CultureNewsSpecial Day

धम्म आणि माओवाद..

Buddha Purnima 2024

धम्म आणि माओवाद हा मथळा, वाचुन कुतुहूल वाटणे अगदी साहजिक आहे. धम्म आणि माओवाद या परस्पर विरुद्ध विचारांचा संबंध तरी काय ? हा प्रश्न मनात येणे स्वाभाविक आहे. या गुढ प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला धम्म म्हणजे काय ? माओवाद म्हणजे नक्की काय ? आणि त्या दोघांचा एकमेकांशी कसा संबंध येत आहे. या सर्व बाबींचा विचार करावा लागेल. ह्या शिवाय सत्य परिस्थितीचे योग्य आकलन होणार नाही.

धम्म

भगवान गौतम बुद्धाचा जन्म शाक्य कुळात इ. स. पूर्व ६ व्या शतकात झाला. तो दिवस वैशाख पौर्णिमेचा होता. वयाच्या २९ व्या वर्षी त्यांनी संसाराचा त्याग केला व सत्याचा शोध घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केला. कठोर तपश्चर्येनंतर त्यांना वयाच्या ३५ व्या वर्षी दिव्यज्ञान प्राप्ती झाली. हा दिवसपण वैशाख पौर्णिमेचाच होता. ह्या नंतर तथागताने अविरत समाज प्रबोधनाचे कार्य सुरू केले. अगदी मृत्युच्या वेळेपर्यंत त्यांचे समाज प्रबोधनाचे कार्य सुरूच होते. वैशाख पौर्णिमेच्याच दिवशी, वयाच्या ८० व्या वर्षी, त्यांचे महापरिनिर्वाण झाले.

दिव्य ज्ञान प्राप्तीनंतर तथागताने सर्वप्रथम सारनाथ येथे ‘धम्मा’ संबंधी उपदेश केला सुत्तपिटकातील धम्मचक्रप्रवर्तन सुत्तांत धम्माचा मुलभुत सिद्धांत सापडतो...

१) मानवाच्या जीवनात दुःख आहे.

२) दुःखाचे कारण आसक्ती, वासना आहे.

३) दुःख निवारणाचा मार्ग आहे.

४) अष्टांग मार्गाचे पालन केल्यास दुःख निवारण शक्य आहे.

शारीरिक सुखाच्या मागे लागुन ज्ञान प्राप्ती होत नाही तसेच शरीराला यातना व दुःख देवून आध्यात्मिक प्रगती होत नाही. या दोन्ही टोकांमधुन ज्ञान प्राप्तीचा ‘मध्यम मार्ग’ जातो. मध्यममार्गाने मार्गक्रमण केले तर ज्ञान प्राप्ती निश्चित होते. अष्टांगमार्ग हाच तो मध्यममार्ग आहे.

तथागत धम्मानुयायांना नेहमी सांगत, “दुःख निवारणाचा मार्ग मी तुम्हाला दाखविला आहे. मी फक्त एक मार्गदर्शक आहे.”

महाकारूणिक भगवान बुद्धाने आपल्या शिष्यांना एक बाब सतत सांगितली, “मानवी जीवनातील दुःख व दुःख निवारणाचा मार्ग ही एकच बाब मी तुम्हाला परत परत सांगतो माझ्या बरोबर चला, दुःख निवारणासाठी एक शुद्ध आयुष्य जगा.”

भगवान बुद्धाने आपल्या धम्मानुयायांना स्पष्टपणे उपदेश केला, “कोणतीही बाब मी सांगतो म्हणुन मान्य करु नका. तर्काच्या आधाराने जर ती बाब तुम्हाला पटली तरच तिचा स्विकार करा, जसे बिजातुन फळ व फळातुन बिज निघते तसेच कर्माचे निश्चित फळ व फळातुन कर्म निघते.”

ही अल्पशी माहिती घेतल्यावर हे स्पष्ट होते की, धम्म हा वैज्ञानिक आहे. तो तर्क आणि चिकित्सेवर आधारीत आहे. कुठल्याही अंधश्रद्धांवर आधारीत नाही. धम्म समानतेवर आधारीत आहे. जाती-भेद, स्त्री-पुरुष भेद, श्रीमंत- गरीब भेद, या व इतर सर्व भेदांच्या पलीकडे जावून धम्माने सर्वांनाच समानतेचे वागुणक दिली प्रेम, बंधुभाव व समानता हा तर धम्माचा पायाच आहे. आजपासुन दोन हजार पाचशे वर्षापुर्वी भगवान बुद्धाने ‘धम्म’ जगाला दिला याचा प्रत्येकालाच सार्थ अभिमान वाटतो.

धम्माची तर माहिती घेतली आता मार्क्सवाद-माओवाद या संबंधी थोडी माहिती घेणे आवश्यक आहे.

माओवाद

कार्ल मार्क्सचे सामाजिक-आर्थिक विचार हा कम्युनिस्ट चळवळीचा पाया आहे. मार्क्सवादाला जर वृक्षाची मुळे समजले तर लेनिनवाद, स्टॅलिनवाद,माओवाद या वृक्षाचे फांद्या आहेत. सीपिआय (माओ) संघटना देखील आपला वैचारीक पाया मार्क्सवाद-लेनिनवाद-माओवाद आहे असेच जाहीर करते. माओवाद हे बाह्य आवरण असुन मार्क्सवाद हाच त्याचा खरा गाभा आहे. ही बाब माओवादी मान्य करतात.

माओ त्से तुंगने सांगितलेल्या अति हिंसक मार्गाने राजकिय सत्ता ताब्यात घेणे व नंतर मार्क्सप्रणित समाजरचना निर्माण करणे हे माओवाद्यांचे उद्दीष्ट आहे. “एका माणसाचा खुन करा व दहा हजार लोकांना दहशतीखाली ठेवा” सत्तेचा मार्ग बंदुकीच्या नळीतुन जातो.” “वर्गशत्रुचा समुळ नाश करा” म्हणजेच माओवादी विचार न पटणाऱ्या सर्वानाच मारून टाका. हे आहेत माओत्से तुंगचे विषारी विचार. रक्तपात, कत्तली आणि दहशत यांच्या आधाराने राजकिय सत्ता मिळवून मार्क्सप्रणित समाज निर्माण करणे हा माओवादी संघटनेचा प्रयत्न आहे. माओवादाचा पाया मार्क्सवाद आहे हे आता स्पष्ट झालेच असेल…

लेखक : डॉ. धम्मदिप कांबळे

Back to top button