OpinionSeva

‘कोविड १९’ विरुद्धच्या लढाईत सेवाभावी संस्था अग्रेसर

‘कोरोना’च्या महाभयंकर साथीमुळे २०२० मध्ये संपूर्ण जग ठप्प झाले. कोट्यवधी अधिक लोक या प्रादुर्भावात अडकले. तर असंख्य लोकांचा जीव गेला. यावर्षीही परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना संसर्गाने तर उच्चांकाची परिसीमा गाठली. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्वच पातळीवर प्रयत्न होत असतानाच दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित २० सेवाभावी संस्था कोरोनाचा प्रसार थोपविण्यासाठी आणि संक्रमितांना आधार देण्यासाठी सरसावल्या आहेत. या मदतीसाठी हेल्पलाईन (022-41667466) ही तयार करण्यात आली आहे.

रा. स्व. संघ जनकल्याण समिती, केशवसृष्टी माय ग्रीन सोसायटी, सेवा सहयोग, सेवांकुर, निरामय सेवा संस्था, आरोग्य भारती, समिधा, हेल्थ काॅन्सेप्ट, राष्ट्रीय सेवा समिती, चिंगारी सेवा फाऊंडेशन, नॅशनल मेडिकल ऑर्गनायझेशन, समस्त महाजन अशा विविध संस्थांचा या कोविड विरुद्धच्या अभियानात समावेश आहे. या अभियानाअंतर्गत अनेक उपक्रम राबवले जात आहेत. त्यानुसार प्लाझ्मा दाते आणि स्वीकारणारे यांची सूची तयार करण्यात येत आहे. आतापर्यंत १ हजार ते १५०० प्लाझ्मा दात्यांची सूची तयार आहे. सेवांकुर संस्थेच्या माध्यमातून हे कार्य करण्यात येत आहे. जास्तीत जास्त लोकांनी प्लाझ्मा दान करावे, म्हणून समाज जागृतीचे कामही सेवांकुर संस्थेच्या माध्यमातून युद्धपातळीवर सुरु आहे.
कोरोनाबाधित रुग्णांना आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे, हे ध्यानात घेऊन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, गृह विलगीकरणातील रुग्णांना बेड, आणि व्हीलचेअरची सोयही केली जात आहे. सेवा वस्त्यांपर्यंत ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर पोहोचवण्याचे आव्हान सध्या संस्थांपुढे आहे. पण त्यावरही यशस्वी मात करण्याचा या सेवाभावी संस्थांचा प्रयत्न सुरु आहे. कोरोनाशी लढणाऱ्या कुटुंबांचे मनोबल खच्ची होण्याची शक्यता असते. ते मानसिक तणावाखाली असतात. त्यांचा मानसिक ताण कमी व्हावा म्हणून त्यांच्यासाठी समुपदेशनाची व्यवस्थाही केली जात आहे. याचबरोबर होमिओपॅथी, ऍलोपथी आणि आयुर्वेदिक औषधांसंबंधी मार्गदर्शन सुविधाही तज्ज्ञांच्या माध्यमातून उपलब्ध केल्या जात आहेत. अशा विविध प्रकारची मदत या सेवाप्रकल्पात केली जात आहे. आयुर्वेदिक औषधांसंबंधी ‘आरोग्य भारती’ या सेवाभावी संस्थेतील तज्ज्ञांच्या माध्यमातून मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच ऍलोपथी औषधांसंबंधी ‘नॅशनल मेडिकल ऑर्गनायझेशन’ या संस्थेतील तज्ज्ञांच्या माध्यमातून मार्गदर्शन सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ‘ समतोल सेवा फौंडेशन’कडून तांत्रिक कार्यात मोठ्या प्रमाणात मदत केली जात आहे. आर्थिक, तांत्रिक, अशा महत्वपूर्ण बाबींमध्ये मोलाची कामगिरी बजावणाऱ्या या सेवाभावी संस्था एकत्रितपणे कोरोनामुळे त्रस्त असलेल्या रुग्ण व रुग्णांच्या कुटुंबियांसाठी झटत आहेत.

कोरोना संक्रमणामुळे संपूर्ण कुटुंबच होम क्वारंटाईन होण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. अशा कुटुंबांसाठी वा एकट्याच राहणाऱ्या व्यक्तीसाठी १४ दिवस वा आवश्यकतेनुसार दोन वेळचे निःशुल्क टिफिन सेवा मीरारोड ते भाईंदर , दहिसर ते बोरिवली ते कांदिवली आणि मालाड, गोरेगाव या दरम्यान सेवा सुरु करण्यात आली आहे. माय ग्रीन सोसायटी, समस्त महाजन, रा. स्व. संघ जनकल्याण समिती, चिंगारी फाऊंडेशन, श्री भागवत परिवार, मेकिंग द डिफरन्स यांच्या एकत्रीकरणातून हे कार्य सुरळीतपणे सुरु आहे. निःशुल्क टिफिन सेवेसाठी ९७६९५५९८८९, ९८१९८६८५७५ किंवा ८५९१३३६५८९ हे व्हाट्सएप नंबर सुरु करण्यात आले असून या उपक्रमाला लोकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दिवसभरात जवळपास ४०० कुटुंबियांना ही टिफिन सेवा पुरवली जात आहे. पूर्णपणे सात्विक भोजनाचा यामध्ये समावेश असतो. हळूहळू संपूर्ण मुंबईत ही सेवा पुरवली जाणार असून, तसे प्रयत्नही सुरु आहेत. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व कोरोना नियमावलीचे पालन करून हे कार्य सुरु आहे. वैद्यकीय मदत असो, अन्नविषयक हेल्पलाईन असो, की सामुदायिक स्वयंपाकघराचे(कम्युनिटी किचन) व्यापक नेटवर्क तयार करणे असो. प्रत्येक स्तरावर गरजूंना मदत करण्यासाठी या सेवाभावी संस्था सर्व सुविधांचा पूर्ण क्षमतेने वापर करीत आहेत.
आपल्या देशात ही सेवाभावना काही नवी नाही. मात्र, यावेळचे जे सेवा कार्य आहे, ते सर्वसामान्य कार्य नाही. इथे फक्त दुःखी लोकांचे अश्रू पुसणे, कोणा गरिबाला खायला अन्न देणे एवढेच काम सीमित नव्हते. तर यावेळच्या सेवाकार्यात कोरोनासारख्या आजाराशी थेट संपर्क येण्याची, संसर्ग होण्याची भीती होती. पण या भीतीवर मात करीत या सेवाभावी संस्था कोरोनाच्या संकटकाळात सेवाकार्य करीत आहेत ही काही सर्वसामान्य बाब नाही. एक भय, संकट समोर असतानाही ते आपले कार्य पूर्णत्वास नेत आहेत. त्यांचे हे कार्य नक्कीच कौतुकास्पद, प्रेरणादायी आणि अनुकरणीय असे आहे.

संत कबीर दास यांनी म्हटले आहे-

सेवक फल मांगे नहीं, सेब करे दिन रात

सेवा करणारा, त्याच्या फळाची अपेक्षा करत नाही, अहोरात्र निःस्वार्थ भावनेने सेवा करतो. दुसऱ्याची निःस्वार्थ भावनेने सेवा करण्याचे या सेवाभावी संस्थांचे जे संस्कार आहेत ते या कठीण काळात उपयोगी ठरत आहेत.आणि यापुढेही ठरतील.
**

Back to top button