या प्लेट
३) ४ स्टीलच्या वाट्या
४) ४. स्टीलचे चमचे
५) २. मोठे चमचे
६) ४. ग्लास
७) १. भात शिजवण्यास पातेले
८) १. डाळ शिजवण्यास पातेले
९) १. तवा
१०) १. पक्कड
११) १. लाटणे
१२) १ पलातणे
१३) १. कढई
१४) १. गाळणी

गॅस किट :-
१) १ गॅस सिलेंडर ५ किलो
२)१ गॅस सिलेंडर १४ किलो
३) १ रेग्युलेटर
४) १ गॅस पाईप
५ ) १ गॅस शेगडी

पुजा साहित्य :-
१) १ राम दरबारचा फोटो
२) १ हनुमान चालीसा
३) ५ हनुमान लॉकेट
४) १ अगरबत्ती पुडा
५) १ दिवा
६) १ माचिस

अन्य गृहोपयोगी साहित्य :-
१) चटई
२) चादर
३) बेडशीट
४)झाडू
५) महिलांच्या गरजेच्या वस्तू
६) अन्य सामान

भोजन सामग्री या विषयासाठी डीमार्ट , रिलायन्स आणि मेट्रो कॅश अँड करी यांच्याकडून निविदा ( कोटेशन ) मागविण्यात आली होती. त्यातील मेट्रो कॅश अँड करी यांची निश्चिती झाल्यावर, त्यांच्यासोबत अधिक घासाघिस करुन सूट मिळवून सतराशे पन्नास रुपयात एक भोजन साहित्याचे किट नक्की करण्यात आले. त्यांच्या पेमेंट आणि डिलेव्हरी बाबतही बोलणे झाले. वेगवेगळ्या ट्रस्ट व हौसिंग सोसायटी द्वारा जमा होणारा निधी व त्यानुसार हिशोब करुन त्याप्रमाणे किट बनवून निश्चित वेळी उपलब्ध करुन देण्याचे ठरले.
त्याप्रमाणे तीन जणांची टीम बनवून , त्यांनी वेगवेगळ्या ट्रस्ट आणि हौसिंग सोसायटी मधे बोलून जरुरी कागदपत्र घेऊन मेट्रोची कार्ड बनवली. त्याप्रमाणे पेमेंट करुन बिलिंग करण्यात आले आणि सर्व किट वेळेवर उपलब्ध झाल्या.

स्वयंपाकाची भांडी किट :- देवीलाल जैन जी

देवीलाल जैन आपले स्वयंसेवक आहेत .त्यांचा स्टीलच्या भांड्यांचा कारखाना आहे. मागच्या वेळी देखील त्यांनी रास्त दराने, सर्व वस्तू वेळेवर उपलब्ध करुन दिल्या होत्या . त्यामुळे यावेळी पुन्हा त्यांच्यावरच ही जबाबदारी सोपविण्यात आली. यासाठी निधी मोठ्या प्रमाणात लागणार होता . त्याकरता स्वदेश खेतावतजींना अन्य काही संस्थांबरोबर बोलणे करुन काम पूर्ण करण्यास सांगितले. त्यांनी लगेच होकार दिला आणि सर्व व्यवस्था वेळेत पूर्ण झाल्या.दोन दिवस स्वयंसेवक स्वदेश खेतावतजींच्या गोकुळ नगर येथील कृष्णा बंगल्यात जाऊन भांडी किटच्या १४ वस्तूंचा एक संच याप्रमाणे ११०० संच तयार करत होते. स्वयंसेवकांसोबत स्थानिक तरुणांना ही सोबत घेतले होते.महिला कार्यकर्त्याही सहभागी झाल्या होत्या.ते सर्व तयार झालेले किट टेम्पोमधे भरुन कार्यक्रम स्थळी आणून उतरवून ठेवले.

