News

माऊली ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे निमित्ताने..

dnyaneshwar maharaj sanjivan samadhi २०२३

आज कार्तिक शुद्ध त्रयोदशी, ज्ञानेश्वर माऊलींचा (dnyaneshwar maharaj sanjivan samadhi ) संजीवन सोहळ्याचा दिवस. माऊलींच्या संजीवन सोहळ्याचे वर्णन ऐकताना, ज्याच्या डोळ्याच्या कडा पाणावत नाहीत तो मनुष्यच असू शकत नाही. इतकं अलौकिक कार्य माऊलींनी आपल्यासाठी केलेलं आहे. त्यांचं ते कार्य आपल्याला वानपस्थाश्रमात सुद्धा खूप उपयोगी पडतं. असं माऊलींचं अलौकिक कार्य आहे.या अलौकिक कार्याची आठवण ठेवत, आपण आपलं जीवन जगताना, काहीतरी त्यातला अंश घ्यावा.

माऊलींनी भगवंताकडे पसायदान मागताना विश्वासाठी प्रार्थना केली आहे. ती आपल्यासाठी सुद्धा आहे. आपल्यातील खळांची व्यंकटी सांडण्यासाठी माऊलींनी भगवंताला प्रार्थना केली आहे. याचा विश्वास आपल्या मनामध्ये असला पाहिजे.

या आधुनिक जगामध्ये वावरताना आपल्याला अनेक नाविन्यपूर्ण वैज्ञानिक गोष्टी समजतात, किंवा आपण त्या शिकतो. पण या सर्व गोष्टींची उकल आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये करून दिली आहे. या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने माऊलींनी दिलेली वैज्ञानिक विचारांची शिदोरी सोडण्यासाठीचा काही प्रयत्न करण्याचं धाडस या माध्यमातून करायचा प्रयत्न आहे.

माऊलींनी संजीवन समाधी घेतली त्याचं वर्णन संतांनी आपापल्या अभंगांमध्ये केले आहे. निवृत्तीनाथांची झालेली ती घायाळ अवस्था, सोपान देवांनी केलेला तो मनाचा निग्रह, आणि आपल्या दादासाठी, दादाच्या भेटीसाठी आतुर झालेली मुक्ताई, यांची वर्णन ऐकताना, आपल्याला चारी भावंडांचे अलौकिक नातं समजतं. परमेश्वराने दृष्टांत रूपाने विठ्ठल पंतांना सांगितलेला तो आदेश, तू रुक्मिणीशी लग्न कर तुझ्या पोटी अलौकिक संतती जन्माला येणार आहे. आणि त्याप्रमाणे ही जन्माला आलेली भावंड, सर्व स्तरातील लोकांना प्रेमाचे, कौतुकाचे आणि औत्सुक्याने खूप आनंद देणारे स्त्रोत ठरली. या चारी भावंडांच्या समाध्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. ते चैतंन्य तेज देण्यासाठी.

ज्ञानेश्वरी आजही आपल्या हृदयात वैज्ञानिक विचार साठवण्यासाठी, वैज्ञानिक विचारांची उकल देण्यासाठी, आपल्या समवेत आहे. याचा विचार सर्वांनी करणे आवश्यक आहे.

या विश्वातील साऱ्या विज्ञानाचे मूळ ज्ञानेश्वरीत सापडते. जगातले पहीले शास्त्रज्ञ म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. असा ठाम विश्वास आपल्या मनात असलाच पाहिजे. याचं कारण….

आपण विज्ञान शिकताना शिकलो….

१. सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते.. हा शोध कोपर्निकसने लावला, असं आपण पाठ्यपुस्तकात शिकतो. आपल्याला एक लक्षात घ्यायला हवं, त्यानी काढलेला हा सिद्धांत बायबलविरोधी होता. त्यामुळे त्या समुदायाने त्याला वेडं ठरवलं. कारण बायबलमध्ये पृथ्वी स्थिर असून सूर्य फिरतो असा उल्लेख आहे. आणि यांना आपण विज्ञाननिष्ठ समजतो. हे आपले अज्ञान आहे.

सुर्य स्थिर आहे. आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते, याचा उल्लेख आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये ७२५ वर्षापूर्वी केलेला आहे. सूर्याचे भ्रमण हा भास आहे, हे वैज्ञानिक सत्य मांडले होते.

उदय-अस्ताचे प्रमाणे । जैसे न चालता सूर्याचे चालणे । तैसे नैष्कर्म्यत्व जाणे । कर्मींचि असता ।।

सूर्य चालत नसून चालल्यासारखा दिसतो. सूर्याचे न चालता चालणे हा ज्ञानेश्वरीतील क्रांतीकारक शोध आहे.

