OpinionSeva

‘भारत एड’ च्या मदतीने एकत्रितपणे लढा देऊ कोरोनाशी

 देश कोरोना आपत्तीशी झुंजत आहे.  हा समाज आपला आहे, त्यांची  सुखदुःख ही आपली आहेत. या भावनेतून काम करण्यासाठी  समाजातील अनेक  सज्जन शक्ती एकत्रित आल्या. काही वैयक्तिकरित्या कामे करीत आहेत.  तर काही संघटित होऊन कार्य करीत आहेत. यातूनच होत असलेल्या अनेक छोट्या-मोठ्या सेवा कार्यातून जास्तीत जास्त लोकांना या कठीण प्रसंगी मदत करावी आणि त्यांचा जीव वाचवावा, त्यांचे मनोबल वाढवावे हे एकमेव लक्ष्य.

कोरोनाचे हे संकट कोणा एकावरचे नाही, कुठे ना कुठे, कोणी ना कोणी या संकटाला सामोरे जात आहे. रोज नव्याने लोकं या संकटात होरपळत आहेत. कित्येकांना आपला जीव गमवावा लागत आहे. आपल्या सगळ्यांना या संकटाविरोधात  एकत्र मिळून लढा द्यायचा आहे. आपल्या देशाला, देशातील नागरिकाला यातून बाहेर काढायचे आहे, हा  दृढनिश्चय घेऊन आनंद अगरवाल, पंकज प्रकाश  आणि त्यांच्या दोन  सहकाऱ्यांनी मिळून ‘भारत एड’  ही   संघटना सुरु केली. यातील काही जण  स्टार्ट अप मधून तर काही जण  कॉर्पोरेट सेक्टरमधून आहेत.  आपल्या कुटुंबात, मित्र-परिवारात, शेजारी असे कोणी ना कोणी या संकटाशी झुंझत आहेत.  कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे रुग्णालयांवरील ताण वाढला आहे. तात्काळ गरज असणाऱ्या रुग्णाला बेड्स ची सुविधा उपलब्ध होत नाही.अशावेळी काय करावे सुचत नाही. कोविड  रुग्णाची मानसिक स्थिती तर ढासळतेच पण याचबरोबर नातेवाईकांचेही मनोधैर्य खचत असते. त्यांचीही धावपळ होत असते.  रुग्णालयांत बेड्स उपलब्ध आहेत का, ऑक्सिजन सिलेंडर मिळेल का,  औषधे कुठली आणि कशी घ्यायची, असे नानाविध प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहतात. अशावेळी बऱ्याच रुग्णालयांची  ऑनलाईन माहिती जरी मिळत असली तरीही सगळ्यांनाच ही माहिती शोधता येते, असे नाही. किंवा शोधता शोधता त्यांचा बराचसा वेळही वाया जातो. त्यामुळे रुग्णांची  परिस्थिती आणखी गंभीर होत असते. हे सगळं टाळणे ही आजची गरज आहे.

सगळ्यांकडेच सामाजिक माध्यमे उपलब्ध आहेत असे नाही. अशा या गरजू, अतिसामान्य  लोकांसाठी  आपल्याला पुढे यावे लागेल, त्यांना सर्वोतोपरी मदत करावी  लागेल. म्हणून ‘भारत एड’ च्या कार्याला सुरुवात झाली. एक सपोर्ट सिस्टम सुरु करून सर्वसामान्य लोकांना मदत करता यावी यासाठी  त्यांनी अगदी २ ते ३ दिवसांत  एक प्रोफेशनल कॉल सेंटर सुरु केले. या कॉल सेंटर मध्ये प्रशिक्षित असे  सुमारे ६० ते ६५ जण दिवसातील  १८ तास काम करीत आहेत. यातील २५ ते ३० जण गरजूंना  फोनवर माहिती देत आहेत, आवश्यक असलेले  संपर्क क्रमांक देत आहेत.  तसेच  ३० ते ३५ जण वेगवेगळ्या शहरातून   उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची माहिती खातरजमा जमा करून डेटाबेस तयार करीत आहेत. यामध्ये औषध उपलब्धतता आणि  पुरवठा,  लॅब परीक्षण करणाऱ्या लॅबची यादी,  ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या संस्थांचा संपर्क क्रमांक , हॉस्पिटल मधील बेड्सची उपलब्धतता किंवा कोविड संबंधी इतर माहिती यांचा समावेश आहे. यासंबंधी  माहिती जाणून घेण्यासाठी ‘भारत एड’  ने  ७२९०० १६०६१ ही  हेल्पलाईन सुरु केली असून  सकाळी ७  ते रात्री १२ वाजेपर्यंत ही सेवा सुरु असते.      

या डाटाबेस मुळे अगदी  कमी वेळेत ते आपल्याजवळील माहिती गरजूंपर्यंत पोहचवू शकत आहेत. जीवन आणि मरणाच्या कठीण प्रसंगी केवळ  उपचारासाठी आवश्यक सेवा मिळत नसल्यामुळे एखाद्याला आपले प्राण गमवावे लागू नयेत. त्यांना कमीत कमी वेळेत या सोयींचा पुरवठा करावा आणि आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाचे प्राण वाचवावेत म्हणून जास्तीत जास्त मेहनत घेऊन ‘भारत एड’ चे काम सुरु आहे.  दिवसाला हजार ते दीड हजार कॉल्स येत आहेत. यातील २०० ते २५० जणांना योग्य ती माहिती पुरविली जात आहेत. मात्र बऱ्याच जणांना  रुग्णालयात  आवश्यक त्या सुविधा  उपलब्धच नसल्यामुळे तशी माहिती देता येत नाही. त्यांची गरज आपण पूर्ण करू शकत नाही म्हणून तशी खंतही  ‘भारत एड’ चा समूहगट व्यक्त करतो.  त्यामुळेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत खात्रीशीर माहिती लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून त्यादृष्टीने ते आपली जबादारी चोख बजावत आहेत.  आपण देत असलेली सेवा  गरजूपर्यंत नीट पोहोचली की  नाही, याची  खातरजमाही वेळोवेळी त्यांच्याकडून  केली जाते.

कोरोना आपत्तीच्या काळात कोरोनाबाधित व्यक्तीबरोबर त्याच्या कुटुंबातील सदस्यांना  धीर देणे, त्यांना  आवश्यक ती मदत करणे, औषधे, बेड उपलब्ध करून देणे अशा प्रकारच्या कामात भारत एड’  गुंतले आहेत. समाजाच्या सज्जन शक्तीच्या रूपात ‘भारत एड’ जे समाजोपयोगी कार्य करीत आहे त्या कामास आणखी बळ मिळावे, ही शुभेच्छा

– तृप्ती पवार, विश्व संवाद केंद्र, मुंबई

**

Back to top button