स्वयंपाकाचा गॅस किट :- संतोष मौर्य जी

संतोष मौर्य जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या क्रांती नगरचे सेवा प्रमुख आहेत. त्यांचा स्वयंपाकाच्या गॅसचा व्यवसाय आहे ,त्यामुळे त्यांच्याकडे ती जबाबदारी देण्यात आली. त्यांनी भारत गॅस आणि हिंदुस्थान पेट्रोलियम गॅसशी बोलून रोजचे जेवण बनविण्यासाठी चार सिलेंडरची व्यवस्था केली . त्याचबरोबर अग्निकांड बाधित कुटुंबांना देण्यासाठी पाच किलोचे सिलेंडर आणि त्याच्या जोडणीसाठी लागणारे साहित्य रास्त दरात उपलब्ध करून दिले.

पूजा साहित्य किट :- विरेंद्र याज्ञिक जी

वीरेंद्र याग्निकजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिंडोशी भागाचे संघचालक आहेत आणि प्रखर वक्ता तसेच प्रवचनकार आहेत . त्यांचे अनेक अनुयायी आहेत. त्यांनी स्वतः पूजा साहित्याच्या किटची जबाबदारी घेतली आणि सर्व साहित्य वेळेवर उपलब्ध करून दिले.

हनुमान मंदिर भोजन शाळा

अप्पा पाडा सायंकाळी पाच वाजता १३ मार्च २०२३ रोजी आगीत भस्मसात झाले आणि त्याच रात्री पाच हजार जणांचे भोजन बनवून आणून वितरण करण्यात आले. पण रोज असे करणे सोयीचे नव्हते . वस्तीतच जागा मिळाल्यास गरम भोजन आणि वेळेवर चहा नाश्ता देण्याची व्यवस्था चोख पार पाडता येणार होती. सत्संग परिवाराच्या या सूचनेनुसार जागा शोधायला सुरुवात केली . वस्तीतच एक हनुमान मंदिर जे या संपूर्ण अग्निकांडात शाबूत होते. मंदिराच्या चहुबाजूंनी वस्ती बेचिराख झाली होती पण मंदिरात विशेष हानी पोहोचली नव्हती. सत्संग परिवाराने १४ मार्चपासून संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आणि येथेच रोजचे नाश्ता व भोजन बनविण्यास सुरुवात केली. जवळजवळ ५००० पिडीतांसाठी येथे दररोज २६ मार्च पर्यंत सकाळी चहा नाश्ता , दुपारचे भोजन संध्याकाळी चहा व बिस्कीट आणि रात्रीचे भोजन असा प्रबंध करायचा होता. सोपे काम नव्हते, परंतु या हनुमान मंदिराचा प्रभाव इतका जबरदस्त होता की कधी कुठल्या वस्तूची कमी पडली नाही . साहित्य कुठून येऊन पडत होते, काही समजत नव्हते. मंदिरात मूर्तीच्या सभोवताली अन्नाचा साठा जमा होत होता. सामान ठेवायला तर जागा पुरत नव्हती. मंदिराच्या दैवी शक्तीचाच परिणाम असावा की मंदिराच्या अंगणातील वृक्ष होरपळून गेले पण मंदिराच्या कापडी ध्वजांना काहीच झाले नव्हते. हा दैवी चमत्कारच होता. शेवटी हनुमंताच्या कृपेने रोज सहा ते सात हजार गरजूंना अन्न मिळत होते. उपाशी झोपण्याची वेळ कोणावर आली नाही.

अन्य काही संस्था आणि मुंबई महानगरपालिका देखील भोजन वितरण करीत होते. परंतु मंदिरात मिळणाऱ्या गरमागरम ताज्या पदार्थांची सर्वांनीच वाहवा केली, ते प्रसादासम होते. सकाळ-संध्याकाळ स्वयंपाक बनवून तयार झाल्यावर सामूहिक आरती करूनच भोजन वितरण करण्यात येत होते . स्थानिक मंडळींकडून याप्रसंगी भगवंतांना भोग लावण्यासाठी ( नैवेद्य दाखविण्यासाठी) बोलविण्यात येत होते. हा एक अनोखा प्रयोग होता त्यामुळे स्थानिक युवकही मोठ्या प्रमाणात सहकार्यासाठी पुढे आले.