२. मानवी जन्माची प्रक्रिया.. या विषयावर ज्ञानेश्वरी मध्ये सांगताना, कसल्याही अधुनिक उपकरणाची मदत न घेता ज्ञानेश्वर महाराज जेंव्हा वर्णन करतात, तेव्हा नामांकित डॉक्टरांनाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही. माऊली लिहितात,

शुक्र-शोणिताचा सांधा । मिळता पाचांचा बांधा । वायुतत्व दशधा । एकचि झाले ।।

शुक्र जंतू पुरुषाच्या वीर्यामध्ये असतात, व शोणित पेशी स्त्रियांच्या बिजांड कोषात असतात. या शोणित पेशी अतिसूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय दिसत नाहीत. या सूक्ष्मदर्शक यंत्राचा शोध चारशे वर्षांतील आहे. परंतु माऊलींनी कसल्याही सूक्ष्मदर्शकाच्या मदती-शिवाय, शोणित पेशींचा उल्लेख केला आहे. इथे त्यांच्यातील सर्वज्ञता दिसून येते.

. पृथ्वी सपाट आहे की गोल.. या प्रश्नावर वैद्यानीक-शास्त्रज्ञांत बराच काळ वाद चालला होता. आणि त्यानंतर, पृथ्वी गोल आहे हा सिद्धांत आता जगन्मान्य झाला. आणि भूगोल विषय शिकवला जाऊ लागला.पण आपल्या माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये पृथ्वी गोल असल्याचे सांगितले.

पृथ्वीये परमाणूंचा उगाणा घ्यावा । तरी हा भूगोलचि काखे सुवावा । तैसा विस्तारू माझा पाहावा । तरी जाणावे माते ।।

भूगोल हा शब्दच ज्ञानेश्वरीने मराठीला दिला आहे. आणि पृथ्वी गोल असल्याचे निःसंदिग्ध सांगताना परमाणूचाही स्पष्ट उल्लेख केलाय.

४. हायड्रोपावर जल विद्युत निर्मिती.. पाण्याच्या घर्षणातून जलविद्युत निर्माण होते. हा विजेचा शोधही शे-दिडशे वर्षांपूर्वीचा आहे.परंतु माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात की, पाण्याचे जोरात घर्षण झाले की वीज तयार होते.

तया उदकाचेनि आवेशे । प्रगटले तेज लखलखीत दिसे । मग तया विजेमाजी असे । सलील कायी ।।

आपण वेगवेगळी वैज्ञानिक पुस्तके वाचतो, अभ्यास करतो. पण ज्ञानेश्वरी फक्त अध्यात्म ग्रंथ म्हणून पहातो. यासाठी डोळस होण्याची गरज आहे.

. पाऊस कसा पडतो.. सागराच्या पाण्याची वाफ होते, वाफेचे ढग बनतात व त्याला थंड हवा लागली की पाऊस पडतो. ही पाऊस पडण्याची प्रक्रिया विज्ञानाने अलिकडे शोधून काढली आहे.परंतु माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात की, सुर्याच्या प्रखर उष्णतेने, (मी ) परमात्माच पाणी शोषून घेतो. त्या वाफेचे ढगात रूपांतर करतो. आणि त्यानंतर इंद्रदेवतेच्या रूपाने पाऊस पाडतो. ती पावसाचे शास्त्रशुद्ध तंत्र सांगणारी ओवी अशी…

मी सूर्याचेनि वेषे । तपे तै हे शोषे । पाठी इंद्र होवोनि वर्षे । मग पुढती भरे ।।

. ब्रंम्हाडगोल, ग्रह, तारे, नक्षत्र.. विज्ञानाला सूर्यमालेतील ग्रहांचा शोध लागला आहे. या विश्वाच्या पोकळीतील फक्त एकच सूर्यमाला मानवी बुद्धीला सापडली. अशा अनेक सूर्यमाला या पोकळीत अस्तित्वात आहेत. विश्वाला अनंत हे विशेषण लावले जाते. या विश्वात अनंत ब्रम्हांडे आहेत म्हणून भगवान अनंतकोटी ब्रहांडनायक ठरतात. परंतु माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये सूर्यमालेतील मंगळ या ग्रहाबद्दल लिहिले आहे. विज्ञानाने शोध लावण्यापूर्वीच माऊली मंगळाचे अस्तित्व सांगतात,

