CultureNews

भारतीय संगीतातील विज्ञानाचे गूढ उलगडणार

मुंबई, दि. १५ डिसेंबर – गायन, वादन आणि नृत्य या भारतीय संगीतकलांना केवळ सादरीकरण कलांच्या कोशात अडकवून न ठेवता त्यामागील विज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. या कलांमध्ये  दडलेल्या प्राचीन भारतीय विज्ञानाचा परिचय करून देणाऱ्या आभासी व्याख्यान तसेच चर्चासत्राचे आयोजन विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय व विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव २०२० अंतर्गत येत्या २३ ते २५ डिसेंबर या काळात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

भारतीय कलांच्या मागे केवळ रंजन वा साधना हे दोन हेतू नसून त्यामध्ये विज्ञानाचे अनेक पैलू दडलेले आहेत. एखाद्या वाद्य शिकताना वा त्याचा आनंद घेताना आपण त्यातील रचनात्मक पैलूचे महत्त्व लक्षात घेणे आवश्यक आहे. या क्षेत्रातील संशोधनाची आवश्यकता अधोरेखित करणे आणि भारतीय संस्कृतीतील वैज्ञानिकतेचा सर्वसामान्यांना परिचय करून देणे या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संगीतातील सैद्धांतिक पैलू, बासरी विज्ञान, श्रुतीशास्त्र आणि मौखिक संगीतातील त्याचे वैज्ञानिक पैलू, श्रुतीविज्ञान, वैज्ञानिक संशोधन आणि भारतीय संगीत, जलतरंगातील विज्ञान अशा अनेक विषयांवरील चर्चासत्र तसेच व्याख्याने यात होणार आहेत. २० डिसेंबरपर्यंत http://scienceindiafest.org या लिंकच्या माध्यमातून नावनोंदणी करणे आवश्यक आहे. या कार्यक्रमाच्या औचित्याने भारतीय संगीतातील शास्त्रीय पैलू या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  या स्पर्धेचा सनिकाल २५ डिसेंबर रोजी घोषित होणार असून विजेत्यांना रोख रकमांचे बक्षीस आणि सहभागिता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

Back to top button