गृहोपयोगी वस्तूंचे वाटप

अप्पा पाडा येथे १३ मार्च २०२३ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास आग लागल्याची बातमी स्वयंसेवकांपर्यंत पोहोचताच, संघाची यंत्रणा कामाला लागली. प्रथम त्या रात्रीच्या भोजनाची व्यवस्था करण्याचे ठरले . रात्री भोजन वितरणानंतर बैठक घेऊन पुढील नियोजनासाठी सकाळी दिंडोशी भागाचे सांघिक (सर्व नगरांच्या स्वयंसेवकांचे एकत्रीकरण) घेण्याचे ठरले. सकाळी सांघिकला २०४ स्वयंसेवकांची उपस्थिती होती. पुढील मदतकार्यासाठी रचना लावण्यात आली, त्याप्रमाणे वेगवेगळ्या विषयासाठी चार वेगवेगळ्या टोळ्या (टीम) बनविण्यात आल्या. रोज ६० स्वयंसेवक मदतकार्यात सहभागी होतील ,अशी रचना करण्यात आली होती. राष्ट्र सेविका समितीच्या सेविकांचा रोजच्या मदतकार्यात सहभाग होता.सत्संग परिवाराच्या भोजन यज्ञात हे सर्व स्वयंसेवक व राष्ट्र सेविका कार्यरत होते. २५ सेविका १३ दिवस रोज भोजनासाठी पोळ्या लाटून देत होत्या.

अग्निकांडात सर्वस्व गमावून बसलेल्या पीडित बांधवांना गृहोपयोगी वस्तूंच्या वाटपासाठी २६ मार्च २०२३ रोजी कार्यक्रम घेण्याचे निश्चित करण्यात आले. चार टीम वेगवेगळ्या साहित्याची जमवाजमव करण्यात गुंतल्या होत्या. राष्ट्रसेविका समितीच्या सेविकांनी महिलांची विचारपूस व त्यांना लागणाऱ्या वस्तूंची गरज लक्षात आणून दिली. अप्पापाडा मालाड पूर्व येथील शंकरबुवा साळवी मैदानाच्या शेजारी असलेल्या मोठ्या पटांगणात हा गृहोपयोगी वस्तू वाटपाचा कार्यक्रम करण्याचे निश्चित झाले. २५ मार्च संध्याकाळपासूनच स्वयंसेवक तेथे नियोजनानुसार हजर होते. वाटपासाठी दहा स्टॉल मोठ्या मंडपात लावण्यात आले होते. पिडीत ११०० कुटुंबांना (ज्यांचे सर्वेक्षण पोलीस व मनपा तसेच स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष वस्तीत जाऊन केले होते) आधीच कूपन वितरित करण्यात आले होते . तसेच साहित्य जास्त असल्याने सोबत कुटुंबातील तीन व्यक्ती सामान उचलण्यासाठी घेऊन येण्यास सांगितले होते.

रात्री आलेले सर्व साहित्य स्वयंसेवक ट्रक टेम्पो मधून उचलून आणून वितरण करण्याच्या जागी आणत होते. मेट्रो कॅश अँड करी यांच्याकडून व्यवस्थित पॅक करून घेतलेले शिधा व एकूण चार वेगवेगळ्या प्रकारचे किट एकत्र करुन , एका कुटुंबाचे संपूर्ण गृहोपयोगी साहित्य , असे प्रत्येक स्टॉलच्या मागील बाजूस हे सर्व साहित्य रांगेत लावून ठेवत होते. जवळजवळ १५० पेक्षा जास्त स्वयंसेवक रात्रभर ही व्यवस्था चोख लावण्यात मग्न होते. रात्री अडीच तीन वाजताच पीडित व अन्य काही लोकांनी रांग लावण्याचा प्रयत्न केला. त्यांना सांगावे लागले “हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम आहे. नियोजित पद्धतीने जे खरे पिडीत आहेत , अशा अकराशे कुटुंबांना आधीच कूपन देण्यात आली आहेत. सकाळी दहा वाजता कार्यक्रम सुरू झाल्यावरच सर्वांना साहित्य वाटप होईल. आणि कूपन असणाऱ्यांना गर्दी करण्याची आवश्यकता नाही. कूपन ज्याच्याकडे आहे त्याला साहित्य मिळणारच आहे. आम्हाला आता आमची व्यवस्था लावू द्या , अन्यथा इथे गर्दी वाढेल. कृपया सकाळी या” असे सांगून त्यांना समजावून मैदानावर काढावे लागले.