ना तरी भौमा नाम मंगळ । रोहिणीते म्हणती जळ । तैसा सुखप्रवाद बरळ । विषयांचा ।।

जिये मंगळाचिये अंकुरी । सवेचि अमंगळाची पडे पारी ।। ग्रहांमध्ये इंगळ । तयाते म्हणति मंगळ ।।

इतकेच नव्हे, तर नक्षत्रांचेही उल्लेख आहेत. रोहिणीचा वरच्या ओवीत आलाय, तसेच मूळ नक्षत्रः

परी जळो ते मूळ-नक्षत्री जैसे । स्वाती नक्षत्र: |
स्वातीचेनि पाणिये । होती जरी मोतिये । तरी अंगी सुंदराचिये । का शोभति तिये ।।

७. चित्रपट, फोटो.. फोटो, पडद्यावर दिसणारा चित्रपट यांचे मूळही ज्ञानेश्वरीत सापडते..

जेथ हे संसारचित्र उमटे । तो मनरूप पटु फाटे । जैसे सरोवर आटे । मग प्रतिमा नाही ।।

अर्थात संकल्प-विकल्पांमुळे मनाचे चित्र उमटवणारा पडदा फाटून जातो. चित्रपटासाठी पडदा आवश्यक आहेच किंवा सरोवरात पाणी असेल तरच आपली प्रतिमा त्यामध्ये उमटते. ते आटून गेले तर उमटत नाही.

या सर्व ओव्यांचा आशय लक्षात घेतला तर ज्ञानेश्वरीची वैज्ञानिकता ध्यानात येईल. विज्ञानयुगात दिशाभुल झालेल्या, अधुनिकतेला विज्ञान समजणाऱ्या, बाह्यपोषाखावर भुलणाऱ्या युवक-युवतींनी ज्ञानेश्वरीची ही शास्त्रीयता लक्षात घेऊन मानवी जीवनाचे यथार्थ दर्शन घडविण्याऱ्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायला हवा.

एका श्रेष्ठ कुळात जन्माला येऊन सुद्धा, माऊली आणि त्यांच्या भावंडांना अतिशय हीन दर्जेची वागणूक मिळाली. पण त्याही परिस्थितीत त्यांनी कोणावरही राग न धरता परमेश्वराने जे कार्य करण्यासाठी आपल्याला भूलोकावर पाठवला आहे, ते कार्य त्यांनी केलं.

कार्याची उकल करताना आपल्या लक्षात येतं की, सर्वसामान्य माणसांना विज्ञान युगात कसं जगावं, कारण कसा मोक्ष मिळतो हे सगळ्या ग्रंथातून आपल्याला समजतच. पण माऊलींनी कसं जगावं, हे ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं आहे.

आपल्या मनातील खळांची व्यंकटी संपवण्यासाठी, आणि सत्कर्माची आवड वाढवण्यासाठी ज्ञानेश्वरी वाचली आहे. सत्कर्म म्हणजे आपले लौकिक कार्य, तसेच स्वतःसाठी आवश्यक असणाऱ्या, आपल्या कुटुंबासाठी आवश्यक असणारे कर्तव्य कर्म करून, राहिलेला वेळ आपल्याला सत्कर्म करण्यासाठी घालवायचा आहे. म्हणजे आपल्या आवडीचं जे काम आहे, ज्या कामामुळे दुसरा कोणीही माणूस दुखावणार नाहीच, पण ते आपलं काम समाजाला उपयुक्त असेल, तेच सत्कर्म आहे. त्यामध्येच आपली आवड निर्माण व्हावी हीच प्रार्थना आपण सदैव माऊलींच्या चरणी करायला हवी.

सिद्धांत शोधण्यापेक्षा आपल्या संतांनी जे लिहून ठेवलेली जी ग्रंथसंपदा आहे. ती सिद्धांतात घेऊन जाणारी आहे. या सिद्धांतांना शिकण्यासाठी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. संतांनी सांगितले की एक तरी ओवी अनुभवावी.

श्री ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वांनी एक संकल्प करणे की, मी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करीन. त्यातील एक तरी ओवी जगण्याचा प्रयत्न करीन. हाच संकल्प आपल्याला माऊलींपर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रेरक ठरेल. अध्यात्म म्हणजे दुसरं काही नसून कर्तव्य कर्म करताना वैज्ञानिक रूपाने करणं, आणि केलेलं कर्म परमेश्वराला अर्पण करणे म्हणजेच, माणसानं माणसाशी माणसासारखं वागणं, हीच माऊलींची आपल्या हृदयात असणारी खरी आठवण ठरेल…..

जय जय रामकृष्ण हरी..

Back to top button