OpinionSeva

एफडी मोडून रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरविणारे ‘विशाल’ मन

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असल्यामुळे कोरोना संक्रमितांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यातच कोरोनाग्रस्त रुग्णांना आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनचाही तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णांपर्यंत वेळेत ऑक्सिजन पोहचू शकत नाही. ऑक्सिजन वेळेत न मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावण्याचा घटना घडत आहेत. केवळ ऑक्सिजन उपलब्धत नसल्यामुळे रुग्णांना मृत्यूच्या दाढेत अडकावे लागत आहे. अत्यंत केविलवाण्या परिस्थितीत त्यांना मृत्यूस सामोरे जावे लागत आहे. मुंबईसारख्या स्वप्ननगरीत लोकांचे असे निरर्थक प्राण जाणे खूप चिंताजनक आहेत. जास्तीत जास्त गरजूंना वेळेत ऑक्सिजन उपलब्ध व्हावा तसेच त्यांचे प्राण वाचावेत म्हणून विशाल कडणे या तरुणाने आपले विशाल मन दाखवत ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या गरजूंसाठी स्वतःच्या बचतीतली एफडी मोडून ऑक्सिजन मशीन खरेदी केले आहे व गरजूंपर्यंत घरपोच पुरविण्याचे कामही करीत आहे.

मुंबईतील भांडुप येथे राहणारे विशाल हे हाऊसिंग फेडरेशनमध्ये संचालकपदी कार्यरत आहेत. राज्यात सर्वत्र ऑक्सिजनचा तुडवडा भासत आहे. ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावत आहेत. हे त्यांच्या लक्षात येताच विशाल कडणे आपल्या डॉक्टर ऑफ लिटरेचर शिक्षणासाठी ठेवलेली एफडी मोडून गरजूंना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध करून देत माणुसकीचे नाते जपत आहेत. त्यांच्या या प्रयत्नामुळे आतापर्यंत २५ हून अधिक कोरोनाबाधितांचे प्राण वाचले आहेत.

रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत आणि त्यांना ऑक्सिजन वेळेत मिळावा यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर संजीवनी ठरत आहेत. परंतु या उपकरणांची उपलब्धतता ही मर्यादित व महागडी असल्यामुळे अनेकांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेवर उपाय म्हणून दोन महिन्यांपूर्वी आपण आपली एफडी मोडून त्यातून १२ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर विकत घेऊन गरजूंना देत असल्याचे विशाल कडणे सांगतात.

ऑक्सिजन सिलेंडरला एक सर्वोत्तम पर्याय म्हणून हे यंत्र घरी वापरता येऊ शकते. त्यामुळे सौम्य लक्षणांचे रुग्ण घरीही या यंत्राच्या साहाय्याने बरे होऊ शकतात. त्यांच्यावर घरी उपचार होऊ शकत असल्यामुळे रुग्णालयातील ऑक्सिजन बेड इतर गंभीर रुग्णांना उपलब्ध होऊ शकतात, असे कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून समजताच विशालने या मशीन खरेदी केल्या. कोरोनामुळे शिक्षण थांबले, पण कोणाचे जीवन थांबू नये, या उदारमनाने विचार करणाऱ्या विशाल ने जे कार्य केले आहे, ते खरोखरच स्तुत्य असे आहे.

  • तृप्ती पवार, विसंके, मुंबई
Back to top button