परंतु तरीही सकाळपासूनच पुन्हा लोकांची गर्दी गेट बाहेर होऊ लागली. यात अन्य क्षेत्रातील व कुपन नसणा-यांची संख्या मोठी होती. रात्रभर साहित्याची ने आण करताना ट्रक मधून ओझी उचलून थकलेले कार्यकर्ते , सकाळी तितक्याच जमाने कार्यरत होते . पण हे काहीतरी विचित्रच होते , मुद्दाम म्हणून कोणी कार्यक्रमात व्यत्यय आणण्यासाठी तर करत नाही ना? अशी शंकेला वाव देणारे . पोलिसांच्या मदतीने त्यांना आवरण्यात आले . कारण त्या मुख्य गेटमधूनच, साहित्य तसेच मान्यवर कार्यक्रमासाठी येत होते , ते बाहेर अडकून पडत होते. गेटवर काय गोंधळ सुरू आहे ,हे आत काम करणाऱ्या स्वयंसेवकांच्या गावीही नव्हते. ते आपली दिलेली व्यवस्था चोख बजावण्यात आणि वेळेत करण्यासाठी मग्न होते.संघाचे जवळपास ३०० स्वयंसेवक त्यात १००च्यावर गणवेशधारी, व्यवस्था पार पाडण्यासाठी झटत होते. राष्ट्रसेविका समितीच्या सेविकाही महिलांच्या गरजेच्या वस्तूंच्या स्टॉल सांभाळण्यासाठी वेळेवर हजर होत्या.
दिंडोशी भाग सेवा विभाग प्रमुख शशीभुषण शर्माजी यांची कार्यक्रम वळेत सुरू करण्यासाठी धावपळ सुरू होती.संघचालक विरेंद्र याग्निकजी , भाग कार्यवाह श्रवण सिंह राठोड जी, रजनी व्यवस्थापन श्री अमित गोगटे ( धर्म जागरण संयोजक), श्री सुनिल मोरे ( वागेश्वरी नगर कार्यवाह), श्री किशन राजभर ( तानाजी नगर कार्यवाह) प्रचारक संदीप नेवे जी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इतर सर्व स्वयंसेवकांसोबत कार्यरत होते. स्वयंसेवकांनी बाहेर गेटवर पोलिसांच्या मदतीने गर्दीवर नियंत्रण मिळवले व गर्दीतील कुपन असणाऱ्यांना आत सावली केलेल्या मंडपात घेण्यास सुरुवात केली .उद्घोषकावरून ( माईक वरुन) सतत सूचना सुरू होत्या.

नियोजनाप्रमाणे सर्वकाही व्यवस्थित पार पडत होते . ज्या वेगवेगळ्या किटसाठी वेगवेगळ्या टिम बनविण्यात आल्या होत्या , त्यांनी त्यांची कामं वेळेत पूर्ण केलेली होती. सर्व सहयोगी व मदत करणाऱ्या संस्थाही त्यांना उपलब्ध करून दिलेल्या स्टॉलवर तयारीत उभे होते. प्रत्येक स्टॉल मागे रांगेत ठेवलेले सामान पुढे स्टॉलवर देण्यासाठी स्वयंसेवक मंडळी तयारीत होती. ठिक दहा वाजता संघचालक विरेंद्र याग्निकजी यांनी दहिसर येथील हनुमान मंदिर जुना आखाडाचे , श्री श्री १००८ काशिदासजी महाराज व त्यांचे सहकारी तसेच सहयोगी संस्थांचे स्वागत केले. काशिदासजी महाराजांनी मंत्रोच्चारात या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलित करुन व भारतमातेचे पूजन करुन सुरुवात केली. सर्व स्वयंसेवक व या मदतकार्यात हिरीरीने भाग घेणाऱ्या सहयोगी संस्थांना आशीर्वाद दिले. संघचालक याग्निक जी व सेवा प्रमुख शशीभूषणजी यांनी सर्व सहयोगी संस्थांचे नाव घेऊन आभार मानले. शंखनाद करण्यात आला आणि बाहेर रांगेत कुपन घेऊन उभे असणा-या कुटुंबांना आत सोडण्यात सुरुवात झाली.

