LiteratureOpinion

पुरस्कार फक्त नंदा खरेंना नव्हता, तर मराठी भाषेलाही होता…!


नंदा खरे हे माझे आवडते लेखक. ते अगदी कट्टर कम्युनिस्ट असले तरीही. होय. नंदा खरे हे ‘कार्ड होल्डर’ कम्युनिस्ट आहेत. पण त्यांची ही ओळख, मला त्यांच्या पुस्तकांचा आस्वाद घेण्याच्या मध्ये कधीही आली नाही. 

त्यांची ‘संप्रती’ ही मी वाचलेली पहिली कादंबरी. ती १९९८ मध्ये ग्रंथाली ने प्रकाशित केली होती. तेव्हापर्यंत नंदा खरेंचं नाव हे ‘अंताजीची बखर’ मुळे प्रसिध्दीच्या झोतात आलं होतंच. मला ‘संप्रती’ ही कादंबरी आवडली. थोडा वेगळा विषय, पण नेहमीच्या ‘कादंबरी पॅटर्न’ मध्येच. सुधाकर हा विदर्भातल्या एका लहानश्या शहरातल्या एका दुकानाचा मालक. पुढे आर्थिक संकटांमुळे त्याला त्याच वाण्याच्या दुकानात काम करावे लागते. मुळात तो शाळेतला स्कॉलर. आपली बुध्दी तो शेअर मार्केट मध्ये चालवतो. त्याच्या यशाचा आलेख उंचावत जातो. त्याची ही कहाणी. 

ही एक कादंबरी अपवाद म्हणून सोडली, तर नंदा खरे यांनी लेखनात नेहमीच वेगवेगळे प्रयोग केले आहेत. त्यांची ‘अंताजीची बखर’ आणि पुढे काही वर्षांनी लिहिलेली ‘अंतकाळाची बखर’, ही दोन्ही पुस्तके ऐतिहासिक कादंबरीच्या एका वेगळ्या स्वरूपाचं दर्शन घडवतात. ऐतिहासिक पृष्ठभूमी असलेली ही आधुनिक बखर आहे. अत्यंत प्रवाही आणि इतिहासाच्या, विशेषतः नागपूरकर भोसल्यांच्या इतिहासाच्या, अज्ञात भागावर प्रकाश टाकणारी बखर. त्यांची ही दोन्ही पुस्तकं फार गाजली. 

‘ज्ञाताच्या कुंपणावरून’ हे १९९० मध्ये प्रकाशित झालेलं त्यांचं पहिलं पुस्तक असावं. नंतर १९९३ मध्ये त्यांचं पुढलं पुस्तक आलं – ‘वीसशे पन्नास’. या दोन्ही पुस्तकांना विदर्भ साहित्य संघाचा, ललित लेखनाचा पुरस्कार मिळाला होता. 


‘नांगरल्याविण भुई’ हे पुस्तक लिहिताना त्यांनी अगदीच वेगळ्या फॉर्म चा प्रयोग केला आहे. इंग्रजीत ज्याला ‘डायस्टोपिया’ (Dystopia) म्हणतात, त्या शैलीत लिहिलेलं हे पुस्तक आहे. नंदा खरे ह्यांना भविष्याचा वेध घेत, लेखनात वेगवेगळे प्रयोग करायला आवडतं. त्यांची अधिकांश पुस्तकं माझ्या संग्रही आहेत.
हे झालं त्यांचं एक रूप. 

मात्र सुरूवातीला, ‘संप्रती’ सारखी सकारात्मक शैलीतील कादंबरी लिहिणारे नंदा खरे, पुढे जाऊन अत्यंत नकारात्मक लिहू लागले, बोलू लागले. त्यांची ‘उद्या’ ही कादंबरी मी वाचलेली नाही. परंतु त्यांनी कोरोना काळात ‘साधना’ मासिकाच्या एका कार्यक्रमात जे काही वक्तव्य केले, ते वाचून नक्कीच चिंता वाटली. 
साधना प्रकाशनाच्या ‘ऐकता दाट’ मध्ये नंदा खरे जे बोलले, ते एखाद्या कट्टर कम्युनिस्ट कार्यकर्त्याच्या भाषेत बोलले. गंमत म्हणजे त्यांचा एकूण सूर हा बरखा दत्त, राजदीप सरदेसाई, अरुंधती रॉय, सागरिका घोष इ. मंडळींनी, कोरोना काळाच्या सुरूवातीला, भारताच्या भविष्याबद्दल जे लिहिले / बोलले होते, त्या सारखाच होता. बरखा दत्त ने, २५ मार्च, २०२० ला लॉकडाउन लागल्यानंतर, २६ मार्च ला Washington Post मध्ये जो लेख लिहिला, त्याचं शीर्षक होतं – As India goes into lockdown, fear spread. Poverty may kill us first. 

