News

माय ग्रीन सोसायटीतर्फे बांबूच्या बियांचे मोफत वितरण

मुंबई, दि. ११ सप्टेंबर :  जलदगतीने वाढणारी, सदाहरित व आयुष्मान वनस्पती असलेल्या बांबूच्या बियांचे माय ग्रीन सोसायटीतर्फे मोफत वितरण करण्यात येत आहे. पावसाच्या या हंगामात बांबूच्या लागवडीसाठी पोषक वातावरण असते.  त्यामुळे बांबूच्या बियांचे वितरण करण्यात येत आहे.  

वितरित करण्यात येत असलेल्या बांबूंच्या बियांच्या १०० ग्रॅम पाकिटात आठ हजार बिया आहेत. बियांच्या उगवणीचे प्रमाण हे १५ ते २० टक्के आहे.  आतापर्यंत जवळपास ४ किलो बांबूच्या बिया पर्यावरणस्नेहींना वितरित करण्यात आल्या आहेत.  पावसाळा संपण्यापूर्वी अर्थात जमीन शुष्क होण्यापूर्वी  या बियांचे रुजवण करायचे आहे.  तीक्ष्ण हत्याराने मातीत २ इंच खड्डा करून त्यात २-३  बांबूच्या बिया टाकून वरती मातीचे आच्छादन घालून बियांचे रुजवण करायचे आहे. २ ते ३ फूट अंतराच्या फरकाने  अशाच पद्धतीने बियांची पेरणी करायची आहे.  अधिक माहितीसाठी मनीष भारतीया  (9820099022) यांच्याशी संपर्क साधावा.  किंवा जे.बी.नगर कॉलेज, कोहिनूर हॉटेल समोर, अंधेरी (पू.) येथे सकाळी ८ ते रात्री ८ दरम्यान उपलब्ध होऊ शकतात.

बांबूची वाढ आणि प्रसार  गवतासारखा असतो. जमिनीत असलेल्या बांबूच्या कंदातून रोप जन्माला येते आणि पुढच्या ५० ते ६० दिवसात त्याची वाढ पूर्ण होते. असे बांबू वापरण्यायोग्य होण्यासाठी साधारण तीन वर्षे जातात. असे असले तरी बांबूचे जीवनचक्र ४० ते १०० वर्षांचे असते. पाणथळ जमिनीवर, क्षारयुक्त जमिनीवर, अगदी मुरमाड जमिनीत पण बांबूची लागवड यशस्वीरित्या होऊ शकते.

Back to top button