कुपन तपासणी व वर्गवारी करुन नोंदणीसाठी प्रवेशद्वाराजवळच मोठा मंडप घालण्यात आला होता. त्या मंडपामध्ये डॉक्टर हेडगेवार जी, श्री गोळवलकर गुरुजी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसबिरी लावण्यात आल्या होत्या .तसेच अभ्यागतांसाठी ( पाहुण्यांना)बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तिथे आल्यानंतर नोंदणी केल्यावरच साहित्य मिळण्याच्या स्टॉलवर पाठवण्यात येत होते. वारंवार सूचना देऊनी काहीजण एकटेच आले होते किंवा अपंग व वृद्ध असलेल्यांना गृहोपयोगी साहित्य उचलून बाहेर नेण्यासाठी स्वयंसेवक मदत करत होते. सामान भरपूर वजनदार असल्याने किमान तीन किंवा चार जण उचलण्यासाठी आवश्यक होते. साहित्य मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि देणाऱ्यांप्रती असणारा कृतज्ञता भाव ओसंडून वाहत होता. मदत देणाऱ्या सहयोगी संस्थांच्या कार्यकर्त्यांमध्येही आपण योग्य ठिकाणी संघाच्या मदतीने मदत पोहोचवत असल्याचे समाधान झळकत होते.


स्वयंसेवक आणि राष्ट्रसेविका समितीच्या सेविका महिलांना त्यांच्यासाठी गरजेचे असणाऱ्या ( अंतर्वस्त्र , सॅनिटरी पॅड्स , टिकली , बांगड्या वगैरे) वस्तूंच्या स्टॉलवर पाठवत होते . त्यासाठी स्वतंत्र स्टॉल लावण्यात आला होता. अभाविपने शालेय विद्यार्थ्यांसाठी वह्यांचा स्टॉल लावला होता. सुरुवातीला गर्दीवर नियंत्रण ठेवताना दमछाक होत होती. कारण मदत घेणाऱ्यांना आपल्याला मिळाले नाही तर, अशी भीती वाटत असावी. पण जसजसे वाटप सुरू झाले सर्व यंत्रणा नियोजनाप्रमाणे काम करत असल्यामुळे अधिक गतीने काम सुरू झाले .जवळपास एक वाजता आला होता आतापर्यंत ३०० ते ४०० कुटुंबांना वाटप करण्यात आले होते. आता वाटपाची गती वाढली होती तरी सर्व अकराशे कुटुंबांना वाटप होईपर्यंत संध्याकाळचे पाच सहा वाजणार होते. अजूनही ट्रक मधून सामानाचे किट येतच होते प्रत्येक स्टॉल मागे ते स्वयंसेवक उतरवून घेत होते. त्या ठिकाणी पाच किलोचे सिलेंडर आणून ठेवलेले होते, परंतु त्याचे वाटप नंतर करण्यात येणार होते.

मदत घेऊन जाणाऱ्यांमध्ये सर्व जाती-धर्म व प्रांतातील कुटुंब होते. या सर्वांच्या मुखी संघ स्वयंसेवकांबद्दल कृतज्ञता स्पष्ट दिसत होती. अहोरात्र मेहनत करणाऱ्या स्वयंसेवकांमुळे व सहयोगी संस्थांच्या तत्पर मदतीमुळे , अप्पा पाडा येथे लागलेल्या भीषण अग्नीकांडात बेचिराख झालेल्या कुटुंबांना तात्काळ मदत देण्याचा कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी झाला.

संघटन गडे चलो सुपंथ पर बढे चलो , भला हो जिसमें देश का वो काम सब किये चलो !!

Back to top button