CultureNews

लोककलेचा वारसा जपणारे निरंजन भाकरे यांचे निधन

मुंबई, दि. २४ एप्रिल : लोककलेचा वारसा जपणारे आंतरराष्ट्रीय किर्तीचे भारूडकार  निरंजन भाकरे यांचे कोरोनाने निधन झाले आहे.  त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.

शिवरंजनीने 2018 साली संगीत सेवा सन्मानाने निरंजन भाकरे यांना  गौरविले होते. संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या भारूडामधुन समाज प्रबोधन करणाऱ्या निरंजन भाकरे यांनी भारूड सातासमुद्रापार पोहोचवले. अमेरिका, मलेशिया, थायलंडमध्ये त्यांचे कार्यक्रम देखील झाले आहेत. तसेच गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्येही त्यांची नोंद झाली आहे. 

निरंजन भाकरे यांना कलेचा वारसा हा कुटुंबातूनच मिळाला. त्यांचे वडील जुने नाटकर्मी होते. त्यांनी आतापर्यंत अनेक नाटकात काम केले  आहे. निरंजन भाकरे लहानपणी ग्रामीण भागात नाटकात भूमिका करत. तसेच कलापथकात हार्मोनियम देखील  वाजवत. अशोक परांजपे यांची मुलाखत वाचून निरंजन भारावले आणि त्यांच्या भेटीनंतर तर त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदलले असे  त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.  भारूडाने मला गारूड घातले ते आयुष्यभरासाठीच, असे ते म्हणत.

भारूडाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करताना ज्या गावात त्यांचा भारूडाचा कार्यक्रम असेल त्या दिवशी जर त्या गावात एखादी मुलगी जन्मली असेल तर स्वतःच्या वतीने त्या मुलीच्या भविष्यासाठी ते रू. 5000/- भेट देत असत. एक माणूसपण जपलेले ते सच्चे कलाकार होते.

Back to top button