RSSSeva

संघाच्या नेटवर्कमधून कॅन्सरग्रस्त चिमुकलीला मिळाले जीवनदान

मुंबई – कोरोनाच्या काळात सध्या रक्ताचा सर्वत्र अभाव असल्याची चर्चा आहे. मुंबईतील अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची कमतरता असल्याचे आणि एखाद्या रुग्णाला रक्ताची निकड असल्याचे संदेशही आपल्या वाचनात येत असतात. मोठमोठ्या रुग्णालयांमध्येही जेव्हा सुदूर प्रांतातून येणाऱ्या रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासते तेव्हा रक्तदात्यांचा वा रक्तपेढीचा शोध घेणे त्यांच्याकरिता कठीण होते. अशा वेळी सोशल मीडियाचा आधार घेतला जातो.

टाटा मेमोरिअल रुग्णालयात एका नऊ वर्षीय मुलीला बी पॉझिटिव्ह रक्ताची आवश्यकता आहे, तातडीने संपर्क साधा असा संदेश रा. स्व. संघाच्या भाईंदरच्या पूनम गार्डन शाखेच्या स्वयंसेवकाला आपल्या कॉलेजच्या ग्रूपवर आला. त्याने तो शाखेच्या ग्रूपवर पाठवला. शाखेतील एका स्वयंसेवकाने संदेशात लिहिलेल्या नंबर फोन केला तेव्हा लक्षात आले कि संबंधित व्यक्ती ही आसामची आहे. फोन उचलणाऱ्या व्यक्तीने सांगितले की माझे नाव मुश्कित अंजुम अहमद असून मी बावीस वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थी आहे माझी बहिण नऊ वर्षांची बहीण फरिदा रक्ताच्या कर्करोगाने ग्रस्त आहे. तिचे ऑपरेशन होणार असून त्यासाठी तातडीने बी पॉझिटिव्ह गटाच्या रक्ताची आवश्यकता आहे. आम्ही टाटा रुग्णालयात उपचारांसाठी आलो आहोत.

या संवादानंतर शाखेतील ज्यांचा रक्तगट बी पॉझिटिव्ह आहे अशा स्वयंसेवकाला हा संदेश पाठविण्यात आला व त्याच दिवशी सायंकाळी चार वाजता संबंधित मुलीसाठी त्याने रक्तदान केले. फरिदाच्या भावाने आवर्जून फोन करून स्वयंसेवकाचे आभार मानले.

संघाच्या स्वयंसेवकाला शाखेत “सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया । सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्” या संस्कारक्षम सुभाषिताचे महत्त्व कायम शिकवले जाते. स्वयंसेवक हे सुभाषित केवळ शिकत नाही, तर तो ते आचरणातही आणतो. कोविड संक्रमणाच्या आव्हानात्मक काळात समाजाने त्याचा अनुभव घेतला आहे. रक्तदानाच्या या प्रसंगाने हा सेवाभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

**

Back to top button