आणि साधनाच्या कार्यक्रमात नंदा खरे म्हणतात, “आपल्याला कल्पनासुद्धा करवत नाही इतकी विषमता वाढलेली आहे. कोविडची साथ अन टाळेबंदी सुरु झाल्यानंतर आत्महत्यांचे प्रकार वाढलेले आहेत. खरं तर, करोनानी जेवढी माणसं मरतायेत जवळजवळ तेवढीच माणसं काोरोनाच्या उप परिणामांनी मरत असतील अशी शक्यता आहे. कुणी तरी याचा अभ्यास केला पाहिजे. मला कल्पना आहे, आपल्याकडे माहिती मिळवणं आणि त्यातसुद्धा अंकबद्ध माहिती मिळवणं खूप कठीण आहे. कारण सगळे लोक खोटं बोलतात, सरकारही खोटं बोलतात. सर्व कंपन्या खोटं बोलतात. त्यातून तुम्हाला खरं काय आहे ते शोधावं लागतं. खूप लोकं डिप्रेशन खिन्नतेचे विकारी वाढत आहेत. मी स्वत जवळ जवळ त्या पातळीवरती अनेक वर्षं आहे. उपाशी माणसं लाखो माणस एका ठिकाणाहून  आपल्या घराकडे जायला आसुसली आहेत. याच्याकडे आपलं लक्ष जातंय का? अजिबात नाही.”

मी कोरोना काळात, वेगवेगळ्या संस्थांनी केलेल्या सेवाकार्यावरच्या एका पुस्तकावर काम करतोय. पूर्ण देशभरातून अनुभव गोळा होताहेत. आणि हे सर्व थक्क करणारे आहेत. जबरदस्त आहेत. आपला हा भारत देश, कोट्यावधी बाहुंचा, जिवंत राष्ट्रपुरुष आहे, याचा सतत प्रत्यय येणारे अनुभव आहेत. लाखो श्रमिकांना, कोट्यावधि देशबांधवांना सावरणारे हात, या समाजातूनच समोर आले. आणि त्यांनी अक्षरशः चमत्कार घडवलेला आहे. आपल्या देशानं, ह्या कोरोना रूपी संकटाचं संधीत रूपांतर केलंय. ह्या एका वर्षात भारत खूप बदललाय, ज्याचे अत्यंत सकारात्मक दूरगामी परिणाम आहेत. आणि महत्वाचं म्हणजे, ह्या ‘कोरोना काळात, भारताची दैना उडेल, अर्थव्यवस्था मातीमोल होईल..’ असं म्हणणारे बरखा दत्त, राजदीप सरदेसाई, अरुंधती रॉय सारखे ‘सेलिब्रिटी’ चक्क तोंडघशी पडले आहेत..!

या पार्श्वभूमीवर, नंदा खरेंनी साहित्य अकादमी सारखा मानाचा पुरस्कार नाकारणं हे मनाला पटत नाही. नंदा खरे सारख्या साहित्यिकाने, कम्युनिझम च्या चष्म्यातून या सर्व गोष्टींकडे पाहू नाही असं प्रकर्षानं वाटतं. त्यांना पुरस्कार मिळणं हा फक्त त्यांच्या पूर्ति मर्यादित विषय नाही. तो मराठीला मिळालेला पुरस्कार आहे. त्यामुळे नंदा खरेंनी तो पुरस्कार नाकारून योग्य केलं नाही.  जाता जाता : ‘नंदा खरे’ ही व्यक्ति पुरुष आहे, हे तुमच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कुणीतरी सांगा हो. कबूल, साहित्याशी त्यांचा तसा फारसा संबंध नाही. पण मराठीला मिळालेल्या साहित्य अकादमीच्या पुरस्काराचा मानकरी हा पुरुष की स्त्री, हे तरी किमान त्यांना माहीत असावं, अशी अपेक्षा होती..

–  प्रशांत पोळ

Back to top button